गिरीश कुबेर

खरं तर अभिमान बाळगण्यासारखं देशांतर्गत काही होत नाही, असं कोणी म्हणणार नाही. तरीही दुसऱ्या देशात कुणी मोठं झालं तर लगेच ‘आपला’ म्हणून अभिमान? इतकी अगडबंब जनसंख्या निर्यात करतो आपण.. कोणी कुठे तरी चमकणारच!

raghuram rajan
“भारतातील तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी”, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन असं का म्हणाले?
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
Prime Minister Narendra Modi statement on terrorists
दहशतवाद्यांचा त्यांच्या भूमीतच खातमा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

..तर अपेक्षेप्रमाणे लिझ ट्रसबाईंना ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधानपदावरनं पायउतार व्हावं लागलं. पंतप्रधानपदाच्या अल्पावधीचा विक्रम त्यांचा. जेमतेम ४४ दिवस. बाईंची राजकीय चाल आणि प्रशासकीय चलन पाहता त्या संकटात पडणार हे पहिल्या दिवसापासनंच दिसत होतं. सप्टेंबर महिन्यात त्यांची निवड झाल्यापासून ‘लोकसत्ता’ ट्रसबाईंच्या या अटळ भवितव्याबाबत लिहीत होता.

  ..तर आता या पदावर ऋषी सुनक यांना संधी मिळणार का.. या प्रश्नाची चर्चा सुरू होईल. आणि हल्ली जेव्हा जेव्हा ऋषी सुनक यांचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा त्यांच्या नावाआधी ‘भारतीय वंशाचे’ अशी उपाधी लागलेली असते. वाहिन्यांचे वृत्तनिवेदक ‘भारतीय वंशाचे’चा उच्चार मोठय़ा अभिमानाने करताना आढळतात. वर्तमानपत्रातही कमीजास्त प्रमाणात हेच. हे असं कोणी तरी ‘आपल्यापैकी’(?) दुसऱ्या देशात वगैरे जाऊन नाव काढतंय म्हटलं की आपल्याला कोण आनंद! अमुक कंपनीचा प्रमुख भारतीय वंशाचा आहे, तमुक बँकेचा मुख्य भारतीय वंशाचा आहे, ढमुक उद्योगपती भारतीय वंशाचा आहे.. असं सतत सुरू. खरं तर अभिमान बाळगण्यासारखं देशांतर्गत काही होत नाही, असं कोणी म्हणणार नाही. तरीही ही भारतीय वंशाची आपली तहान का हा प्रश्नच आहे. परदेशात भारतीय वंशाचा शोधण्याचा गंड आणि कंड काही आपला कमी होत नाही. 

..तर असा कोणी भारतीय वंशाचा उच्चपदी पोहोचतोय असं दिसलं की आपल्या अपेक्षा आणखी वाढतात. हा आता मायभूमीचे पांग फेडेल वगैरे काय काय सुरू होतं. खरं तर मायभूमीत हे पांगिबग फेडायची संधी मिळत नाही, म्हणून ही मंडळी बाहेर गेलेली असतात. तिकडे कष्ट करतात. यशस्वी होतात. ती त्यांची कर्मभूमी होते. पण तरी आपली इच्छा मात्र मायभूमीचे पांग त्याने फेडावेत अशी. ऋषी सुनक यांच्याबाबतही हे सुरूच आहे.

..तर ते खरोखरच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेच, तशी संधी त्यांना मिळालीच, तर या ‘भारतीय वंशाचे’वाल्यांनी अपेक्षाभंगाचं दु:ख कसं कमी होईल, याची तयारी आधीपासून सुरू केलेली बरी. याचं कारण इतिहास. तो असं दाखवतो की अन्य देशांत उच्चपदी गेलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींनी घेतलेले निर्णय, त्यांच्या भूमिका या भारतस्नेही तर नसतातच. उलट त्या बऱ्याचदा भारताविरोधातच असतात.

