आपल्या पूर्वसुकृतांच्या कृती नंतरच्या काळातही एखाद्या संवेदनशील मनाला कशा सतत झपाटून टाकतात, हे ओडिशातील भारतीय इंग्रजी कवी जयंत महापात्रा यांच्या कवितांमधून सहजपणे कळून येईल. भूतकाळातील आपल्या आणि पूर्वपिढीच्या आठवणी सतत कशा वेगवेगळय़ा पद्धतीने आपला पिच्छा सोडत नाहीत आणि त्यातून एक काव्यात्म अनुभव कसा दृग्गोचर होत राहतो, याचे भान महापात्रांच्या कवितांमधून पुन्हा पुन्हा येत राहते. वयाची चाळिशी जवळ आल्यानंतर महापात्रा कवितेच्या प्रांतात शिरले आणि तिथलेच रहिवासी झाले. त्यातून त्यांच्या कवितांचे २७ संग्रह निर्माण झाले. त्यातील सात कवितासंग्रह उडिया भाषेतील आहेत.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: सी. आर. राव

‘कवितेने मला लोकांवर प्रेम करायला शिकवले’, हे त्यांच्या काव्यविश्वाचे खरे इंगित. त्या कवितांना देश आणि जागतिक पातळीवर मिळालेली दाद हे त्यांच्या लेखी महत्त्वाचे नव्हतेच. कविता हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग होणे, आपल्या श्वासातच तिला स्थान मिळणे, हे त्याहून अधिक जवळचे. ‘रिलेशनशिप’ या त्यांच्या दीर्घ कवितेला १९८१ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. भारतीय कवीला त्याच्या इंग्रजी कवितेबद्दल पुरस्कार मिळणारे ते पहिलेच कवी ठरले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. याशिवाय ‘सार्क साहित्य पुरस्कारा’साठीही त्यांची निवड झाली. त्यांची कविता आणि त्यांच्या अभ्यासाचे विषय कमालीचे निराळे. पदार्थविज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर १९४९ पासून ते अध्यापनाच्या क्षेत्रात गेले आणि १९८६ पर्यंत ते या विषयातील एक नामांकित प्राध्यापक म्हणून काम करीत राहिले.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : सीमा देव

साठच्या दशकात कवितेच्या वळणावर गेलेल्या जयंत महापात्रा यांनी ललित गद्य लेखनही केले. त्याशिवाय उडिया भाषेतील साहित्याचा इंग्रजी अनुवादही केला. १८६६ मधील महादुष्काळाचे साद्यंत वर्णन करणारी त्यांच्या आजोबांची रोजनिशी त्यांच्या कवितेची प्रेरणा बनली. त्यातूनच ‘ग्रँडफादर’ ही कविता जन्मली. नंतरच्या काळात या पूर्वसुकृतांचा काळ त्यांच्यासाठी कविताच बनला. एका वेगळय़ा काव्यात्म पातळीवरील अनुभव त्यांच्या कवितांमधून मिळत असल्याबद्दल समीक्षकांनी त्यांना सलामही केला. ‘हंगर’ आणि ‘इंडियन समर’यांसारख्या अभिजाततेची ओळख करून देणाऱ्या त्यांच्या कवितांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. शांत पण निश्चयी स्वभावाच्या महापात्रा यांच्यासाठी कविता हा जगण्याचा महत्त्वाचा भाग राहिला. आपल्या पूर्वजांच्या मनात शिरून, त्यांच्या भावभावनांना आपलेसे करण्याची क्षमता सिद्ध करणे आणि त्यातून कवितेलाच जन्म देणे, हे त्यांच्या जीवनाचे ईप्सित. जगणे समृद्ध करणारी, नव्या विश्वात घेऊन जाणारी आणि तरीही भारतीयत्वाच्या मुळांना घट्ट धरून ठेवणारी त्यांची कविता जागतिक साहित्यात गौरवली गेली. कविमनाचे म्हणून त्यांची ओळख राहिली, तरीही विचारांच्या पातळीवरील त्यांचा कणखरपणा त्यांनी २०१५ मध्ये आपल्या कृतीनेच सिद्ध केला. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ त्यांनी पद्मश्री हा पुरस्कार सरकारला परत केला होता. वयाच्या ९५ व्या वर्षी झालेले त्यांचे निधन म्हणूनच चटका लावून जाणारे ठरले आहे.