शिक्षणासाठी विशिष्ट विद्याशाखा निवडली जाते, कारण त्या क्षेत्रात पुढे जाऊन उत्तम रोजगाराची संधी असते. अगदी आयआयटीसारख्या सहसा प्रवेश मिळणे अवघड असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्नेही वेगळी असतात. हा आणि असा समज गेली काही दशके दृढ होत असतानाच, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या विशिष्ट विद्याशाखेबाहेरील उद्योग- व्यवसाय- नोकरीत अधिक रस असल्याचा निष्कर्ष एका पाहणीतून व्यक्त झाला आहे. तोही ‘आयआयटी मुंबई’सारख्या महत्त्वाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांबाबत. ज्या विद्याशाखेचे शिक्षण घ्यायचे, त्यापेक्षा वेगळय़ाच विषयातील नोकरीच्या संधी या विद्यार्थ्यांना खुणावत असून २०१४ ते २०१८ या काळात सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनी अशा संधी मिळवल्या आहेत. भारतीय शिक्षण पद्धतीत मिळवलेल्या ज्ञानाचा आणि प्रत्यक्ष नोकरीतील कामाच्या स्वरूपाचा अर्थाअर्थी संबंध नसतो, अशी टीका केली जाते. त्यामुळेच व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत राहिला आहे. कला, वाणिज्य या विद्याशाखांमधून पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या संधी फारच अपुऱ्या असल्याच्या अनुभवामुळे वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतरही एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची जोड देणे आवश्यक ठरते. कला शाखेबाबत तर सातत्याने अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झाले आहेत. शिक्षणाचा आणि रोजगाराचा थेट संबंध गेल्या काही दशकांत अधिक तीव्रतेने चर्चेत येऊ लागला असताना, आयआयटीसारख्या नामांकित संस्थेतील विद्यार्थ्यांना अधिक पगाराच्या नोकरीचे आमिष फारसे आकर्षित करू शकलेले नाही, असेच या पाहणीतून आढळून आले आहे. संगणक अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी या विद्याशाखा सोडून अन्य शाखांमधील विद्यार्थ्यांना अन्य क्षेत्रातील नोकरीचे आकर्षण अधिक असल्याचे दिसून येते. ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या पाहणीच्या अहवालात विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बरोबरीने किंवा काही प्रमाणात अधिक वेगळेच प्रश्न भेडसावत असल्याचे दिसून आले आहे. हे प्रश्न सांस्कृतिक जडणघडण, अभ्यासाव्यतिरिक्तच्या विषयांकडे असलेल्या क्षेत्राचे आकर्षण, वेळेत नोकरी मिळण्याची चिंता अशा अनेक पातळय़ांवरील आहेत.
पाच वर्षांच्या काळातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्यांची तपासणी केल्यानंतर असे लक्षात आले आहे, की संगणक अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी या क्षेत्रात अन्य विद्याशाखांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी आहेत. हे खरे असले, तरी विविध क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा प्रवेश सहज लक्षात येणारा आहे. आयएएस, आयपीएस यांसारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या डॉक्टर, इंजिनीअर्स यांची संख्या नजरेत भरण्याएवढी आहे. त्यात आता आयआयटीसारख्या संस्थांमधून पदवी प्राप्त केलेल्यांचीही भर पडत आहे. प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याशिवाय अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळणेही अवघड असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा बुद्धय़ांक मुळातच वरचा असतो. त्याचा उपयोग अन्य क्षेत्रात निश्चितच होतो, असे म्हणता येते. अवकाश अभियांत्रिकी, धातू अभियांत्रिकी आणि पदार्थ विज्ञान या विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांनी अन्य क्षेत्रातील कमी पगाराच्या नोकऱ्यांना अधिक प्रमाणात प्राधान्य दिल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. संस्थेच्या आवारातच आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्लेसमेंट’मध्ये पहिल्या काही दिवसांतच नोकरीची संधी मिळणे याला अधिक महत्त्व असल्याने अनेक विद्यार्थी अन्य क्षेत्राकडे वळतात, असे विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होते. प्रश्न शिक्षण आणि नोकरी यांच्या अन्योन्यसंबंधाचा असला, तरीही एक बाब अधोरेखित करायला हवी. ती म्हणजे देशातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात कला शाखेची निवड केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) हा अहवाल नुकताच जाहीर केला. त्यामध्ये सर्वाधिक ३३.५ टक्के विद्यार्थ्यांनी कला शाखेत, १५.५ टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत, १३.९ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत आणि ११.९ टक्के विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नोकरीच्या बाजारात कला शाखेला दुय्यम मानण्याचा काळ सरत चालल्याचे हे लक्षण आहे. विकसित देशांत कला शाखेला जे महत्त्व आहे, ते भारतीय शिक्षण- नोकरीसंबंधात नेहमी डावे राहिले आहे. हे चित्र बदलण्यासाठी व्हायला हवेत, ते प्रयत्न सरकारी पातळीवरून होताना दिसत नाहीत. तरीही विद्यार्थ्यांमध्येच या शाखेची ओढ निर्माण झाली आहे, असे या सर्वेक्षणावरून दिसते. शिक्षण आणि रोजगार यामध्ये निर्माण होत असलेला दुरावा नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीने दूर होण्याची आशा आहे. मात्र या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी त्यावरील खर्चात वाढ होण्याचीही आवश्यकता आहे.