गिरीश कुबेर

वर्षभराच्या चिंता आणि आगामी वर्षांची हुरहुर यावर उतारा म्हणून हे ‘मोह मोह’के धागे बांधून घ्यायला आजचा मुहूर्त उत्तम असं हे ‘द्रोणाचार्य’ सांगतात!

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

सरत्या वर्षांतील काही मोजक्या महत्त्वाच्या घटनांतील एक लोभस, मोहमयी घटना कोणती आणि मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान यांचा एक लाडला, पण दुर्लक्षित निर्णय कोणता.. हे दोन प्रश्न एकत्र विचारले तर येणारी उत्तरं निश्चित ठोकळेबाज असतील.

यातल्या काही उत्तरांत असेल अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड वगैरे देशप्रमुखांच्या छातीत धडकी भरवणारं किंवा त्यांना खाली मान घालायला लावेल असं आपलं ‘जी २०’ परिषदेचं आयोजन. किंवा या आपल्या परिषदेला घाबरून चीनचे क्षी जिनपिंग यांनी तीकडे पाठ फिरवणं. किंवा जागतिक विज्ञान विश्वाला हादरवून टाकणारं आपलं ‘चांद्रयान’ यश. किंवा आशियाई स्पर्धातली भारतीयांची पदक लयलूट. आणि शिवराज सिंह चौहान म्हणजे ‘लाडली बेहना’! अनेकांना तर या दोन प्रश्नांची सांगड घालणंही जड जाईल.

तर या दोन प्रश्नांचं उत्तर आहे मध्य प्रदेशचे (आता माजी) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोहाच्या फुलांपासून बनलेल्या मद्यास ‘राज्य मद्या’चा दर्जा देणं आणि त्या राज्यातल्या  पंचतारांकित हॉटेलांत या अस्सल भारतीय मद्याची विक्री सुरू होणं. ही यंदाची फार म्हणजे फारच प्रेरणादायी कथा!

सरत्या वर्षांत मध्य प्रदेशातल्या ताज, मेरियट हॉटेलातल्या पाहुण्यांना नाव न सांगता एक पेय दिलं गेलं. त्यापासनं काही कॉकटेल्स बनवली गेली. तीही पाजली गेली. तीन-चार महिने हा प्रयोग चालला. या प्रयोगातल्या पाहुण्यांची निरीक्षणं नोंदवली गेली. हे प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कसं वाटलं वगैरे तपशील घेतला गेला. चौहान सरकार श्वास रोखून या प्रयोगांच्या निकालाकडे पाहात होतं.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : पाटयांच्या राजकारणाचे कानडी वळण

आणि ऑगस्ट महिन्यात दोन्ही हॉटेलांनी हातातले प्याले उंचावून हे यश साजरं केलं. हे यश होतं मोहाचं मद्य आनंदानं स्वीकारलं गेलं, त्याचं. त्या हॉटेलांतल्या परदेशी पाहुण्यांनीही हे प्याले भरभरून आणि मागून मागून घेतले. शिवराज सिंह चौहान यांना धन्य धन्य वाटलं असेल. आपल्या राज्यातल्या भिंड, माडिया वगैरे आदिवासींचं हे कौशल्य जगानं ‘पोटात’ घ्यावं यासाठी त्यांचे प्रयत्न होते. ते अखेर ‘तीर्थले’! पण एक शंका: बिचाऱ्या शिवराज सिंह मामाजींनी हा आनंद कसा साजरा केला असेल? त्यांच्या पक्षात असं चषक उंचावून आनंद साजरा करायला सक्त मनाई असणार. (अर्थात त्या राज्यातल्या यशस्वी निवडणुकांनंतर चौहान यांचं जे काही झालं ते पाहता त्यावेळी तरी दु:ख बुडवायला त्यांनी आपल्या निर्णयाचं फळ (खरं म्हणजे फळाची) चाखलं(ली) असेल का? असो)

पण ही मोहाची झाडं ही काही खास मध्य प्रदेशचीच मक्तेदारी नाही. आपल्याकडे तर ती कुठेही आढळतात. शेजारच्या कर्जत-नेरळ पट्टयात तर मोहाच्या झाडांची जंगलं सापडतील. तशी सगळीच झाडं प्रेम करावी अशीच असतात. पण मोहाचं मोहात पाडतं. घनदाट पानांचं. शिशिरात ती पडून गेली की तांबूस तुरे उगवतात. त्यांना पानांचा आकार येतो. विंदांनी म्हटल्याप्रमाणे ‘तुझ्या गळयाला दंश करावा’ असं त्या मस्तानीच्या गळयासारख्या पारदर्शी पानांकडे पाहून आपल्यालाही वाटेल; इतकी ती गोड दिसतात. मग त्यांचं पोपटीपण. आणि मग यथावकाश हिरवं होणं. आणि या झाडाला बहर येतो तेव्हा तर हे सौंदर्य अगदी महकून जातं. आसपास सगळीकडे नुसता आंबेमोहोरासारखा सुंगध भरून राहातो. जाम नावाची निर्गुण-निराकार-निरुपद्रवी फळं कशी दिसतात? त्या रंगाची ही मोहाची फुलं. दुप्पट आकाराच्या मोगऱ्याच्या फुलाइतकी मोठी. ती टपाटप पडतात. त्या जागी फळं. ती आली की राघूंचे थवेच्या थवे मोह-मुक्कामी! आदिवासी, कातकरी या मोहाच्या फळांची भाजी करतात. आणि फुलांचं?

