scorecardresearch

अन्वयार्थ : स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याची प्रतीक्षा!

२४ ऑगस्ट हा खरेतर युक्रेनचा स्वातंत्र्य दिन. यंदा तो इतक्या आव्हानात्मक आणि भयाण परिस्थितीत उगवेल, अशी कल्पनाही बहुतेक युक्रेनवासींनी गतवर्षीच्या स्वातंत्र्यदिनी केली नसेल.

अन्वयार्थ : स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याची प्रतीक्षा!
प्रतिनिधिक छायाचित्र

२४ ऑगस्ट हा खरेतर युक्रेनचा स्वातंत्र्य दिन. यंदा तो इतक्या आव्हानात्मक आणि भयाण परिस्थितीत उगवेल, अशी कल्पनाही बहुतेक युक्रेनवासींनी गतवर्षीच्या स्वातंत्र्यदिनी केली नसेल. यंदाचा स्वातंत्र्य दिन ‘साजरा करण्या’च्या परिस्थितीत वा मन:स्थितीत अर्धाअधिक युक्रेन नव्हता, कारण सहा महिन्यांपूर्वी याच दिवशी रशियाने युक्रेनची सीमा अनेक ठिकाणी भेदून त्या देशावर आक्रमण केले. २४ फेब्रुवारीच्या भल्या पहाटे युक्रेनच्या पूर्व, आग्नेय आणि ईशान्य सीमांवरून रशियाने तोफा डागल्या, रणगाडे घुसवले. दोन्ही देशांच्या सैन्यदलांच्या आकडय़ातील तफावत पाहता, युक्रेन काही दिवसांत किंवा किमान काही आठवडय़ांत शरणागती पत्करून तहाची विनंती करेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी निर्धाराने आणि खमकेपणाने नेतृत्व केले आणि तो निर्भीडपणा देशवासीयांमध्ये भिनवला. त्यामुळे आज युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये रशियन फौजा असल्या, तरी एकंदरीत हे युद्ध अद्याप अनिर्णितावस्थेत आहे. रशियाने माघारीची किंवा युक्रेनने शरणागतीची चाहूलही लागू दिलेली नाही. किंबहुना, प्रत्येक शहरात राहून रशियनांचा  तिखट प्रतिकार करत युक्रेनच्या फौजांनी सर्व अंदाज चुकवले आहेत. मारिओपोल वगळता एकही महत्त्वाचे शहर पहिल्या काही महिन्यांमध्ये रशियाला जिंकता आले नव्हते. ज्या दोन प्रांतांवर वर्चस्वासाठी युद्धाचा आटापिटा सुरू केला, ते डॉनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांत रशियन बहुल आहेत. त्या प्रांतांमध्ये रशियन बंडखोर गेली काही वर्षे सक्रिय होते. या दोनपैकी लुहान्स्क प्रांतावर रशियाने जवळपास संपूर्ण वर्चस्व प्राप्त केले आहे. पण डॉनेत्स्क प्रांतासाठी तीव्र लढाई जारी आहे. एकीकडे खारकीव्हसारखे शहर युक्रेनने शर्थीने स्वत:कडे राखले, दुसरीकडे खेरसनसारखे शहर रशियनांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी कित्येक आठवडे नियोजनच सुरू आहे. अमेरिका, ब्रिटन आणि काही युरोपीय देशांकडून मिळालेल्या युद्धसामग्रीच्या जोरावर युक्रेनने रशियन आक्रमण अनेक ठिकाणी थोपवून धरले किंवा या प्रतिकारामुळे रशियन फौजांची वाटचाल नक्कीच मंदावली. मात्र, यापलीकडे रशियनांना निर्णायकरीत्या हुसकावून लावण्यात युक्रेनच्या फौजांना यश आलेले नाही, किंबहुना तितकी त्यांची ताकद नाही. निव्वळ युद्धशास्त्राच्या निकषांवर मूल्यमापन करायचे झाल्यास, रशियन लष्कर आणि त्यांच्याकडील बहुतेक सामग्री कालबाह्य आणि जुनाट असून नियोजनाच्या बाबतीत अजागळ आहे. असे असले, तरी त्या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची युद्धाची खुमखुमी जिरलेली नाही. त्यामुळे क्रिमियाप्रमाणेच डॉनेत्स्क आणि लुहान्स्क युक्रेनपासून तोडणे हा त्यांच्यासाठी किमान प्रतिष्ठा राखणारा विजय ठरू शकतो. युद्धात दोन्ही बाजूंकडील शेकडो सैनिक मारले गेले. युद्धामुळे हजारो नागरिक विस्थापित झाले. पण युद्धभूमीपलीकडे या युद्धाची झळ बसलेले भारतासारखे अनेक देश आहेत. काळय़ा समुद्रावरील रशियन नियंत्रणामुळे तेथील मालवाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे या दोन्ही देशांकडून होणारी धान्य, रसायने, खते, खनिजे, खनिज तेल यांची निर्यात तीव्र बाधित झालेली आहे. त्यामुळे युद्धभूमीवर जितके सैनिक मरण पावले, त्यापेक्षा अधिक सुदूर आफ्रिकेत अन्नधान्याअभावी भूकबळी नोंदवले गेले. जितके नागरिक विस्थापित झाले, त्यापेक्षा अधिक व्यापार आणि उद्योगधंदे कोलमडल्यामुळे जगभर बेरोजगार झाले आहेत. पुतिन यांचे पाप हे असे युक्रेनच्या सीमा ओलांडून सर्वत्र पोहोचले आहे! युक्रेनच्या स्वातंत्र्याची प्रतीक्षा त्यामुळेच जगभर आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या