धुवांधार पाऊसबरसायला लागतो, काळ्या मेघांनी आकाश दाटून आलेले असते आणि सृष्टीत सगळीकडे एक समाधान निथळू लागते तेव्हा या चिंब पावसाळी दिवसातली काही गाणी भोजपुरी भाषेत आहेत. ‘कजरी’ या प्रकाराने ती ओळखली जातात. विविध अंगांनी वर्षा ऋतूचे वर्णन या गाण्यांमध्ये करण्यात आले आहे. काही ‘कजरी’मध्ये मीलनाचे भाव तर काहींमध्ये विरहाची आर्ततापण या सगळ्या भावनांना पार्श्वभूमी आहे ती मात्र ओलेचिंब करून टाकणाऱ्या पावसाची.
सखिया सावन बहुत सुहावन,
मनभावन अइलन मोर।
एक त पावस खास अमावस,
काली घाटा चहुँओर।
पानी बरसत जिअरा तरसत,
दादुर मचावन सोर।
ठनका ठनकत झिंगुर झनकत,
चमकत बिजली ताबरतोर।
ही रचना भिखारी ठाकूर यांची आहे. पण अशा अनेक रचना ‘कजरी’च्या रूपात आढळतील. मालिनी अवस्थी, कल्पना पटवारी, दीपाली सहाय या गायिकांनी ‘कजरी’च्या माध्यमातून खास लोकभाषेचा लहेजा आपल्या स्वरांमधून व्यक्त केला आहे. या भाषेत तिथल्या परिसराचा एक गंध आहे.
लोकभाषेचं अस्तित्व संकटात असणं आणि त्या जोडीने जिवंत राहण्यासाठी लोकसंस्कृतीचा संघर्ष चालू असणं या गोष्टी भारतभरात अनेक ठिकाणी दिसून आल्या आहेत. यापुढेही त्या दिसून येतील. बिहार हे तसे अनेक भाषा असणारे राज्य. भोजपुरी, मैथिली, मगही या तीन भाषा या राज्यातल्या वेगवेगळ्या भागांत बऱ्यापैकी बोलल्या जाणाऱ्या. यातली मैथिली संविधानाच्या आठव्या अनुसूचीत आहे तर भोजपुरीचा समावेश व्हावा अशी मागणी त्या भागातून सातत्याने होत राहते. उत्तरेतल्या अनेक राज्यांमध्ये हिंदीच्या प्रभावाखाली झाकोळून गेलेल्या भाषांची संख्याही बरीच आहे. स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या भाषांना हिंदीच्या बोली म्हणून सांगण्याचे, खपवण्याचे राजकारण सर्रास चाललेले असते. भोजपुरी ही केवळ बिहारच्या काही भागांतच बोलली जाते असे नाही. जगाच्या पाठीवर ती वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचली आहे आणि आता तर भोजपुरी गाण्यांनी अक्षरश: कहर केला आहे. या गाण्यातली उत्तानता, अश्लीलतेकडे झुकणारी या गाण्यांची शब्दरचना यामुळे आज भोजपुरी गाणी सर्वत्र धुमाकूळ घालत असतात. कोणताच आशय नसलेली, ‘छलकता हमरो जवानिया’ किंवा ‘बलमुआ के बल्लम’ यासारख्या गाण्यांना साठ कोटींपर्यंत ‘व्ह्यूज’ असतात. यामुळे होतं असं की भोजपुरी गाणी म्हणजे निव्वळ धांगडधिंगा असाच अनेकांचा समज असतो. त्यापलीकडेही भोजपुरी भाषेच्या साहित्यात बरंच वेगळं काही आहे. प्रचलित भोजपुरी गाण्यांच्या फेसाळणाऱ्या सप्तरंगी बुडबुड्याखाली असलेली ही सघन साहित्यनिर्मिती तिथल्या समाजमनाच्या भावभावनांचे प्रतिबिंब असणारी आहे. लोकनाट्याशी साधर्म्य असणारी बिदेसिया नाट्यशैली आणि काही गीतांच्या माध्यमातून भिखारी ठाकूर (१८८७ ते १९७१) यांनी या भाषेला सर्वदूर पोहोचवलं.
भिखारी ठाकूर यांचं गाव कुतूबपूर. आरा, छपरा हा इलाखा हेच त्यांच्या भोजपुरीचं क्षेत्र आहे. गंगा, शरयू, आणि सोन या नद्यांचे खोरे असलेला हा परिसर. पुरात वाहून जी माती येते त्या मातीत काही वाळूचेही कण असतात. भोजपुरीत त्यासाठी ‘छाडन’ असा शब्द वापरला जातो. मराठीत अशा जमिनीला ‘वाळसरा’ म्हणतात.
