तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि भाई माधवराव बागल यांचे सख्य मतभेदपूर्ण असले तरी त्यातील पुरोगामित्वाच्या धाग्याने हा ऋणानुबंध त्यांच्याच शब्दात सांगायचा, तर ‘नातलग’ पातळीपर्यंत घनिष्ठतेच्या कसोटीवर पोहोचलेला होता. उभयता एकमेकांकडे राहत. एकत्र भाषणे देत. एकमेकांबद्दल त्यांनी गौरवलेख, प्रस्तावना, अनावृत्त पत्रे लिहिली आहेत. भाई माधवराव बागल (१८९५- १९८६) यांची षष्ट्यब्दीपूर्ती साजरी होत असतानाच्या काळात तर्कतीर्थांनी शुभचिंतन करीत साप्ताहिक ‘मौज’च्या २७ मे, १९५६ च्या अंकात ‘साठीच्या उंबरठ्यावरील तरुण : माधवराव बागल’ शीर्षक लेख लिहिला होता. यात भाई माधवराव बागल ज्यांनी पाहिले, ऐकले, अनुभवले आहेत, त्यांना तर्कतीर्थांचं लेखनकौशल्य प्रत्ययास आल्याशिवाय राहणार नाही.

माधवराव बागल यांचे मन अजून तरुण व शरीर ताठ होते. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात त्यांना विशिष्ट स्थान होते. ‘पाणीदार टपोरे डोळे, खादीचा परंतु नीटनेटका पोषाख, फरची उंच टोपी, वगैरे ढब पाहून माणूस त्यांच्यावर खूश होतो.’ बागलांचा कोल्हापूरच्या राजकारणाशी व सामाजिक चळवळीशी दोन पिढ्यांचा संबंध होता. त्यांचे वडील खंडेराव बागल हे छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारातील एक प्रस्थ होते. भाई माधवराव बागल यांच्या जीवनकार्याकडे पाहता प्रजा परिषद, संयुक्त महाराष्ट्र समिती, सत्यशोधक चळवळ, ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ अशी चार पर्वं दिसून येतात. तर्कतीर्थांचा भाईंशी प्रथम संबंध आला तो कायदेभंगाच्या चळवळीतून. तो १९६६ पर्यंत होता; पण शेवटपर्यंत टिकून राहिला. सत्यशोधक चळवळ व ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीच्या युक्तिवादाची परिणती म्हणजे उभयतांतील मैत्री. तिचे तात्पर्य तर्कतीर्थांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘‘ब्राह्मणी वर्चस्वाला महात्मा गांधींच्या चळवळीने पूर्णपणे सुरुंग लावला आहे. बहुजन समाज तिच्यात भाग घेऊ लागला आहे. त्यामुळे बहुजन समाजातही नवे नेते निर्माण होऊ लागतील व ब्राह्मणी वर्चस्व संपुष्टात येईल. बहुजन समाजातील अज्ञान हे ब्राह्मणांपेक्षा भयंकर आहे. ते नष्ट झाले तर ब्राह्मणी वर्चस्व नष्ट होईल. कारण, ब्राह्मण केवळ शिक्षणानेच पुढारलेला आहे.’’ तर्कतीर्थांचे हे तत्कालीन निरीक्षण आणि निष्कर्ष.

राजकारणाशिवाय माधवरावांच्या जीवनाचे इतरही पैलू चमकदार होते. माधवराव मोठे लेखक होते. स्वत:स बहुजन समाजातला म्हणवून घेणाऱ्यांमध्ये माधवरावांइतके विपुल लेखन करणारा कोणीही नाही. महाराष्ट्रातील लहान-मोठी वृत्तपत्रे व मासिके गेली ३० वर्षे माधवरावांच्या निर्मळ व सुबोध लेखनाने वारंवार सजलेली आढळतात. माधवराव निसर्गाचे देखावे रंगविण्यात अत्यंत कुशल होते. त्यांच्या नयनमनोहर कृती (चित्रे) कोल्हापुरातील एका सार्वजनिक दिवाणखान्यात मांडलेल्या पाहावयास मिळतात. (सध्या त्यांचे स्थलांतर शिवाजी विद्यापीठात झाले आहे.) आपल्या या चित्रकलेच्या साधनेतून मिळणाऱ्या आनंदाबद्दल भाईंनी आपल्या ‘कला आणि कलावंत’ ग्रंथात लिहून ठेवले आहे की, ‘‘दरिद्री कलावंताचे जीवनसुद्धा ऐश्वर्यसंपन्न असते. त्यांना प्राणधारणेपुरता आधार झाला की, ते समाधानी राहतात. कोट्यधीशांना जन्मोजन्मी न आढळणारा आनंद ते भोगू शकतात. उच्च प्रतीच्या वातावरणात, उच्चतर विचारांच्या मनोभूमिकेत ते तरंगत असतात. यातून देशाची संस्कृती बनत असते, देशाचा दर्जा ठरत असतो.’’

माधवरावांच्या जीवनातील व्यक्तिगत शल्यही तर्कतीर्थांनी या लेखात टिपले आहे. ते वाचत असताना हा ‘शापित राजहंस’ होता, हे लक्षात येते. छत्रपती शाहू महाराज होते, तोवर त्यांना कौटुंबिक स्वास्थ्य थोडेबहुत भोगावयास मिळाले. उत्तरकाळ आर्थिक विवंचनेत गेला. पत्नीच्या आजाराच्या विवंचनेत मोठा काळ गेला. मात्र, एकपत्नी व्रत त्यांनी कसोशीने पाळले. भाई माधवराव बागल यांच्या ‘जीवनप्रवाह’ आत्मचरित्रास तर्कतीर्थांची हृद्या प्रस्तावना आहे. ‘‘कोल्हापूर राज्यातून (संस्थान) एक छोटेखानी लोकसत्ताक राज्य निर्माण करू पाहणारा कारागीर म्हणजे माधवराव बागल. …बागलांनी आपल्या लेखनाने सत्यशोधक चळवळीला नव्या ध्येयवादाचा पुरवठा केलेला आहे… ते ध्येयवादी व पुरोगामी अद्यायावत विचारांचे आहेत, याची खूण येथील कपाटांत भरलेल्या पुस्तकांवरून पटते. (हा संग्रहही शिवाजी विद्यापीठ पुराभिलेख ग्रंथालयात वाचनार्थ उपलब्ध आहे.) बागल हे स्वभावाने समन्वयवादी आणि भावनामय आहेत. ते मूर्तिपूजक आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांचे त्यांनी कोल्हापुरात उभारलेले पुतळे याची साक्ष देतात,’’ असे त्यात त्यांनी म्हटले आहे.

drsklawate@gmail.com