खास भारतीय म्हणता येईल असं मद्य. गोव्यातल्या फेणीशी नातं सांगणारं. अलीकडचा सहज अधिक खर्च करायला लावणारा शब्द म्हणजे ऑर्गनिक. हे मद्य पाण्यासारखंच दिसतं. फुलं उकळवून ते करतात. आदिवासी, कातकरी बायकाही अगदी हे सहज पितात. पानांच्या द्रोणातून. पूर्वी मुंबई-पुणे प्रवासात करवंदं कशी पानांच्या द्रोणातनं विकायला यायची. तसे हे द्रोण. पुढे चोच आल्यासारखं एक पान टोचलेलं. त्यातून ती प्यायची. दिसायला ती अगदी साधी. पण तिच्या (म्हणजे मोह-मद्याच्या) दिसण्यावर जाणं धोक्याचं. पिताना घशाखाली एक आगीची लकेर उतरत जाते आणि नंतर मात्र तोंडात फुलाचा स्वाद धुमसतो. या मोहाचं ‘पाणी’च वेगळं. ते इतकं उफाडयाचं आणि घायाळ करणारं की साहेबांना या पेयावर बंदी घालावी लागली, म्हणजे बघा! आपल्या मडमेच्या समोर काही मोह-मयी साहेब ‘मोहग्रस्त’ होऊन नेहमीची शिष्टसंमत व्हिस्की वगैरे पिऊन जातात तसे गेले असणार..! नंतर जे काही झालं ते प्रत्येकानं आपापल्या कल्पनाशक्तीनं रंगवावं. पण त्यामुळे साहेबानं ‘बाँबे अबकारी अ‍ॅक्ट १८७८’ आणि ‘मोहरा अ‍ॅक्ट १८९२’ हे दोन कायदे करून मोहाची दारू प्यायला, साठवायला आणि विकायला बंदी घातली. मग कोणीही कशावरही बंदी घातली की काय होतं ते तेव्हाही झालं. रानोमाळ पसरलेल्या मोहाच्या झाडांना आणि अर्थातच निसर्गाला काय मातबरी या आणि अशा सरकारी आदेशाची? निसर्गाचं चक्र सुरूच होतं आणि मोहाचं फुलणंही. माणसं मग चोरून मद्य बनवायला लागली. साहेबानंही ते प्यायलं असणार. पण बंदी काही उठवली नाही.

नंतर एकदम थेट ‘मामाजी’ शिवराज सिंह चौहान यांनीच ते पुण्यकर्म केलं. त्यांनी या मोहाभोवती जमलेली गुन्हेगारीची कोळिष्टकं झटकून टाकली आणि मोहाच्या पेयाला ‘प्राचीन मद्य’ असा दर्जा देऊ केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या मोह-मद्याची लोकप्रियता किती वाढली असावी? तर शेजारच्या छत्तीसगड राज्यातनं निवडक, चांगल्या प्रतीच्या मोहाच्या फुलांची निर्यात व्हायला लागली? कुठे? तर चक्क फ्रान्समधे. भाग्यवान म्हणायची! चांगल्या घरी पडली. आता त्यांचं चांगलं चीज होईल ! आपली योगासनं जशी फॉरीन रिटन्र्ड ‘योगा’ बनून आली आणि घट्टघट्ट कपडयांत बायाबापे योगाच्या नावाखाली हातपाय झाडू लागले तसं आता लवकरच मोहाच्या मद्याचं होईल.

हेही वाचा >>> बुकमार्क : २०२३ चे पान उलटताना..

ते होईल तेव्हा होवो. पण आपल्याकडे या वर्षांत त्यांचे चांगले दोन ब्रँड आलेत. मोंड हा एक आणि मोहुलो. या मोहाचा लौकिक अशा ‘वासावर’ असणाऱ्या गोव्यापासनं कसा लपून राहणार? गोव्यातही ही झाडं भरपूर. गोव्यानंही मग मोहापासनं मद्य बनवायला सुरुवात केली. गोंयकार या कलेत किती तरी उजवे. त्यांनी तर मोहापासनं लिक्युअर (सर्व खानपान आटोपल्यावर मुखशुद्धी म्हणून अंगठयाएवढया ग्लासांतून लिक्युअरचा शॉट (म्हणजे एका घोटात ते पेय संपवणं) घ्यायची खानदानी प्रथा आहे.) सुद्धी बनवली.

यामुळे २०२३ साल हे असं दोन महुआंसाठी महत्त्वाचं ठरलं म्हणायचं. एक मोहाची आणि दुसरी मोईत्रांची. असो. गोव्याची फेणी, केरळची ताडी तसं आपलं पेय का नको असा विचार मध्य प्रदेशच्या मामाजींनी केला आणि म्हणून मोह-मद्याला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री असावा तर असा आणि त्यांचं कौतुक करावं ते थोडंच. पण हे वाचल्यावर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात वगैरे मुख्यमंत्र्यांनाही असं काही राज्य पेय निवडावंसं वाटलं तर काय होईल या काळजीनं दरदरून घाम येतो. त्यावरही हे मोह-पेय हे उत्तर आहेच!

वर्षभराच्या चिंता आणि आगामी वर्षांची हुरहुर यावर उतारा म्हणून हे ‘मोह मोह’के धागे बांधून घ्यायला आजचा मुहूर्त उत्तम असं हे ‘द्रोणाचार्य’ सांगतात!

ता.क. : खरं तर या एका गोष्टीसाठी तरी मामाजींना आणखी एक संधी द्यायला हवी होती. की या मोह-मद्याची शिक्षा म्हणून मामाजींना संधी नाकारली गेली, असं तर नाही? तसं असेल तर मामाजींच्या दु:खाचा भार आपणही सहन करायला हवा. चांगभलं!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber