सत्तरीच्या आधी मुंबईतील सिनेमासंगीताच्या विश्वात शब्दपोतडी घेऊन अवतरलेले देव कोहली पुढील वीस वर्षे या प्रांतात केवळ उमेदवारीच करीत राहिले. कारण त्या काळाला कोळून वापरणाऱ्या गीतमक्तेदारांची फौज मोठी होती. पण नव्वदीच्या आगे-मागे बप्पी लाहिरी यांच्या डिस्को-धांगडीचे पर्व मोडून कर्णचमत्कारी वाद्यावळी बाजूला पडलेल्या युगात मात्र, देव कोहली यांची शब्दावली कानाकोपऱ्यांत दुमदुमण्यासाठीच तयार झाली! ‘दिल दीवाना, बिन सजनाके माने ना’, ‘कबुतर जा,’ या ‘मैने प्यार किया’मधल्या गाण्यांचा दरडोई आस्वाद इतका होता की तो चित्रपट आणि त्यातील कलाकारांवर ‘सुपर डय़ुपर हीट’चा शिक्काच अख्ख्या भारताने मारला. देव कोहली याच व्यक्तीने ‘लाल पथ्थर’ चित्रपटातील ‘गीत गाता हू मै, गुनगुनाता हू मै’ हे गाणे लिहिल्याची शंका यावी, असे नंतर या गाणीनिर्मिकाचे कौशल्य हिंदी चित्रसृष्टीने अनुभवले. १९४२ साली आताच्या रावळिपडीत जन्मलेल्या देव कोहली यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : जयंत महापात्रा

डेहराडून येथे (पण साध्याच शाळेत) शिक्षण पूर्ण करून त्यांनी १९६४ साली मुंबईची वाट धरली. चित्रसृष्टीत काम शोधताना त्यांना गीतलेखनाची संधी मिळाली. किशोर कुमार यांनी गायलेल्या ‘गीत गाता हूँ मै’वर पसंतीचा शिक्का बसला. पण तो फार काम देऊ शकला नाही. कारण गुलजार यांच्यापासून मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षींपासून शैलेंद्र यांच्यापर्यंत गीतकारांची फळी आधीच भक्कम होती. मग मुंबई शहराच्या आणि हिंदी चित्रसृष्टीच्या एका संक्रमणकाळात ‘म्युझिकल रोमान्सिकां’चा उदय झाला. ‘कयामत से कयामत तक’, ‘आशिकी’ या कान बदलू पाहणाऱ्या संगीतपटांच्या रांगेत ‘मैने प्यार किया’ची गाणी लोकप्रिय झाली. पुढे राम-लक्ष्मण आणि देव कोहली यांच्या एकत्र येण्यातून या तिघांचीही संगीत कारकीर्द झळाळून उठली. पण अन्नू मलिक यांच्या सुपरहीट कामांनाही वाट मिळाली तीही देव कोहली यांच्या रचनांद्वारे. चित्रसंगीत अतिगंभीरतेने ऐकण्याच्या कालावधीतच ‘बाजीगर’ चित्रपटातील ‘ये काली काली आँखे’ आणि ‘बाजीगर ओ बाजीगर’ ही गाणी सार्वजनिक कार्यक्रमांत लाऊडस्पीकरवर लावली जात.‘सुपरहीट मुकाबला’ किंवा ‘एक से बढकर एक’ या राष्ट्रीय वाहिन्यांवरील कार्यक्रमांमधील या गाण्यांविषयीचे क्रमांक- कुतूहल काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सारखेच राहिले होते. ‘हम आपके है कौन’ या चित्रगीत-पटाने कोहलींच्या शब्दांवर लोकप्रियतेचा कळस गाठला.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: सी. आर. राव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढल्या काही वर्षांत कोहलींची ‘टन टनाटन टनटारा’ आणि ‘साकी साकी रे’ आदी हीट फॅक्टरी सुरू असताना काही आधुनिक अश्लीलमरतडांनी एका गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेत फिर्याद दाखल केली. ‘कुदरत’ (१९९८) चित्रपटातील या गाण्याचा वाद नंतर इंदीवर यांनी त्या काळातच लिहिलेल्या ‘निली निली आँखे मेरी’ या गाण्याप्रमाणेच शमला. पुढेही देव कोहली लोकप्रिय गाणी लिहीतच राहिले. पण नव्वदीच्या दक्षिण आक्रमणी संगीताच्या घुसळणीतही पारंपरिक हिंदी गीतांचा बाज जपणारे गीतकार म्हणून देव कोहली त्यांच्या निधनानंतरही (मृत्यू- २६ ऑगस्ट) बराच काळ लक्षात राहणार आहेत.