राजेश बोबडे

‘भूमि विश्वस्त योजना’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची योजना होती. महात्मा गांधी यांनी ‘सब भूमि गोपालकी’ हा मंत्र दिला, तर विनोबा भावे यांच्या ‘भूदान’ चळवळीने देशातील भूपतींना भूदानाचे महत्त्व पटवून जमिनीच्या फेरवाटपाचे महान कार्य केले. महाराज म्हणतात : ‘सब भूमि गोपालकी’ असे पूज्य गांधीजी म्हणत असत. ‘देह हा देवाचा, वित्त कुबेराचे’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या भूमीत तर हा सिद्धांत मुळीच नवा नाही. ‘राष्ट्रधनाचे सर्वचि वाली’ ही गोष्ट समाजवादाच्याच नव्हे तर अध्यात्माच्या व धर्माच्या दृष्टीनेही तितकीच यथार्थ आहे. प्रत्येकाने परिश्रम करून राष्ट्राच्या संपत्तीत भर टाकली पाहिजे आणि सर्वांनीच न्यायाने वाटा घेऊन सुखी झाले पाहिजे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९४६ पासून ग्रामसुधारणेचा व पुनर्रचनेचा प्रश्न श्रीगुरुदेव सेवामंडळाद्वारे हाती घेतला. गावातच सर्व सुखसोयी निर्माण करायच्या, शिक्षण-न्यायदानादि कार्ये संघर्ष न वाढू देता प्रेमाच्या मार्गाने यशस्वी करायची व नमुनेदार गावे बनवून हे क्रांतीचे एक सुंदर उदाहरण जगासमोर ठेवावयाचे. त्यात ओघानेच ग्रामीण जनतेची शक्ती, संपत्ती, धान्य, शेती वगैरे एकत्र करून सर्वांना त्याद्वारे समान सुखी व उन्नत करण्याचा प्रश्न समोर आला; आणि हे कार्य करीत असताना आमगाव (जि. भंडारा) येथे गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवून देशातील प्रथम आदर्श गाव म्हणून महाराजांनी आमगावला नावारूपास आणले. त्यांचा हा आदर्श ग्रामाचा प्रयोग पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री यांनी देशपातळवीर नेला.

हेही वाचा >>> चिंतनधारा : प्रचारक कसा असावा!

याच आदर्श आमगावापासून ‘भूमि विश्वस्त योजना’ महाराजांनी सुरू केली. सामुदायिक शेती, सामुदायिक धान्यभांडार अशा योजनांसह भूमिवितरणाच्या या कार्याचे वारे वेगाने संचारले. सर्व जमिनी, घरेदारे सर्वांच्या मालकीच्या करण्यासाठी आमगाव व काही इतर गावातील जनता प्रतिज्ञापूर्वक पुढे येऊ लागली. तुकडोजी महाराजांच्या १९४६ मधील ‘भूमि विश्वस्त योजने’चा विस्तार बिहार, ओरिसासह अन्य प्रदेशांतही पोहोचला. श्रीमंत, जमीनदार वा ज्यांच्या अंत:करणात श्रमजीवी मजुरांबद्दल आदर आहे असे धनिक यांनी आपल्या जमिनीचा ठरावीक हिस्सा त्या गावात मजुरांमधून मुक्रर झालेल्या समितीला द्यावा. सुरुवातीस जमीन दान देणाऱ्या सद्गृहस्थांनी ते मजूर शेतीसाठी स्वतंत्र पायावर उभे राहीपर्यंत अर्थसाहाय्य स्वरूपाचे द्यावे. त्या जमिनीत मजुरांनी काम करावे व उरलेल्या वेळात इतरत्र मजुरी करावी. त्या गावातील जे मजूर सत्प्रवृत्तीने वागणारे व नैतिकता, प्रामाणिकपणा, कामाची आवड असणारे असतील त्यांनाच अशा योजनेत प्राधान्य मिळेल; इतर मजुरांचा विचार सध्याच करता येणार नाही. पण त्यांनी आपल्या वर्तनात दुरुस्ती केल्यास तेही त्या जमिनीचे हक्कदार होतील. या भूमि विश्वस्त योजनेतून शेकडो एकर जमिनीचे दान जमीनदारांनी भूमिहीनांसाठी दिले.

महाराजांनी रचलेल्या ‘भूमिदानाला देवोनि चालना, करू खेडय़ाची मिळोनी रचना।’ या भजनाचा आशय अशा प्रकारे प्रत्यक्षात उतरला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com