दिवंगत सरन्यायाधीश पी. एन. भगवती हे जरी ‘आणीबाणीतले इंदिरासमर्थक’ म्हणून ओळखले जात असले तरी सरन्यायाधीश पदावरील उण्यापुऱ्या दीड वर्षांच्या (जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६) कारकीर्दीत जे महत्त्वाचे निकाल त्यांनी दिले, त्यांत एक होता केरळमधील सीरियन कॅथलिक महिलांना ‘भारतीय वारसाहक्क कायदा- १९२५’ नुसार वडिलार्जित संपत्तीत पुरुष वारसांइतकाच वाटा मागण्याचा अधिकार असल्याचा. हा निकाल ज्या महिलेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन मिळवला, तिचे नाव मेरी रॉय- लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय ही त्यांची मुलगी. मेरी यांचे निधन २०२२ मध्ये झाले, त्यानंतर तीन वर्षांनी त्यांच्याबद्दल अरुंधती यांनी लिहिलेले ‘मदर मेरी कम्स टु मी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. स्वत:च्या आईबद्दलचे आणि निव्वळ चरित्रपर नसून लालित्यही जपणारे लिखाण भावनिकच असणार, या भारतीय समजाला छानपैकी फाटा देणारे पहिले गाजलेले पुस्तक म्हणजे जेरी पिण्टो लिखित ‘एम अॅण्ड द बिग हूम’; पण दुसरे मात्र अरुंधती यांचेच ठरेल. (मराठीतलं असं वडिलांबद्दलचं पुस्तक मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांनी लिहिलं होतं- ‘खरे मास्तर’) ही दोन्ही – किंवा तीन्ही- पुस्तके एकप्रकारे, त्या त्या लेखकांच्या घडत्या वयाच्या कहाण्याही आहेत. सध्या अर्थातच अरुंधती रॉय यांच्या पुस्तकाबद्दल.
पुस्तकाची सुरुवात आईच्या निधनापासून होते, पुस्तक आठवणींत मागे जाते, ते आसामच्या कुठल्याशा दुर्गम चहामळ्यातून १९६२ च्या युद्धावेळी अरुंधतीच्या आईवडिलांना- मेरी आणि राजीब मायकल (ऊर्फ मिकी) रॉय यांना कोलकात्यात यावे लागते, तेव्हापासून. वडील कुटुंबाला ‘तुलनेने सुरक्षित’ अशा कोलकात्यात सोडून चहामळ्यात त्यांच्या नोकरीसाठी परत जातात, तेव्हाच मिसेस मेरी (पुस्तकात आईचा उल्लेख ‘मिसेस मेरी’ असाच आहे) ठरवतात की बस्स झालं. शिक्षिका होण्यासाठी आपण शिकलो, तर आता नाही तिकडे चहामळ्यात परतायचं. दोन मुलं – अरुंधती आणि थोरला ललितकुमार ख्रिास्टोफर रॉय- पदरात घेऊन मेरी थेट उटकमंडला येतात. या ‘ऊटी’मध्ये मेरी यांच्या माहेरच्या इसाक कुटुंबाचे एक छोटंसं कॉटेज असते, तिथं अर्ध्या भागात भाडेकरू ठेवून उरलेला अर्धा भाग इसाक कुटुंबाने सुट्टीत येण्यासाठी स्वत:कडे ठेवलेला असतो, तिथे राहू लागतात. तिथल्या शाळेत नोकरीही मिळवतात. पण मेरी दमेकरीण. त्यांच्या तब्येतीला ऊटी मानवत नाही, तरीही तिथंच राहतात- स्वत:चे आजोबा आणि काकाच या छोट्या घरावर तुझा काही हक्क नाही, असे बजावायला आल्यानंतर मात्र नाइलाज होतो. केरळमध्ये कोट्टायमजवळच्या एका गावात बहिणीकडे मेरी येतात, ऊटीचे ते घर हक्कानं मिळवायचंच असे ठरवून. त्या निश्चयासाठी दिलेल्या लढ्याचे एक लोकोपयोगी फळ म्हणजे सरन्यायाधीश भगवती यांनी २४ फेब्रुवारी १९८६ रोजी दिलेला निकाल! पण त्यानंतरही तांत्रिक खुसपटे – या घराचे वाटे करता येणार नाहीत, संबंधित सर्वांची संमतीपत्रे लागतील वगैरे- काढून, खालच्या कोर्टांकडून प्रत्यक्ष ताबा नाकारलाच जातो. तरीही मेरी झगडत राहतात. हायकोर्ट, मग पुन्हा जिल्हा न्यायालय… अखेर २००९ मध्ये त्या (एव्हाना रया गेलेल्या) घराचा ताबा नाही; पण घर/ जमीन विकून आलेल्या पैशांतला समान वाटा मिळतो… दोन कोटी रुपये! ही अख्खी रक्कम मेरी समाजिक कार्यासाठी दान करून टाकतात… कारण एव्हाना त्या ‘पल्लिकूडम्’ ही शाळा स्थापून, नावारूपाला आणून स्वत:देखील शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झालेल्या असतात.
या पल्लिकूडम् शाळेची कीर्ती आजही आहे- तरणतलाव, मोठा अॅथलेटिक ट्रॅक आणि थोर पर्यावरणवादी वास्तुरचनाकार लॉरी बेकर यांनी संकल्पित केलेली इमारत, असा या शाळेचा थाट. पण मेरी यांनी ही शाळा सुरू केली, रोटरी क्लबच्या जागेत. स्वत:चा मुलगाच ऊटीमध्ये एकदा ‘इंडियन मुलं कशी असतात ना… ’ असे काही बोलला होता, एवढ्या एका कारणासाठी तिथल्या हायफाय शाळेतून पोराचे नाव काढून टाकून दुसऱ्या शाळेत घालणाऱ्या मेरी यांनी ‘इंग्रजीपेक्षा मातृभाषा मल्याळीतूनच तिसरीपर्यंत शिकवलं जाईल. इंग्रजी अक्षरओळख करून देऊ या मुलांना. पाचवीपासून मात्र इंग्रजी माध्यम’ असे विचार या शाळेद्वारे प्रत्यक्षात आणले. अभ्यासक्रम, परीक्षा यांचे बंधन न घालता विद्यार्थ्यांना स्वबुद्धीने, स्वभाषेत विचार करायला शिकवले. पुढे एका टेकाडावर जागा घेतली, तेव्हापासून या शाळेची आजची भरभराट झाली.
‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या अरुंधती रॉय यांच्या पहिल्याच आणि ‘बुकर’विजेत्या कादंबरीतले तपशील वास्तवातही होते, हे या पुस्तकामुळे समजत असल्याचा अभिप्राय अनेक समीक्षकांनी दिला आहे. पण ख्रिास्तीपणा, घटस्फोटित आई आणि घटस्फोटित आजी, घरातले वाद, कुटुंबांतर्गत हिंसा… अशा खासगी तपशिलांमुळे याच पुस्तकाआधारे अरुंधती रॉय यांच्याबद्दलच्या द्वेषोक्तीमध्ये भर पडू शकते… अर्थात अशा द्वेषोक्तीला अरुंधती घाबरत नाहीत; पण त्यामागचे कारण पुस्तकातूनच समजते… मेरी रॉय यांची मुलगी आहेत त्या!