ओदिशाचे मुख्यमंत्री, ‘बिजू जनता दल’चे मालक, मुद्रक, प्रकाशक इत्यादी असे नवीन पटनायक यांनी संभाव्य भाजपविरोधी आघाडीत सहभागी होण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या देशात राजकीय घराण्यांच्या मालकीचे काही पक्ष आहेत. त्यापैकी हा ओदिशातला. बिजू पटनायक हे एक दांडगट समाजवादी नेते सत्तर-ऐंशीच्या दशकात सक्रिय होते. त्यांस दांडगट हे विशेषण अशासाठी योग्य की समाजवादाच्या रोमँटिक झापडांखाली त्यावेळी जेआरडी टाटा यांस जमशेदपूरच्या पोलाद कारखान्यातील कामगार प्रश्नांवर दरडावण्यापर्यंत बिजूबाबूंची मजल गेली होती. एका बाजूने कामगार प्रश्न आणि दुसरीकडे इतकी मोठी गुंतवणूक आपल्या राज्यात नाही, याचे शल्य हे दोन्ही त्यांच्या वर्तनातून त्यावेळी दिसून आले. पुढे इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी, त्यानंतर जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन आणि या घुसळणीतून जन्मास आलेला ‘जनता पक्ष’ हा बिजूबाबूंचा सक्रिय कार्यकाल. तेव्हा बिजू पटनायकांनी पोलाद खात्याचे मंत्रीपदही भूषवले. पण तरी ओदिशा ही जन्मभूमी वगळता त्यांस अन्यत्र प्रतिमा निर्माण करता आली नाही. त्यांच्या निधनानंतर परदेशवासी असलेले त्यांचे चिरंजीव नवीन यांच्याकडे या पक्षाची सूत्रे आली. एव्हाना जनता पक्षाची अनेक शकले झालीच, पण समाजवाद्यांच्या ‘जनता दला’चे तुकडे पुढेही होत राहिले त्यांपैकी हा १९९७ च्या अखेरीस झालेला तुकडा. ओदिशातील या जनता दलास बिजू ही उपाधी चिकटवली गेली. ही उपाधी वगळता नवीन यांचे राजकीय भांडवल शून्य होते. ओदिशाच्या भूमीतच ते फारसे राहिलेले नसल्याने, तेथील राजकारणात ते पारंगत नव्हते. नवीनबाबू हे देशातील असे बहुधा एकमेव मुख्यमंत्री असतील की त्यांस स्वत:च्या राज्याची मातृभाषा पुरेशी अवगत नाही. ते आंग्लविद्याविभूषित. बराचसा काळ पाश्चात्त्य देशांतच गेला. तेव्हा वडिलांच्या स्मृती हेच त्यांच्या पक्षाचे भांडवल.

या पक्षाने आपल्या राज्याची चौकट कधी ओलांडली नाही आणि अत्यंत अभ्यासू, गुणवान असूनही नवीनबाबूंस राष्ट्रीय राजकारणाने मोहवले नाही. ‘गडय़ा आपुला ओदिशा बरा’ अशीच त्यांची मराठी वाटावी अशी वृत्ती. तथापि नवीनबाबू भाग्यवान. इतके की त्यांच्या तीर्थरूपांनी इहलोकीची यात्रा संपवून कित्येक दशके लोटली तरी त्या पक्षाची पुण्याई काही कमी होत नाही. नवीनबाबू तीत समाधानी असतात. एखाद्या निर्गुण, निरुपद्रवी व्यक्तीचे वर्णन ज्याप्रमाणे ‘कोणाच्या अध्यात ना मध्यात’ असे केले जाते त्याप्रमाणे नवीनबाबूंचे राजकारण. अन्य राष्ट्रीय वगैरे पक्षांनी आमच्या अंगणात येऊन आम्हास त्रास देऊ नये, आम्हीही ओदिशा सोडून अन्यत्र जाणार नाही, असे त्यांचे साधारण राजकीय वर्तन असते. त्यामुळे नवीनबाबू ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदावर समाधानी असतात. त्यामुळे ते अन्य कोणा राजकीय पक्षांशी हातमिळवणी वगैरे करण्याच्या फंदात कधी पडत नाहीत. ते ना कधी काँग्रेसविरोधी आघाडीत सक्रिय होते ना कधी त्यांनी भाजपविरोधातील पक्षांच्या आघाडीत रस दाखवला. याचे काही फायदे असतात.

जसे की केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, नवीनबाबू स्वत:च्या आणि त्यातही ओदिशाच्या हितास त्या पक्षाकडून बाधा येणार नाही, याची चतुर हमी घेतात. वास्तविक विद्यमान भाजप नेतृत्वास कधी एकदा ओदिशा पादाक्रांत करतो, असे झालेले आहे. पण पक्षाचे धुरीण या मंडळींना रोखतात. याचे कारण नवीनबाबूंच्या पक्षाने कधी भाजपची तळी उचलली नसेल; पण भाजपविरोधातही ते कधी उभे राहिलेले नाहीत. किंबहुना राज्यसभेत बहुमताअभावी भाजपचे एखादे विधेयक अडकत असेल, काही अडचण निर्माण होत असेल तर त्यातून भाजपस सुखरूप सोडवणाऱ्यांत नवीनबाबूंचा मोठा वाटा असतो. तेव्हा जी गोष्ट आड येतच नाही, ती दूर करण्याच्या प्रयत्नांची गरजच काय, हा यामागील विचार. त्यामुळे मध्यंतरी ओदिशाचेच धर्मेद्र प्रधान यांनी नवीनबाबूंच्या सरकारातील भ्रष्टाचाराबाबत सडकून टीका केली, पण नंतर तो विषयच मागे पडला. तेव्हा आपल्याच पक्षाच्या नैतिक नेत्यांस हा मुद्दा पेटवण्यात रस नाही, असे प्रधान यांस कळून चुकले असणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडे नितीशकुमार, ममता बॅनर्जी आदी भाजपविरोधी पक्षांच्या म्होरक्यांनी नवीनबाबूंची मुद्दाम वाकडी वाट करून भेट घेतल्याने ते या संभाव्य आघाडीत सहभागी होत असल्याच्या बातम्या आल्या. अलीकडे अशा हवा निर्माण करणाऱ्या बातम्यांचा काळ असल्याने आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचीही संख्या वाढल्याने, नवीनबाबू खरोखरच असे करतात की काय, असे चित्र निर्माण झाले. ते बदलण्यासाठी अखेर नवीनबाबूंनीच खुलासा केला, तोही मोदी-भेटीनंतर. त्यांच्या राजकारणाचा इतिहास पाहिल्यास यात नवीन काही नाही, हे लक्षात यावे.