काही माणसं हिमालयासारखी असतात. जवळ गेल्याशिवाय त्यांची उंची आणि भव्यता याचे आकलन होत नाही. आधुनिक भारताला आकार देणाऱ्या थोर विभूतींपैकी एक भारतरत्न इंजिनीअर डॉ. एम. विश्वेश्वरैया भारतमातेचे केवढे महान सुपुत्र होते हे अभ्यासानंतरच कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम हे विश्वेश्वरैया यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८६० रोजी कर्नाटकातील मुद्देनहळ्ळी येथे झाला. बंगळूरु येथे शालेय शिक्षण आणि मद्रास विद्यापीठातून पदवी घेतल्यावर पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्या काळी पुण्याच्या ‘डेक्कन क्लब’च्या स्थापनेत त्यांचा सक्रिय पुढाकार होता. १८८५ मध्ये सरकारच्या आमंत्रणावरून तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पी. डब्लू डी. खात्यात नाशिक येथे साहाय्यक इंजिनीअर म्हणून ते रुजू झाले.

१८८९ मध्ये वयाच्या केवळ २९ व्या वर्षी भारतीय सिंचन आयोगाच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक झाली. दख्खनच्या पठारावरील सिंचनाच्या ब्लॉक पद्धतीचे जनक म्हणूनही ते ओळखले जातात. धरणाच्या स्वयंचलित दारांचे आरेखन मांडून त्याचे पेटंट त्यांनी घेतले. या दारांमुळे धरणाला धोका न होता त्याची साठवणक्षमता वाढवणे शक्य होणार होते. अशा प्रकारच्या दारांचा पहिला वापर १९०३ मध्ये महाराष्ट्रात खडकवासला येथे करण्यात आला. पुढे ग्वाल्हेरच्या टिग्रा आणि म्हैसूरच्या कृष्णराजसागर धरणातही अशी दारे वापरण्यात आली. कोल्हापूर येथील लक्ष्मी तलाव म्हणजे राधानगरी धरणासाठीही त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले होते. १९०६-०७ मध्ये भारत सरकारतर्फे एडन येथील पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या अभ्यासासाठी ते गेले. तेथील पाणीपुरवठा व ड्रेनेज योजनेला त्यांचे मार्गदर्शन लाभले.

१९०८ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी विश्वेश्वरैयांनी इंग्रजांच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. इथून पुढे त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वास सुरुवात झाली. यानंतर त्यांनी अमेरिका, कॅनडा, रशिया, इजिप्त इत्यादी देशांचे दौरे करून तेथील औद्याोगिक प्रकल्पांचा अभ्यास केला. काही काळ ते निजामाच्या हैद्राबाद संस्थानात चीफ इंजिनीअर होते. हैद्राबाद शहराला मुसा नदीच्या पुरामुळे होणाऱ्या उपद्रवावर उपाय करून त्यांनी ती समस्या सोडवली. विशाखापट्टणम बंदरास सागरी क्षरण क्रियेमुळे निर्माण होऊ लागलेला धोका टाळण्यासाठी त्यांनी योग्य त्या उपाययोजना सुचवल्या. १९०९ मध्ये म्हैसूर संस्थानाने त्यांना कावेरी नदीवरील कृष्णराजसागर धरणाचे मुख्य अभियंता म्हणून आमंत्रित केले. म्हैसूरजवळचा हा प्रकल्प भारतातील अनेक धरणांसाठी दिशादर्शक ठरला. होस्पेट येथील तुंगभद्रा धरणासही त्यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा >>> बुकमार्क : मन्रो-कथांच्या अ‍ॅलिसनगरीत..

१९१२ मध्ये विश्वेश्वरैया यांना म्हैसूर संस्थानाचे मुख्य दिवाण (म्हणजे पंतप्रधान) म्हणून आमंत्रित करण्यात आले. १९१२ ते १८ अशी सात वर्षे त्यांनी या पदावर कार्य केले. शिक्षण, अर्थ, बँकिंग, उद्याोग, व्यापार, रस्ते, रेल्वे अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी नव्या संस्था व प्रकल्प उभारून मूलभूत बदल घडवून आणले. अल्प कालावधीत आधुनिकीकरण करून त्यांनी म्हैसूर संस्थानाचा अक्षरश: कायापालट घडवून आणला. याचमुळे त्यांना ‘आधुनिक म्हैसूरचे जनक’ मानले जाते. १९१८ मध्ये ते म्हैसूरच्या दिवाणपदावरून स्वेच्छेने निवृत्त झाले. पण नंतरही विविध ठिकाणी त्यांचे कार्य व मार्गदर्शन सुरूच होते. १९३२ मध्ये पूर्ण झालेली व तत्कालीन सिंध प्रांतातील सुक्कूर या गावाला सिंधू नदीतून पाणीपुरवठा करणारी योजना बनवण्याचे कार्य विश्वेश्वरैया यांनी केले होते. डॉ. राजेंद्रप्रसाद सेतू (पूर्वीचा मोकामा पूल) हा उत्तर व दक्षिण बिहारला जोडणारा गंगेवरील महत्त्वाचा पूल आहे. १९५९ मधील या पुलाच्या उभारणीत विश्वेश्वरैया यांचे मार्गदर्शन लाभले होते. १९२७ ते १९५५ पर्यंत म्हणजे वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत ते टाटा स्टीलच्या संचालक मंडळावर होते.