उदाहरणार्थ मलेशियाचे महातीर महंमद. त्यांना आधुनिक मलेशियाचे जनक म्हणतात. एके काळचा तिसऱ्या जगातला हा देश महातीर यांच्या काळात एकदम चकचकीत बनला. हे महातीर भारतीय वंशाचे. त्यांचे आजोबा केरळातले. मल्याळी मोठय़ा प्रमाणावर जगभर हिंडत असतात. त्याप्रमाणे तेही गेले असतील पोटासाठी फिरत फिरत मलेशियात. राहिले तिकडे. वास्तविक मलेशिया हा तसा आपल्या स्नेही देशांतला. चांगले होते संबंध आपले आणि मलेशियाचे. ते बिघडले महातीर महंमद यांच्यामुळे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना या भारतीय वंशाच्या महातीर महोदयांनी थेट काश्मीर प्रश्नाला हात घातला. भाषणात त्यांनी सरळ सरळ भारतविरोधी भूमिका घेतली. तेव्हापासून तसा तणावच निर्माण झाला आपल्यात. 

आजमितीला सगळय़ात जास्त ‘भारतीय वंशाचे’ राजकारणी/नोकरशहा आहेत ते अर्थातच अमेरिकेत. अमेरिकी अध्यक्षांच्या विविध महत्त्वाच्या खात्यांतले सुमन गुहा, तरुण छाब्रा, शांती कलाथिल, मूळच्या काश्मिरी समीरा फाझली आणि आयेशा शहा वगैरे हे सर्व भारतीय वंशाचेच. नेदरलँड्सच्या अमेरिकी दूतावासासाठी ज्यांचं नाव चर्चेत होतं त्या शेफाली राझदान दुग्गल याही भारतीय. स्त्री हक्क, मानवी हक्क वगैरेंचे हे कडवे समर्थक. म्हणजे त्या अर्थाने भारताबाबत या मंडळींची भूमिका काय असेल त्याचा अंदाज येईलच. अमि बेरा, राजा कृष्णमूर्ती, प्रमिला जयपाल, रो खन्ना हे तर अमेरिकेच्या सर्वोच्च प्रतिनिधीगृहाचे सदस्य. अर्थातच हे सर्व भारतीय वंशाचे. पण म्हणून त्या सर्वाची गणना भारताच्या सर्वकालीन समर्थकांत करता येईलच असं नाही. या सगळय़ांपेक्षा वरच्या अर्थातच उपाध्यक्ष कमला हॅरिस. त्यांच्या निवडीच्या वेळी अमेरिकेतही आता भारतीय कमळ फुललं वगैरे बावळट विधानं झाली. पण ‘मी भारतीय नाही, अमेरिकन आहे’, असं या बाईंनीच ठासून म्हटल्याचं प्रसिद्ध झाल्यानं ती कमळं कोमेजली असावीत लगेच. पुढे ती उमललीच नाहीत. कारण हॅरिसबाई काश्मीर प्रश्नावर सतत भारताच्या टीकाकार राहिलेल्या आहेत आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्दय़ावरही त्यांची भूमिका विद्यमान सरकारला रुचेल अशी नाही. प्रचारातही त्यांनी कधी आपल्या भारतीय संबंधांचा उल्लेख केल्याचं आढळलं नाही. वडिलांकडून त्या आफ्रिकी. आईकडून भारतीय. आपल्यातले भले अनेक जण त्यांच्याशी भारतीय वगैरे म्हणून लगट करायला गेले असतील. जातातही. पण कमलाबाई मात्र आपले आफ्रिकी संबंध मिरवण्यात धन्यता मानतात.

