नारायण धारप हे भयकथा लेखक म्हणूनच परिचित, पण त्यांनी सुरुवातीला विज्ञानकथा प्रांतात उमेदवारी केलेली दिसते. लघुकथांचे वावडे नसलेल्या १९६० पूर्वीच्या आणि लघुकथा म्हणजे वाईट या साठोत्तरी लेखकरावांच्या निदानानंतरही मराठीत सर्व काळात सर्वाधिक लिहिल्या-वाचल्या गेल्या त्या कथाच. भावभावनांच्या कल्लोळासह ‘भावस्पर्शी’, ‘हृदयस्पर्शी’, ‘स्त्रीहुंकार’ (किंवा पुरुषभुंकार!) आदी प्रकारच्या गोष्टीचाकांवर मासिके तगली. यांत ‘विज्ञानकथा’ हा धूमकेतू नारळीकरांमुळे अधिक चमकला. नंतर बराच ओळखीचा झाला तो सुबोध जावडेकर, निरंजन घाटे, बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे यांच्याप्रमाणेच अरुण मांडे यांच्या लेखनसातत्यामुळे. मांडे यांचा लिहिण्याचा पैस किती मोठा, हे साहित्याच्या मुख्य धारेत रमणाऱ्यांना पूर्णांशाने कधीच कळले नाही. त्यांचा जन्म कल्याणचा, मूळ गाव संभाजीनगरमधील सावखेडा, शिक्षण नागपुरातले आणि नगरमध्ये हयातभर पेशाने डॉक्टरकी करता करता विज्ञानकथा आणि विज्ञानविषयक लेखनाला त्यांनी वाहून घेतले. पण त्या जोडीला आपल्या वैद्याकीय अनुभवांची शिदोरी पुस्तकरूपाने त्यांनी पुरवली; तीच त्यांची जनलोकांतली ओळख ठरली! ऑफिसमध्ये फिटनेस कसा राखायचा, टीनएजर्सनी आरोग्यमंत्र कसा जपावा अशा वेगवेगळ्या गटांसाठी पुस्तकेही त्यांनी विचारपूर्वक निवडली. मायकेल क्रायटन, राम बक्षाणी, स्टेफनी मेयर, आर्थर हेली, पॉल गालब्रेथ अशा किती तरी लेखकांचे अनुवाद त्यांनी केले. अनुवाद विषयांची वर्गवारी करायची झाली तर कादंबरी, हेरगिरी, कथा… यांखेरीज योग, आहार, कर्करोग, पाठदुखी, पक्षाघात, निसर्गोपचार, वनौषधी, अर्धशिशी- डोकेदुखी, तणाव अशी विविधांगी.
पण शैलीदार स्वतंत्र विज्ञानकथा लिहिणारे लेखक ही मांडे यांची ओळखदेखील पुसता न येणारी. त्यांच्या कथांमध्ये बोचरा उपरोध दिसतो. त्यांच्या लेखनाचा बाज धारप यांनी अचूक ओळखला. त्यामुळे ‘अमाणूस’ या संग्रहाच्या प्रस्तावनेत धारपांनी म्हटले की, ‘मांडेंची कथा कल्पनेवर कधीही आक्रमण न करणारी, अत्यंत नैसर्गिक नर्मविनोद. तो कृत्रिम नाही, प्रच्छन्न नाही, ओढूनताणून आणलेला नाही.’ याच प्रस्तावनेत धारपांनी मांडे यांचे अनेक विज्ञानकथा संग्रह प्रसिद्ध होतील, असे म्हटले आणि ते पुढे खरेही झाले. त्यांची लेखणी किती उपहासात्मक लिहू शकते त्याचा प्रत्यय ‘अमाणूस’ आणि ‘रोबो कॉर्नर’ हे विज्ञान कथासंग्रह वाचताना येतो. अमाणूस कथेत एक यंत्रमानव निवडणुकीला उभा राहतो. त्यानिमित्ताने भारतातील निवडणूक प्रक्रिया, उमेदवारांची निर्बुद्ध भाषणे, लोकसभेतले खासदारांचे यांत्रिकपणे वावरणे, या सगळ्यांची टिंगल दिसते. ‘शेवटची कथा’ या कथेतील लेखकाची मूळ कथा कळत नाही. मासिकात प्रसिद्ध झालेल्या कथेवरील प्रतिक्रियांमधून ती उभी राहते.
नारायण धारप गेल्यानंतर त्यांची ‘रावतेंचा पछाडलेला वाडा’ ही अर्धी कादंबरी त्यांनी त्यांच्या तंतोतंत शैलीत पूर्ण केली. हा प्रयोग मराठीत एकमेव असा! मराठीत कथा आणि कादंबऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या बहुतांश पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले.
हिंदीत त्यांची ‘ड्रॅगनके अंडे’ कथा खूप गाजली. वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत लिहिती राहिलेली ही लेखणी मृत्यूमुळे परवा विझली असली तरी त्यांची विज्ञानदृष्टी त्यांच्या पुस्तकांतून अनेक वर्षे तेवत राहील, यात शंका नाही.