मराठीत कथा-कादंबऱ्यांचे बहुप्रसवा लेखन करणाऱ्या ना. सी. फडके यांच्या नावावर ‘लघुकथा मार्गदर्शन’पर लेखनाची देखील दोनेक पुस्तके आहेत. अर्थात साठोत्तरीच्या लेखकशिरोमणींना आधीच्या ‘लेखकज्येष्ठांची चेष्टा’ करण्याची सुुरसुरी आली त्या काळातली ही पुस्तके असल्याने नंतर (बि)घडलेल्या वाचकांना त्यांचे सोयर-सुतक राहिले नाही. त्या पुस्तकांत होते काय? तर स्वानुभवांतून आणि जगभरात तोपावेतो लिहिल्या गेलेल्या लेखनतंत्र-मंत्रादी ग्रंथांना चाळणीतून गोळा केलेले सार. सरधोपटता टाळून स्पष्ट, सहजसोपे कथात्म लेखन कसे करता येईल, यावर चर्चा. फडक्यांनी ६९ कादंबऱ्या, कित्येक कथासंग्रह आणि तेवढेच निबंधसंग्रह लिहिले; ते याच सहजसोपेपणाच्या जोरावर. पण ‘हाऊ टू’ छापी मराठी पुस्तके वाचण्याची परंपराच आपल्याकडे नसल्याने फडक्यांच्या किंवा नंतर ऐंशी-नव्वद सालांत लिहिल्या गेलेल्या अशा प्रकारच्या पुस्तकांची बरोबरी ‘पंधरा दिवसांत हार्मोनियम’, ‘चौदा दिवसांत गिटार’ आणि ‘एकवीस दिवसांत व्हायोलिन’ छापाच्या जत्रोत्सवी ग्रंथांशी केली गेली.

भाषा ही कमावण्याची तसेच लेखनकला ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट कधीच वाटत नसल्यामुळे आपल्याकडे पत्रकारितेपासून ते छंदी-फंदी- हौशी- ऐच्छिक- स्वैच्छिक लेखनातून बाळबोधतेचे दर्शन अधिक पाहायला मिळते. विशेषणवांती करणाऱ्या अनेक शब्दजुळव्यांना आपल्यात लेखक दडल्याचा अपसमज (कागदाची रिमे वाया घालवून) आयुष्यभर दूर होत नाही. त्यात काव्यप्रतिभेचा सडा सांडणाऱ्या प्राध्यापकांच्या टोळ्याच्या टोळ्या वीतभर ओळख असलेल्या वृत्तपत्रांतून हातभर विशेषणारती परीक्षणे लिहून ‘उपयोजित समीक्षा’ या विषयाला नवा आयाम देऊ पाहात आहेत. त्यामुळे मराठी भाषेत ‘मास्टर्स’ करणारे विशेषणांतच तरबेज होतात आणि कृतक लेखनाची आवर्तने तयार करू शकतात, याची जाणीव ना प्राध्यापकांना आहे, ना त्या असहज लेखनाच्या ‘परिप्रेक्ष्यात’ अभ्यास गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना.

जगाच्या स्पर्धेत टिकवून ठेवणारी नोकरी मिळवण्याइतपत सक्षम मराठी ‘मास्टर्स’ किती दिसतात? अन् त्यांना मिळणाऱ्या शिक्षणातूनच विशेषणांची कवचकुंडले घातली गेल्याने त्यांच्यात लेखनपैस तो कितीसा राहणार? ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाल्यानंतर या प्रमुख प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आणि पाच-दहा पुस्तकांवर संपादक-समीक्षक आदी बिरुदे लावण्यात धन्य मानणाऱ्या मराठीच्या बेलगाम प्राध्यापक वर्गाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चुकीच्या लेखन शिक्षणाला थांबवण्याची गरज आज वाढलीच आहे. इंग्रजी भाषेत या प्रकारची शिक्षणपरंपरा नसल्या कारणाने ती भाषा जगावर राज्य करू धजावली, हे सत्य नाकारता न येणारे. किंवा जर्मन, जपानी, स्पॅनिश आदी भाषांतील साहित्यातून सरधोपटता वजा झाली, म्हणूनच तिथून इंग्रजी अनुवाद अधिकाधिक पसरले, असे ठामपणे सांगता येते.

साठोत्तरीच्या आधी अगदी ‘पल्प फिक्शन’च्या सुवर्णकाळात १९४० च्या दशकातील ‘आर्गसी’, ‘वीअर्ड स्टोरीज’ या मासिकांमधून लेखनतंत्र शिकवण्याच्या जाहिराती पाहायला मिळतात. ६० सालाआधी आपल्याकडे नवकथा रुजली. तेव्हा अमेरिकेत विद्यापीठात ‘रायटिंग कोर्सेस’ राबविले जात. पुढे गॉर्डन लीशसारख्या संपादकाने कथात्मक लिखाणाची महागडी शिबिरे (रायटिंग वर्कशॉप) भरवून लेखनतंत्राला ‘ग्लॅमर’ आणले. अर्ध्याहून अधिक अमेरिकी लेखकांची फळी या वर्कशॉप्समधून लिहिण्याची कारागिरी शिकून बाहेर पडली. अनुभव आणि कल्पनांचा मनातला फापटपसारा कागदावर उत्तमरीत्या लिहिण्याची कला शिकणाऱ्यांना ‘आत्मप्रतिभा’सारख्या भ्रामक समजुती बिलकूल शिवत नाहीत.