अनेक क्षेत्रांत त्यांनी एवढे महत्त्वाचे योगदान दिले की एकाच व्यक्तीने एकाच आयुष्यात इतके कार्य केले आहे, यावर विश्वास बसू नये. १९१७ मध्ये त्यांनी बंगलोर येथे भारतातील पाहिले शासकीय अभियांत्रिकी कॉलेज स्थापन केले. पुढे भारतात प्रसिद्ध झालेला म्हैसूर साबण (म्हैसूर सोप), म्हैसूर चंदन उद्याोग, भद्रावतीचा म्हैसूर लोह उद्याोग, अनेक बँका, व्यापारी प्रतिषठाने, मुद्रण उद्याोग, वृत्तपत्रे यांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. म्हैसूर रेल्वे, तिरुमला तिरुपती येथील रस्ता इ.ची उभारणी त्यांच्याच योजनेनुसार करण्यात आली होती. त्यांच्या नावावर आठ महत्त्वाचे ग्रंथ असून त्यापैकी भारताची उभारणी (Constructing India) व ग्रामीण भारताचे औद्याोगिकीकरण (Industrialization of rural india) हे दोन ग्रंथ आजही दिशादर्शक आहेत.

१९०६ मध्ये त्यांना दिल्ली दरबारात ‘कैसर- ए -हिंद’ हा किताब तर १९१५ मध्ये ‘नाइट कमांडर ऑफ दि ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर’ हा किताब देण्यात आला. अनेक देशी आणि परदेशी संस्था तसेच विद्यापीठांनी त्यांना विविध पदव्या देऊन त्यांचा सन्मान केला होता. १९५५ मध्ये ९५ व्या वर्षी त्यांना ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा >>> बुकमार्क : अनुरागाचा संस्कृत स्वर…

व्यक्तिश: विश्वेश्वरैया हे शाकाहारी, निर्व्यसनी असून त्यांना साधे राहणीमान आवडे. ते सुधारणावादी विचाराचे होते. पुण्यात ते भांडारकर, गोपालकृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे, इ. थोर सुधारकांच्या सहवासात आले होते. प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि समर्पण ही विश्वेश्वरैयांची मुख्य वैशिष्ट्ये होती. १४ एप्रिल १९६२ रोजी बेंगलोर येथे वयाच्या १०२ व्या वर्षी एम. विश्वेश्वरैय्या यांचा मृत्यू झाला. पण तोपर्यंत ते असंख्य दंतकथांचा विषय झाले होते.

दीर्घायुष्याचे रहस्य विचारल्यावर एकदा ते हसत म्हणाले की ‘मृत्यू जेव्हा जेव्हा भेटायला येई, तेव्हा मला वेळ नसल्याने मी त्याला दारच उघडले नाही.’ एक दंतकथा अशी आहे की ते एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना केवळ रुळांच्या आवाजावरून ४०० मीटर अंतरावरचे रूळ तुटले असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांचा हा अंदाज खरा ठरला. म्हैसूरचे दिवाणपद स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबीयांची एक बैठक घेतली. आपल्या पदाचा कोणत्याही कौटुंबिक कामासाठी वापर केला जाणार नसेल तरच आपण हे पद स्वीकारू अशी अट त्यांनी घातली होती. ते दोन पेन वापरत. एक सरकारी कामासाठी आणि एक खासगी कामासाठी. एवढी नि:स्पृहता आणि तत्त्वनिष्ठा आज काल्पनिक वाटेल, पण त्यामुळेच ते राज्यकर्त्यापासून ते बुद्धिमंतापर्यंत सर्वांच्या आदरस्थानी होते. त्यांच्या मृत्यूनंतर मुद्देनहळ्ळी येथे त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक तसेच संग्रहालय स्थापन करण्यात आले. एखाद्या मंदिराप्रमाणे श्रद्धा आणि निष्ठेने जपले गेलेले हे स्मारक पवित्र व प्रेरणादायी ठिकाण बनले आहे.

१५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘अभियंता दिन’ (इंजिनीअर्स डे) म्हणून साजरा केला जातो. तीव्र बुद्धिमत्ता व बहुमुखी प्रतिभा, समाजाभिमुखता, प्रचंड कार्य, तत्त्वनिष्ठा व दीर्घायुष्य या सर्व गोष्टी एकत्रित असण्याचा योग जगात फारच दुर्मीळ आहे. तसा योग असणारे व जिवंतपणीच दंतकथांचा विषय बनलेले विश्वेश्वरैया आपल्या देशात जन्मले, एवढी गोष्टदेखील केवळ इंजिनीअर्स नव्हे तर प्रत्येक भारतीयास अभिमान वाटण्यास पुरेशी आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about indian engineer bharat ratna mokshagundam visvesvaraya zws