आंतरराष्ट्रीय संगीतजगताचे पारंपरिक वृत्त ‘टेलर स्विफ्ट’वर एकाग्र झालेले असताना एखादे पठडीबाहेरचे नाव जेव्हा समाजमाध्यमांतून उगवून येते, तेव्हा त्याचे कौतुक अधिक वाटू लागते. गेले काही दिवस हे कौतुक डच गायिका एमा हिस्टर्स हिच्या नावावर आहे. ताजे कारण- दोन वर्षांपूर्वी भारतीय घराघरांत वाजल्या जाणाऱ्या ‘श्रीवल्ली’ गाण्याचे तेलुगू रुपडे. २८ वर्षांच्या या गायिकेचे गाणे २० वर्षांहून अधिक काळ सुरू असले, तरी गेली आठेक वर्षे ती ‘कव्हर्स’द्वारे म्हणजेच इतरांच्या गाण्यांना नव्या अंदाजात गाऊन आपला चाहतावर्ग वाढवत आहे. तो किती, तर यूटय़ूबसारख्या परिचित माध्यमांत ५० ते ६० लाख इतका. एखाद्या मुख्य धारेतील कलाकारांनाही भोवळ आणणारी तिची ही लोकप्रियता. नेदरलॅण्ड्समधील झीलॅण्ड प्रांतात १९९६ साली जन्मलेल्या एमाने लहान वयातच आपल्या गाण्यातील कौशल्याला पैलू पाडण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>> चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग

स्थानिक कार्यक्रमांत आठव्या वर्षी गाण्याचे पुरस्कार पटकावत तिने टीव्हीवर स्थान पक्के केले. मग लोकप्रिय इंग्रजी गाण्यांना आपल्या शैलीत सादर करीत तिचे शालेय आणि महाविद्यालीयन जीवन पुढे सरकले. २०१३ साली पदवी मिळाल्यानंतर तिने संगीताला अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. इंग्रजी गाण्यांवरच न थांबता, हिंदी, पंजाबी, उर्दू, अरेबिक, इंडोनेशियन गाण्यांतील शब्दांचे मिश्रण करून नवे व्हर्जन तयार करण्याकडे तिचा कल होता. आपल्या यूटय़ूब चॅनलद्वारे तिने अल्पावधीत माध्यमांवर धुमाकूळ घातला. प्रत्येक गाणे यूटय़ूबवर किमान पाच-दहा लाख प्रेक्षकांची तजवीज करणारे ठरले. भारत- अमेरिका आणि युरोपीय देशांमधील तरुणाईने एमा हिस्टर्सची गाणी व्हायरल करण्यात मोठी भूमिका बजावली. तिच्या कव्हर्सवर कान आणि नजर टाकली तर ‘मरून फाईव्ह बॅण्ड’चे ‘गर्ल्स लाईक यू’, एड शीरनचे ‘शेप ऑफ यू’, जस्टिन बिबरचे ‘लेट मी लव्ह यू’ या गाण्यांवर तिची स्वत:ची छाप सापडेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दोन-तीन वर्षांत तिचे आक्रमण पंजाबी गाण्यांवर सर्वाधिक झालेले दिसते. हार्डी संधूचे ‘बिजली, बिजली’ म्हणजेच ‘ओ सिण्ड्रेला’ हे गाणे एमा हिस्टरच्या आवाजात मूळ गाण्याइतकेच उत्साहउधाण तयार करू शकते. पाकिस्तानी गायक अली सेठी याच्या ‘पसूरी’ गाण्याने दोन वर्षांपूर्वी सीमा ओलांडत दोन्ही देशांतील श्रोत्यांना पछाडले होते. हे गाणेही एमाने नव्या अदाकारीत पेश केले आहे. ‘तेरे वास्ते फलक से मैं’, ‘शोन्ना मेरे शोन्ना शोन्ना’, अरजित सिंगच्या ‘शायद’ गाण्याचा इंग्रजी अवतार, ‘पुष्पा’मधील ‘उ अण्टवामामा’ ही गाणी ऐकली, तर तिच्या लोकप्रियतेचे गमक कळेल. केवळ माध्यमांवरील अल्पायुषी हौशी वीरांच्या कुळातील नसलेली ही गायिका लवकरच मुख्य धारेतील झाली तर ते आश्चर्य नसेल. ते तिच्या मेहनत आणि गुणांचे फळ असेल.