दर दशकात कथा-कादंबरी-निबंध-लिटररी नॉनफिक्शन लिहिणे शिकवणाऱ्या पुस्तकांची संख्या ढिगाने असते. तरीही गेल्या २५ वर्षांमध्ये स्टीव्हन किंग याचे लेखन आत्मचरित्र ‘ऑन रायटिंग’ हे प्रथमस्थान सोडायला तयार नाही. या आठवड्यात त्याची पंचविसावी हार्डबाऊंड आवृत्ती बाजारात आली असल्याने, कथात्म साहित्याच्या बहुप्रसवा लेखकाचे हे अकथनात्मक पुस्तक ‘लेखकभ्रम’ असलेल्या आपल्याकडल्या कित्येकांसाठी आणि आपापल्या भाषेतदेखील शब्दबंबाळता टाळून लिहिता येऊ शकते, हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचे.

हे पुस्तक येण्याआधी किंगच्या ३७ कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या. त्याच्या कथानकांवर डझनावरी चित्रपट आलेले. त्यात ‘ग्रीन माईल’पासून ‘शॉशंक रिडम्प्शन’पर्यंत कैकांचा समावेश. त्याने या पुस्तकाचा काही भाग १९९७ साली लिहिला. मग जून १९९९ ला मरणाच्या दारात नेऊन ठेवणारा अपघात झाल्यानंतर त्याची लिहिण्याची क्षमताच काही काळासाठी संपुष्टात आली. त्यानंतर कष्टप्रद वळणे घेत आयुष्य स्थिरस्थावर करून त्याने हा लेखनप्रकल्प पूर्ण केला.

आपल्या लहानपणी भवताली घडलेल्या घटनांमधून लेखनप्रेरणा कशी मिळत गेली, त्याबद्दल या पुस्तकाच्या एका प्रकरणात चर्चा आहे, तर पुढे ‘लेखन म्हणजे काय?’ लेखनाला कितपत गांभीर्याने, कलाकुसरीने घडवता येते यावरची दीर्घ चर्चा आहे. पहिली कथा कोणत्या नावाने, कोणत्या मासिकात, कोणाच्या संपादनाखाली आली त्याचे तपशील आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिहिण्याआधीचा खुराकी कच्चामाल अवांतर आणि अविरत वाचन हाच कसा होतो, याची जाणीवपूर्वक चर्चा आहे. स्वत:च्या प्रतिभेची आत्मस्तुतीपर वर्णने नाहीत. तर स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या भाषिक धष्टपुष्ट मासिकांची माहिती आहे. इंग्रजी भाषेतील शब्दखेळांची आणि विशेषणविरहित लिखाण करून आटोपशीर कसे लिहिता येईल, याचे दाखले आहेत.

हे २८८ पानांचे पुस्तक स्क्रिबनर प्रकाशन संस्थेने २००० साली प्रकाशित केले, त्याच्या पहिल्या आवृत्तीची प्रत अगदी अलीकडेपर्यंत भारतीय शहरांत किलोवर पुस्तके देणाऱ्या प्रदर्शनांत, फाऊंटनसारख्या देशातील पुस्तक अड्ड्यांत बऱ्याचदा उपलब्ध होती. त्यानंतर वेगळ्या मुखपृष्ठासह (कव्हरवर किंग) पुस्तकाचे दहावे वर्ष साजरे झाले. ऐन करोनाच्या आरंभी २०२० साली एक खास आवृत्ती आली. तिचेही मखपृष्ठ बदलण्यात आले होते. आता पंचविसावे वर्ष आर्टकव्हर आणि हार्डबाऊंड आणि नव्या आरंभिक नोंदीसह उपलब्ध होत आहे.

पहिल्या प्रकरणाच्या पंचविसाव्या भागामध्ये किंगने नोंदविले आहे : ‘माझ्या आईला पक्के ठाऊक होते की, मला लेखकच व्हायचेय. माझ्या खोलीच्या भिंतीवर लटकलेल्या, मासिकांकडून आलेल्या नकारपत्रांच्या चळती पाहून कुणीही ते सांगू शकले असते.’ पुढे मासिकांनी कथा स्वीकारल्यानंतर सुरुवातीला मिळालेल्या मानधनाच्या रकमेपासून ते कॅरी लिहिण्यास घेताना शाळा मास्तरकीचा पगार आदी तपशिलांचा थांग या पुस्तकातून लागतो. लेखनकामाठीला भाषा कमावणीपर्यंत नेण्याची इच्छा आणि त्यातून साधलेली किमया आदींपर्यंत वाचकाला हे पुस्तक पोहोचवते.