सध्या भारत-विरोधी भूमिकेसाठी सगळय़ात गाजल्या त्या ब्रिटनच्या माजी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन. भारतीय वंशाच्या याही. त्यांचे तर आई-वडील दोघेही मूळचे भारतीयच. भारत-मॉरिशस, भारत-केनिया असा प्रवास करून इंग्लंडमध्ये स्थिरावलेले. म्हणजे डबल-बॅरल भारतीय! पण लिझ ट्रस यांच्या सरकारात गृहमंत्री झाल्या झाल्या त्यांनी भूमिका घेतली ती भारत-विरोधाची. ब्रिटनमध्ये बेकायदा स्थलांतरितात आणि व्हिसा मुदत संपल्यानंतरही अनधिकृतपणे राहणाऱ्यांत सर्वाधिक भारतीय आहेत, अशा अर्थाचं त्यांचं विधान भारत-ब्रिटन संबंधांच्या पायाला धक्का देऊन गेलं. या दोन देशांत तणाव इतका वाढला की तो निवळावा यासाठी पडद्यामागनं प्रयत्न सुरू झाले. गंमत म्हणजे सुएला यांचं विधान खरं की खोटं, त्या अगदीच चुकीचं बोलल्या का वगैरे प्रश्न उपस्थितही झाले नाहीत. त्यांनी असं बोलावंच का मुळात.. हाच मुद्दा पुढे आला. खरं तर भारतीयांचा इतका अपमान खऱ्या ब्रिटिशानंही कधी केला नसेल. पण भारतीय वंशाच्या गृहमंत्र्यानं मात्र तो करून दाखवला. पुढे प्रश्न नुसता मान-अपमानापुरताच मर्यादित राहिला नाही. भारत आणि ब्रिटन यांच्यात ‘मुक्त व्यापार करार’ (फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट) होणार होता. सुएला यांच्यामुळे तो लटकला. आताच्या दिवाळीआधी हा करार करून आणखी एक विजय मिरवता यावा यासाठी आपले कोण प्रयत्न सुरू होते. अनेक अन्य व्यापारी संधींबरोबर या करारामुळे अधिक भारतीयांना अधिक काळ त्या देशात वास्तव्य करण्याची संधी मिळणार होती. उभय देशांच्या आर्थिक उत्कर्षांसाठी हा करार खूपच महत्त्वाचा होता. आणि आहेही. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन या करारासाठी चांगले प्रयत्नशील होते. भारतात त्यांचं त्यासाठी येणंही झालं होतं. हा करार लवकरात लवकर व्हावा ही त्यांचीही इच्छा होती. त्यांच्याच पक्षाच्या ट्रसबाईंकडे पंतप्रधानपद होतं. त्याही या कराराबाबत सकारात्मक होत्या. पण गृहमंत्री सुएला यांच्या त्या एका विधानानं या प्रयत्नांना सुरुंग लावला. ब्रिटनमध्ये ब्रेग्झिट घडलं त्याच्या मुळाशी मुद्दा होता स्थलांतरितांचा. युरोपातल्या पोलंड आदी देशातनं स्वस्तात मजूर येतात आणि स्थानिकांच्या रोजगारावर गदा येते हा मुद्दा राजकीय बनला आणि ब्रेग्झिटचं महाभारत घडलं. सुएलाबाईंच्या ‘भारतीय-सर्वाधिक-बेकायदा-स्थलांतरित’ या विधानानं नेमक्या त्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं गेलं. परिणाम असा की नंतरच्या सरकारलाही हा गुंता सहज सोडवता येणारा नाही. आणि ते नंतरचं सरकार जर भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं असेल तर आणखीच अडचण. त्यांची आणि आपलीही! आपल्याच पक्षाच्या माजी गृहमंत्री सुएला यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करावं तर भारतीयांबाबत पक्षपात केला असा आरोप होण्याची भीती. त्यात सुनक यांची पत्नी अजूनही भारतीय नागरिक आहे. आणि दुर्लक्ष न करावं तर करार संकटात आणि भारताचे ‘चांगले पांग फेडले’ अशी टीका होणार.

या सगळय़ाचा अर्थ इतकाच की कोणा देशात कोणी भारतीय वंशाचा उच्चपदी आला की उगाच ‘भारतीय’, ‘भारतीय’ म्हणून गळेपडूपणा करण्याचं काही कारण नाही. इतकी अगडबंब जनसंख्या निर्यात करतो आपण. कोणी कुठे तरी चमकणारच! लगेच त्याला आपल्याकडे ओढण्याच्या प्रयत्नातून आपला न्यूनगंड तेवढा दिसतो. सतत आपलं ‘माझा कुणा म्हणू मी’ हा प्रश्न. सोडायला हवी ही सवय!

girish.kuber@expressindia.com
@girishkuber