मागच्या लेखात गायब झाल्या असं वाटणाऱ्या तिथींचा माग काढला होता. आजच्या लेखात गायब झालेल्या एक नाही, दोन नाही, चक्क दहा तारखांची गोष्ट. आजकालची नाही. चारशे- साडेचारशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक गोष्ट.
लेखमाला सुरू होऊन चार महिने उलटले. विविध विषयांवरचे १७ लेख प्रसिद्ध झाले. पण आपण सर्व जण दररोज जे कॅलेंडर वापरतो – म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी वगैरे महिन्यांचं- त्याविषयी आतापर्यंत एक लेख तर सोडाच, एक परिच्छेद, एक वाक्य, एक शब्द, एक अक्षरही नाही! हे काही योग्य नाही. चला तर मग. या सर्वपरिचित कॅलेंडरच्या सफरीला. पण कॅलेंडर सर्वपरिचित असलं तरी गाफील राहू नका. ज्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्या सर्वपरिचित नाहीत तर सर्वस्वी अपरिचित आहेत!
गायब होऊ शकतात अशा वस्तूंची यादी करायची म्हटली तर त्यात गाडी किंवा स्कूटर यांचा अग्रक्रम लागेल! कारण स्कूटर किंवा गाडी उभी करून आपण दोन सेकंद एखाद्या दुकानात जावं तर परत येईपर्यंत ती गायब झालेली असते. वाहतूक पोलिसांची कार्यतत्परता, दुसरं काय! चष्मा, पेन, मोबाइल अशा फुटकळ वस्तूही या यादीत असतील. पण या यादीत चुकूनसुद्धा ‘तारीख’ अशी नोंद काही कोणी करणार नाही. तारीख कशी गायब होऊ शकेल?
उदाहरणार्थ, आज ३ मे आहे. तो संपल्यावर उद्या ४ मे यायला हवा. पण त्याऐवजी एकदम १४ मे उगवला अशी कल्पनादेखील आपण करू शकत नाही. पण मंडळी, सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असतं याचा अनुभव चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वी अनेक युरोपीय देशांतल्या लोकांनी घेतला. काय झालं होतं नेमकं? पाहू.
सन १५८२. स्थळ रोम. तारीख ४ ऑक्टोबर. इतर सगळ्या दिवसांसारखाच हाही दिवस उगवला. आणि इतर सगळ्या दिवसांप्रमाणेच मावळले. काही फरक नाही. कामं करून थकले-भागले लोक जेऊन-खाऊन नेहमीप्रमाणेच झोपी गेले.
दुसरा दिवस उजाडला. आता त्या दिवशी तारीख अर्थातच, ५ ऑक्टोबर १५८२ असायला हवी. पण नाही. दुसरा दिवस उजाडला त्या दिवशी तारीख चक्क १५ ऑक्टोबर १५८२ होती! हो हो. ५ ऑक्टोबर १५८२ ते १४ ऑक्टोबर १५८२ या दहा तारखा जणू गायबच झाल्या होत्या.
अशा दहा तारखा एकगठ्ठा गायब झाल्या अशी घटना जगाच्या इतिहासात त्यापूर्वी कधीही घडली नव्हती. त्यानंतर आतापर्यंत कधी घडलेली नाही आणि यापुढे कधी घडेल याची सुतराम शक्यता नाही. आता हे सगळं कसं घडलं, का घडलं, कोणी घडवलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहू.
महाभारताच्या शांतिपर्वात भीष्म युधिष्ठिराला सांगतो, राजा कालस्य कारणम् म्हणजे राजा हा प्राप्त परिस्थितीचं कारण असतो. राजा हा असा म्हणून परिस्थिती ही अशी.
आणि या तारखा गायब करण्याचा पराक्रम एका राजानेच केला होता. कोण? किंग एडवर्ड की एम्परर फ्रान्सिस? छे छे. ज्यांनी या तारखा गायब केल्या त्या राजाला लोक ‘राजा’ही म्हणायचे नाहीत आणि ‘सम्राट’ही. लोक त्यांना ‘पोप’ म्हणायचे. पोप ग्रेगरी तेरावे! हेच ते महाशय ज्यांनी हा न भूतो न भविष्यति पराक्रम केला. त्यांनी मुळी तसा आदेशच काढला. राजानेच काढलेला आदेश, मग काय, झाल्या त्या दहा तारखा गायब.
पण त्यानंतर मात्र ते कॅलेंडर जे सुरू झालं त्यात काही कोणी बदल केले नाहीत. आणि अगदी आजही आपण जे कॅलेंडर वापरतो ते त्या पोप ग्रेगरींनी सुचवलेल्या बदलांचा अंतर्भाव असलेलं कॅलेंडरच आहे. आणि म्हणूनच त्या कॅलेंडरला ‘ग्रेगरीयन कॅलेंडर’ म्हणतात. पोप ग्रेगरींनी सुरू केलं म्हणून ‘ग्रेगरीयन’.
आता अनेक प्रश्न निर्माण झाले. एक तर पोप म्हणजे धर्मगुरू. तो राजा कसा असू शकतो? दुसरं म्हणजे हे सगळे उपद्व्याप करण्याचं कारण काय होतं? तिसरं म्हणजे पोप ग्रेगरींनी कोणत्या तरी कॅलेंडरमधून दहा तारखा गायब केल्या. म्हणजे त्यांच्या आधीही कोणतं तरी कॅलेंडर होतं तर. ते कोणतं कॅलेंडर? आणि चौथं म्हणजे पोप ग्रेगरींनी याखेरीज आणखीही काही बदल केले का? किती ते प्रश्न! आणि या प्रश्नांची उत्तरं देऊन होईपर्यंत आणखी नवे प्रश्न उपस्थित होतील.
आपण अर्थातच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. पण ती पुढच्या अंकात.
@KalacheGanit
kalache.ganit@gmail.com