दोन हजार सालापर्यंतचे स्टीव्हन किंगचे लेखनआयुष्य समजून घेण्यासाठी, त्याच्या प्रत्येक आवृत्तीनंतरच्या विस्तारित प्रस्तावना नोंदीसाठी आणि या शतकातल्या (वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीदेखील बहुप्रसवा राहिलेल्या) महत्त्वाच्या लेखासाठी या पुस्तकाच्या वाटेला जगातील प्रत्येक भाषिक समाज जात आहे. परिणामी न्यू यॉर्करच्या संपादकीय मंडळातील ई. बी. व्हाइट आणि विल्यम स्ट्रंक ज्युनिअर या लेखकद्वयींच्या १९६९ सालातील ‘एलिमेण्ट्स ऑफ स्टाइल’ या ग्रंथांचा तोपर्यंत असलेला लौकिक मागे सारत दोन हजारोत्तर काळातील सर्वोत्तम लेखनमार्गदर्शिका म्हणून किंगच्या या पुस्तकाचा उल्लेख केला जातो.

किंगने या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आणखी २७ कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्या खात्यावर ६५ खूपविक्या कादंबऱ्या आहेत आणि कथा-कादंबऱ्यांच्या अधिकृत अशा एकूण ४० कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. त्याच्याकडे लेखनतंत्र आणि वाचकाला पकडून ठेवण्याचे कौशल्य आहे म्हणून तो अजूनही न चुकता लिहितोय. जगभरात जोरकस वाचलाही जातोय. त्याच्याइतकीच ग्रंथसंपदा उभारणाऱ्या आणि मराठी लेखनेच्छूंसमोर मार्गदर्शिका ठेवण्याचा यत्न करणाऱ्या ना.सी. फडक्यांच्या पुस्तकांपर्यंत आपण किती पोहोचतो? भाषा आणि लेखन हे गदेसारखेच वापरणाऱ्या किंगच्या या पुस्तकाची पंचविशी तिकडे थाटामाटात होतेय. सद्या:स्थितीत प्राध्यापकीय टोळ्यांकडून होणाऱ्या शब्दजंजाळ आणि शब्दबंबाळतेतून बाहेर पडण्याची इच्छा असल्यास किंगसारखे अनेक मार्गदर्शक (अॅनी डिलार्ड, अॅन लमॉट, डानी शपिरिओ, जेमी अॅटनबर्ग) लाभू शकतील, हे खरे.

बुक-नेट : पॅलेस्टाईन ग्रंथ पुरस्कार

गेल्या दशकभराच्याही आधीपासून म्हणजे २०१२ पासून ‘पॅलेस्टाईन बुक अॅवॉर्ड’ सुरू आहे. पॅलेस्टाईनचा इतिहास-भूगोल किंवा तेथील जगण्यावर इंग्रजी भाषेत लिहिल्या जाणाऱ्या ग्रंथाला तो दिला जातो. इस्रायल-गाझा संघर्षामुळे गेल्या दोन वर्षांत या पुरस्काराची जगाकडून दखल घेतली जाते आहे. ‘बुकनेट’मधली आवर्जून दखल मात्र या पुरस्काराच्या लघुयादीमध्ये ‘द वर्ल्ड अफ्टर गाझा’ या पंकज मिश्रा यांच्या पुस्तकाचा समावेश झाल्यामुळे. झाशीत जन्मलेल्या या लेखकाचे शिक्षण जेएनयूतले आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत सातत्याने जगाच्या नजरेतून भारत चितारणाऱ्या या लेखकाचे गाझावरील पुस्तक देशासह विदेशांतही गाजते आहे. या लघुयादीत मिश्रा यांच्या ग्रंथासह इतर पुस्तके कोणती, याचा तपशील येथे जाणून घेता येईल.

https://tinyurl.com/PalBookAwards

व्हिक्टर लव्हालची प्रस्तावना

‘प्लाऊशेअर’ या इमर्सन विद्यापीठाच्या मासिकातील एका आठवड्यासाठी मोफत उपलब्ध असणाऱ्या कथेचा दुवा इथे अनेकदा डकविण्यात आला. या आठवड्यासाठी या मासिकाच्या ‘समर फिक्शन’ अंकातील दिशा फिलिया (भारतीय वंश वगैरे काही संबंध नाही.) या लेखिकेची कथा मोफत वाचण्यास उपलब्ध केली असली, तरी त्याहून अधिक वाचन आकर्षण आहे कथा-कादंबरीकार व्हिक्टर लव्हाल याची छोटेखानी प्रस्तावना. न्यू यॉर्कजवळील क्वीन्स भागातील वस्तीत चौदाव्या वर्षी १९८६ साली वृत्तपत्र घरी पोहोचविणारा पोऱ्या म्हणून काम करीत असताना आलेल्या पहिल्या कमाईत घेतलेल्या ‘पेट सेमेट्री’ या स्टीव्हन किंगच्या पुस्तकाच्या खरेदीबद्दलचा हा मजकूर. पहिल्यांदाच या खास मजकुरासाठी मासिकाचे संपादकीय मोफत ठेवले गेले. ते इथे वाचता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

https://tinyurl.com/SummerVictor