लोकांशी जोडलेल्या नेत्यांना दिल्लीत जाऊन राजकारण करायचे नसते, त्यांना आपली माणसे, आपली मातीच बरी वाटते. केंद्रात हायकमांडच्या तालावर नाचण्यापेक्षा सकाळपासून सामान्यांच्या गराडय़ात रमण्यात त्यांना आनंद वाटतो. ओमान चांडींचे राजकीय गुरू ए. के. अॅण्टनी केंद्रीय संरक्षणमंत्री झाले, पण चांडींनी केरळ सोडले नाही. मुख्यमंत्रीदेखील एका फोनवर लोकांना उपलब्ध असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. ओमान चांडी दोन वेळा केरळचे मुख्यमंत्री झाले, काँग्रेस आघाडीचे सरकार चालवताना सहकाऱ्यांच्या घोटाळय़ांमुळे वादात सापडले. कोणतीही राजकीय अडचण निर्माण झाली तरी, लोकांना भेटणे चांडींनी थांबवले नाही.
जनमानसावर राज्य करणाऱ्या नेत्याची काँग्रेसमध्ये कशी वाताहत होते याची अनेक उदाहरणे आहेत. काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीला वैतागून शरद पवार, ममता बॅनर्जी यांनी प्रादेशिक पक्ष स्थापन केले. ओमान चांडींना तशी गरज भासली नाही. त्यांचे गांधी कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळय़ाचे संबंध होते. त्यांच्या भेटीसाठी चांडींना कधी ताटकळत बसावे लागले नाही. केरळमध्ये ७० च्या दशकापासून के. करुणाकरन, ए. के. अॅण्टनी, वायलर रवी या काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्षाला मजबूत केले. त्यानंतर पक्षाला तारून नेण्याची जबाबदारी चांडींनी पार पाडली. चांडी नेहमीच अॅण्टनींच्या ए गटात राहिले. ते प्रतिस्पर्धी करुणाकरन यांच्या ‘आय’ गटाकडे गेले नाहीत. मुरलेल्या स्थानिक नेत्याप्रमाणे चांडींकडेही मुत्सद्दीपणा होता. २०११ मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसची यूडीएफ आघाडी आणि डाव्या पक्षांची एलडीएफ आघाडी यांच्या संख्याबळात फक्त दोन आमदारांचा फरक होता. तरीही चांडींनी पाच वर्षे सरकार यशस्वीपणे चालवले. करुणाकरन यांच्यानंतर पूर्णवेळ केरळचे मुख्यमंत्री राहिलेले चांडी हे दुसरे! केरळमधील विकासाला चालना देणारा मुख्यमंत्री असा चांडींचा गौरव केला जातो. विद्यमान मुख्यमंत्री व माकपचे नेते पी. विजयन हे अतिजलद रेल्वेमार्गाबाबत आग्रही आहेत, पण त्यांचा प्रस्ताव चांडींनी मांडला होता.
बंदर, विमानतळ अशा पायाभूत विकासाला चांडींनी गती दिली. चांडींची राजकीय कारकीर्द १९७० मध्ये सुरू झाली. वयाच्या २७ व्या वर्षी ते पुथुपल्ली मतदारसंघातून (जिल्हा कोट्टायम) पहिल्यांदा आमदार झाले, पण सलग १२ वेळा मूळ गावातून विधानसभेवर निवडून येत राहिले. चांडी ५३ वर्षे आमदार राहिले. २०१५ मध्ये मुख्यमंत्री असताना पत्रकार परिषदेत त्यांचा आवाज एकदम खालावला. तपासणीमध्ये त्यांच्या स्वरतंतूला गाठ आल्याचे दिसले, ही गाठ नंतर गायब झाली. ते कामात व्यग्र झाले. पुन्हा चांडींना त्रास होऊ लागला. काही वर्षे कर्करोग त्यांच्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत राहिला. गेली काही वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांची प्रकृती खालावली होती. काही महिन्यांपूर्वी ‘भारत जोडो’ यात्रेतही चांडी सहभागी झाले होते. राहुल गांधींसोबत काही अंतर चाललेही. चांडींनी अखेपर्यंत लोककारण सोडले नाही. त्यांच्या जाण्याने लोकप्रिय नेता काँग्रेसने गमावला.