‘आम्ही गुजरातमध्ये भव्य ऑलिम्पिक भरवू’ असे आश्वासन सत्ताधारी भाजपने त्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांत दिले आहे. ते त्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातही आहे आणि नंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून त्याचे समर्थनही करण्यात आले आहे. आता या संदर्भात काही प्रश्न. जसे की आगामी (२४/२८, ३२ नव्हे.. २०३६ अथवा त्यानंतरच्या) ऑलिम्पिकसाठी ठिकाणनिश्चिती केली जाईल; त्या वेळी आयोजनासाठी दिला जाणारा प्रस्ताव भारताचा असणार की गुजरातचा? की फक्त गुजरातसाठी भारताचा? या सर्वाचे उत्तर होकारार्थी असणार असा विचार केला तरी त्यातून या सरकारच्या अंतज्र्ञानास सलामच. यातून त्या पक्षाचा २०२४ च्या निवडणुकीत आपण(च) सत्तेवर येणार याचा दुर्दम्य आत्मविश्वास दिसतो. पण त्यातून ‘भारतीय मतदारांस आपल्याखेरीज तरणोपाय नाही’ हा अर्थ लपून राहात नाही.

हे एक प्रकारे मतदारांस गृहीत धरणे झाले. काहींस यात काही गैर वाटणारही नाही. ते त्यांच्या मानसिक गुलामगिरीचे निदर्शक. पण लोकशाहीवर श्रद्धा शाबूत असलेल्या ‘गुलामेतर’ जनांसाठी ही बाब आक्षेपार्ह असेल. दुसरा मुद्दा ऑलिम्पिक म्हणजे फक्त सोहळा, इव्हेंट आणि त्यामुळे चमकण्यासाठी मज्जाच मज्जा इतकाच अर्थ या वर्गास अभिप्रेत असणे. आपल्या क्रीडामंत्र्यांच्या विधानांवरून तेच दिसते. ‘गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, नवे भव्य क्रीडा संकुल उभे राहात आहे,’ असे सांगत या ठाकूर महाशयांनी ऑलिम्पिकसाठी गुजरात सज्ज असल्याचे सूचित केले. पण या केवळ भौगोलिक सोयीसुविधा. कंत्राटदारधार्जिणी धोरणे असली की त्या गतीने तयार होतात. पण ऑलिम्पिकसाठी आणखी एक घटक लागतो. क्रीडासंस्कृती. या देशातील नागरिकांस गुजरात हे क्रीडासंस्कृतीसाठी ओळखले जाते, हे अद्याप तरी ठाऊक नाही. साक्षात ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ त्या राज्यात आहे, पण म्हणून एकापेक्षा एक सरस क्रीडापटू त्या राज्यात निपजल्याचे जनपामरांस अद्याप तरी दिसलेले नाही.

Why is the issue of reliability of EVMs frequently raised Since when are EVMs used in India
विश्लेषण : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा वारंवार का उपस्थित होतो? ईव्हीएमचा वापर भारतात कधीपासून?
Innovative Polling Stations, Nagpur, Environment and Tribal Culture, nagpur lok sabha seat, polling station, slefie points, gadchiroli, nagpur polling station news,
मतदान केंद्रांवर जंगल, पर्यावरण, आदिवासी संस्कृतीचे दर्शन……
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
complaints on C-Vigil App
‘सी-व्हिजिल ॲप’वर तक्रारींचा पाऊस! राजकीय पक्षाच्या होर्डिंग, बॅनरविरोधात सर्वाधिक तक्रारी

उनाड ‘टी-२०’ क्रिकेटमधल्या जडेजा वा पंडय़ा बंधूंस ही मंडळी क्रीडापटू मानत असतीलही. तो त्यांचा आशावाद झाला. पण धावणे, लांब उडी, जलतरण, मुष्टियुद्ध, तलवारबाजी, भारोत्तोलन, भालाफेक इत्यादी खेळांत नैपुण्य मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंत गुर्जरबांधव किती? भारताने ऑलिम्पिक जरूर भरवावे. पण ते भरवताना ‘गुजरात एके गुजरात’ असा संकुचित विचार त्यातून दिसता नये. मिरवण्याची संधी देणारे सोहळे भरवण्याचा सोस असा प्रदर्शित करताना त्या त्या सोहळय़ाचा आधार असलेली गुणवत्ता रुजवण्यासाठी आपण प्रयत्न करतो का, हा खरा प्रश्न. ऑलिम्पिक भरवण्याची मनीषा व्यक्त करताना त्यातील क्रीडासंस्कृतीचा आदर करण्यासाठी आपले सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहितीही ठाकूर यांनी द्यावी. प्रत्येक सोहळा म्हणजे मिरवण्याच्या आणि आपल्या कपडेपट प्रदर्शनाच्या नवनव्या संधी इतकाच मर्यादित उद्देश ऑलिम्पिक- आकांक्षेमागे असेल तर तो साध्य होईलही. पण त्यामुळे त्या प्रांतात क्रीडासंस्कृती वाढीस लागेलच असे नाही. कोणतेही आश्वासन गोड मानून मूर्ख बनण्यास तयार असलेले मतदार आहेत म्हणून लोकशाहीच्या इतक्या औद्धत्याची गरज नाही. भव्य यशापयशाचे वर्णन करताना त्यास इंग्रजीत ‘ऑलिम्पियन’ हे एक विशेषण वापरले जाते. राज्य विधानसभा निवडणुकांत या खेळांचे आश्वासन देणे हा अडाणीपणा आहे. त्याच्या भव्यता वर्णनासाठी हे विशेषण रास्त ठरावे.