भोजपुरी समाज मुख्यत्वे शेतीवर आधारलेला. ब्राह्मण, भूमिहार, राजपूत यांची संख्या कमी, पण बहुतांश जमिनी याच वर्गाच्या ताब्यात. ज्या खालच्या जाती आहेत त्यांची जमिनीवर असलेली मालकी अत्यंत अपवादात्मक. यामुळे हे सगळे शेतमजूर आणि कष्टकरी म्हणूनच तिथे असतात. जेव्हा जेव्हा दुष्काळ, महामारी, पूर यांसारखी अरिष्टे कोसळत तेव्हा तेव्हा शेती क्षेत्रातले मजूर आणि कष्टकरी वर्गाला विस्थापित होण्याशिवाय पर्याय नव्हता. मुख्यत: कोलकाता वगैरे भागात हे विस्थापन होत असे. भोजपुरी लोकगीतांमध्ये आणि लोककथांमधून नेपाळ, म्यानमार यांसारख्या ठिकाणी पोट भरण्यासाठी जाणाऱ्या आम कष्टकऱ्यांची वर्णने त्याआधीही आलेली होती. याच वर्गातून सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी ‘बिदेसिया’ यासारख्या कलेचा जन्म झाला. भिखारी ठाकूर स्वत: अशाच समाजातल्या तळाच्या वर्गातून आलेले होते. या कलेच्या माध्यमातून जणू त्यांनी एक नवेच सांस्कृतिक आंदोलन सुरू केले होते. या कलेचा प्रेक्षक वर्गही हा अशा समाजाच्या तळाच्या वर्गातलाच होता.
टोकाची गरिबी, पिचलेपण यातून बालविवाहासारख्या समस्या निर्माण झालेल्या. आपली मुलगी कोवळ्या वयात कुणाच्या तरी दावणीला लवकर बांधून मोकळे होण्याची मानसिकता किंवा उच्च वर्गातल्या जरठांशी पैशाच्या जोरावर होणारे कुमारींचे विवाह. याचे प्रमाण या भागात किती तरी अधिक. भिखारी ठाकूर यांची ‘बेटी बेचवा’सारखी रचना याच समस्येवर आधारित आहे. कविता आणि नाटक या प्रकारात त्यांचे सर्व लेखन आहे. कलयुग बहार, पुत्रवध, बेटी वियोग, कलयुग प्रेम, विधवा विलाप अशी त्यांच्या नाटकांची काही नावे आहेत. भारतीय लोकनाट्याच्या परंपरेत हे काम मोठेच आहे. त्या काळचे लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय, लोकमानस आविष्कृत करणारा आशय त्यांच्या या लोकनाट्यातून व्यक्त होतो. त्या काळी हजारोंचा समूह ही नाटके पाहताना खिळून जात असे असेही उल्लेख सापडतात.
कुठल्याही लेखक कवीची तुलना अन्य कुठल्या तरी भाषेतील लेखकाशी करणे हे सर्वथा अप्रस्तुत. तरीही भिखारी ठाकूर यांचा उल्लेख ‘भोजपुरी का शेक्सपियर’ असा अनेक ठिकाणी सर्रास केलेला आढळतो. राहुल सांकृत्यायन यांनी त्यांचा उल्लेख ‘अनगढ हिरा’ असा केलेला आहे. यावरून त्यांच्या कार्याची कल्पना यावी. जिवंतपणीच ते एक आख्यायिका झाले होते. सुरुवातीला गुरे चारण्यापासून अनेक कामे त्यांनी केली. अगदी स्थलांतरित मजूर म्हणूनही त्यांना बाहेर जावे लागले. दृष्टी कलावंताची होती. त्यामुळे समाजातले अनेक बारकावे त्यांनी हेरले. अभिनय, गायकी आणि नृत्य या तिन्ही क्षेत्रांत ते पारंगत होते. तेव्हा कलेच्या सादरीकरणासाठी आजच्यासारखी अद्यायावत नाट्यगृहे नव्हती. मोकळ्या आभाळाखाली एखाद्या लाकडी मेजावर त्यांची नाटके सादर होत असत.
भिखारी ठाकूर यांच्यावर प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंह यांची एक कविता आहे. त्या कवितेतून त्यांचे हे मोठेपण नेमके ध्वनित होते. भिखारी ठाकूर यांचा नाच, रक्तात भिनलेली लय आणि त्यांच्या कलेची जनसामान्यांशी जोडलेली नाळ यांचे नाते ही कविता सांगते. त्या कवितेतला एक तुकडा आहे…
स़िर्फ वे नाचते थे/ और खेलते थे मंच पर वे सारे खेल/ जिन्हें हवा खेलती है पानी से/ या जीवन खेलता है/मृत्यु के साथ/ और महात्मा गाँधी आकर लौट गए थे चम्पारन से/और चौरीचौरा की आँच पर/ खेतों में पकने लगी थीं जौ-गेहूँ की बालियाँ/ पर क्या आप विश्वास करेंगे/ एक रात जब किसी खलिहान में चल रहा था/ भिखारी ठाकुर का नाच/ तो दर्शकों की पाँत में/ एक श़ख्स ऐसा भी बैठा था/ जिसकी शक्ल बेहद मिलती थी /महात्मा गाँधी से
केदारनाथ सिंह यांच्या कवितेचा आशय पुढे असा आहे… याप्रकारे अंधार पडल्यापासून ते पहाटेपर्यंत कधी एखाद्या बाजाराच्या वळणावर तर कधी एखाद्या उत्सवाच्या मधोमध मोकळ्या जमिनीवर अनवरत चालणारा हा अनोखा नाच… ज्याची स्वातंत्र्याच्या लढाईत कुठेच नोंद नाही. आता या चर्चा होत राहतील की भिखारी ठाकूर यांच्या नृत्याचा स्वातंत्र्याशी काय संबंध होता आणि आपल्या राष्ट्रगीताच्या लयीत असे काय आहे की रात्री-बेरात्री तिच्याशी भिडते ‘बिदेसिया’ची लय… असे ही कविता पुढे सांगते. लोकभावनेला देशाच्या स्पंदनांशी जोडणाऱ्या या कलावंताचा नेमका परिचय या कवितेतून होतो.