भाई माधवराव बागल यांनी तर्कतीर्थांच्या अनावृत्त पत्रास दिलेले अनावृत उत्तर लगेचच साप्ताहिक ‘मौज’च्या २३ सप्टेंबर, १९५६ च्या अंकात प्रकाशित झाले. त्यात भाई माधवराव बागल यांनी लिहिले होते की, आपले ता. १६ सप्टेंबर, १९४६ च्या ‘मौजे’तील अनावृत पत्र वाचावयास मिळाले. आपण कळकळीने विचार मांडले याबद्दल आभार. या विचारांची सर्वांनाच आवश्यकता आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर आपला तीव्र मतभेद असला, तरी अनावृत पत्रात ज्या गोष्टींची आपण अपेक्षा केली आहे, त्याबद्दल समंजस माणसात मतभेद होणार नाहीत. माझ्यात नि आपल्यात तर नाहीच नाही. आपण ज्या संयमाने लिहिले आहे, तितका संयम मला पाळता येणे फार अवघड आहे. मी जात्याच भावनामय कलावंत आहे आणि आपण तत्त्वज्ञ! तुमची व माझी संस्कृती निराळी आहे, संस्कार निराळे आहेत. तथापि, ज्या मूल्यांची आपण अपेक्षा करता, ती फार मोलाची आहेत. कारण, यात मानवता आहे. ती कशी टाकता येतील?
बहुसंख्य समाजाचे आचार-विचार आणि विशेषत: भावनेच्या भरात सापडल्यानंतरचे त्यांचे आचार विचारपूर्वक होत नसतात. खालचा समाज हा बालमनाचा असतो. तो ‘एका गालात थोबाडी मारली म्हणजे दुसरा गाल पुढे करणारा नसतो,’ म्हणून बहुजन समाजाच्या आचार-विचारांकडे पाहताना विचारवंतांनी वरच्या पातळीतून पाहणे आणि त्यांना दोष देत सुटणे चुकीचे आहे. सुज्ञांनी त्यांना मार्ग दाखविला पाहिजे. अज्ञानी भावनामय समाजाला एकदम आरोपीच्या पिंजऱ्यात टाकू नये.
सर्वसामान्य जनतेच्या आकांक्षा अवमानून ज्या शहाण्यांनी त्या चिरडून टाकल्या, त्यांनीच आत्मपरीक्षण करायला हवे. या भावना चेतविण्याला आणि जनतेच्या अविचारी कृत्याला तुमचीच बेजबाबदार कृती कारणीभूत झालेली आहे. त्यांचा तोल सुटला तर सर्वसामान्य मनुष्याच्या स्वभावाला तो सोडून नाही, हे तुम्ही जाणले पाहिजे. ते अपराधी आहेतच; पण तुम्ही त्यांच्याहून दसपटीने अपराधी आहात!
तर्कतीर्थ, मनुष्य स्वभावातच हे दुर्गुण आहेत. जगाच्या अंतापर्यंत हे असेच चालायचे; पण हे सर्व दुर्गुण काँग्रेस पुढाऱ्यांत असल्याचे निदर्शनास आले आहे. हिरे-चव्हाणांच्यातील (भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण) फूट, त्यांची सत्तेची धडपड यामुळे त्यांचे प्रदर्शन भरपूर झाले आहे. स्वार्थासाठी वरिष्ठांच्या तालावर (पंडित नेहरू) नाचण्यापेक्षा त्यांनी काय केले आहे? माफ करा तर्कतीर्थ, माझी कलावंताची लेखणी आपल्याइतका संयम येथे राखू शकत नाही. माझ्या मराठी मनाला ही प्रतारणा सहन होत नाही.
बाकी मानवी मूल्ये मी जाणतो. राजकीय क्षेत्रात आज आपण शत्रू असलो तरी व्यक्तिगत जीवनात तर्कतीर्थ हे माझे जिव्हाळ्याचे मित्रच राहतील. म्हणूनच मी माझ्या घरी चार घास घ्यावेत म्हणून आपणास आमंत्रण दिले होते. ते संबंध राजकारणामुळे तुटणार नाहीत.
बाकी माझ्या स्वभावाबद्दल म्हणाल तर या चळवळीत मला कसलाही व्यक्तीविषयक स्वार्थ साधून घ्यावयाचा नाही. मी पुढारी नाही. होण्याची इच्छा नाही. निवडणुकीला मी उभा राहणार नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीचा एक शिपाईगडी एवढीच माझी भूमिका राहील.
एवढीच इच्छा होती की, मी आणि तर्कतीर्थ हातात हात घालून संयुक्त महाराष्ट्राचा प्रचार करावा, सारे रान उठवावे आणि सत्तेच्या जबड्यातून महाराष्ट्राला बाहेर काढावे! पण तो सहकार्याचा हात तुटला! आता थोट्या हातानेच मी लढणार! पण सत्तेच्या, संपत्तीच्या किंवा मोहाच्या आहारी नाही जाणार, मित्राच्या भिडेस नाही बळी पडणार!
मूळ अनावृत पत्र आणि हे अनावृत उत्तर महाराष्ट्राच्या एकेकाळच्या सभ्य, सुसंस्कृत राजकारणातील मतभेदपूर्ण मैत्रीचे उदाहरण म्हणून जसे अनुकरणीय ठरते, तसेच तत्त्वज्ञ आणि कलावंतामधील वैचारिक जुगलबंदी म्हणून तिच्याकडे पाहता येते. मराठी साहित्यात आचार्य अत्रे आणि वि. स. खांडेकर यांच्यातील टोकाच्या दीर्घ मतभेद काळानंतर झालेला समेट महाराष्ट्र जाणतो. या उपरोक्त अनावृत पत्रव्यवहाराइतकाच त्याचा उत्तरपक्ष हृद्या ठरला. तो पुढील भागात वाचू. तोही या संदर्भातील सांस्कृतिक वस्तुपाठच आहे.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com