ऐतिहासिक कादंबरीच्या रुळलेल्या वाटेपासून अँड्र्यू मिलर यांची ‘द लॅण्ड इन विन्टर’ ही कादंबरी दूर आहे. कथानक हिमखंडाच्या गतीने ‘हलणारं’ असलं, तरी पात्रांच्या मनोव्यापारात खोल बुडी घेतली आहे…

‘सेप्टर’ (Sceptre) ही प्रकाशनसंस्था ‘वाचकाला विचारप्रवृत्त करणारी, बुद्धीला आणि मनाला गुंतवून ठेवणारी आणि मनोरंजनापलीकडे जाऊन वाचकांची क्षितिजे रुंदावणारी’ पुस्तकं प्रकाशित करते. थॉमस कनीऽलीच्या ज्या पुस्तकावरून ‘शिंडलर्स लिस्ट’ सिनेमा बनवला आहे ते मूळ पुस्तक ‘सेप्टर’ने प्रकाशित केलं होतं.

दुसरं उदाहरण म्हणजे डेव्हिड मिचेलची ऐतिहासिक-विज्ञान-आणि आणखी काय काय असलेली कादंबरी ‘क्लाऊड अॅटलस’. ‘सेप्टर’ या शब्दाचा अर्थ ‘राजदंड’. इंग्रजी प्रकाशनविश्वातलं हे जणू ‘मौज प्रकाशन’ आहे. अँड्र्यू मिलर या लेखकाचं सर्व लेखन सेप्टरने प्रकाशित केलं आहे. अभिरुचीच्या जनता बसचं तिकीट काढलेल्या माझ्यासारख्या वाचकाला नाही म्हटलं तरी याचं दडपण येतं.

अँड्र्यू मिलर सध्याच्या आघाडीच्या लेखकांपैकी आहेत. ‘ऐतिहासिक कादंबरीकार’ अशी त्यांची ओळख सांगता येईल. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल नोंदवण्याजोगी गोष्ट म्हणजे त्यांनी ईस्ट अँग्लिया विद्यापीठातून सर्जनशील लेखनात एम. ए. केलं आहे. ईस्ट अँग्लिया विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमाने गेल्या काही वर्षांत मान कमावला आहे. नोबेलविजेते काझुओ इशीगुरो, बुकरविजेते इयन मकीवन याच विद्यापीठाचे स्नातक आहेत. मिलर यांच्या ‘घराणेदार’ असण्याच्या वलयातला हा आणखी एक भाग.

‘चोखंदळ वाचकांचा पसंदीदा लेखक’ होण्याकडे मिलर यांची वाटचाल लेखनकाळाच्या सुरुवातीपासूनच दमदारपणे झाली. त्यांची पहिली कादंबरी ‘इंजीनियस पेन’ १९९७ साली प्रकाशित झाली. अठराव्या शतकातल्या जेम्स डायर नावाच्या एका डॉक्टरच्या शवविच्छेदनापासून ही कादंबरी सुरू होते. हा डॉक्टर डायर – कादंबरीचा नायक – भलताच विचित्र असतो. त्याला वेदनाही होत नाहीत (आणि पर्यायाने) आनंदही. निव्वळ भौतिक अस्तित्वापलीकडे जाऊन ‘माणूस’ असणं काय असतं असा मूलभूत प्रश्न ऐरणीवर घेणाऱ्या या कादंबरीचं वाचकांनी स्वागत केलं.

विचारप्रवर्तक ऐतिहासिक कादंबरीचा लेखक म्हणून त्यांची कीर्ती वाढू लागली. ‘ऑक्सिजन’ या कादंबरीला २००१ साली बुकर पुरस्काराच्या ‘शॉर्टलिस्ट’मध्ये स्थान मिळालं, पण पुरस्काराने हुलकावणी दिली. त्यानंतर जवळजवळ पाव शतकाने बुकर परत एकदा मिलर यांच्या टप्प्यात आलं आहे.

‘ऐतिहासिक कादंबरी’ (किंवा खरं तर ‘इतिहासाधारित कादंबरी’) हा सुपरस्पेशलायझेशनचा प्रकार म्हणावा लागेल. लेखकाच्या दृष्टीने बघायला गेल्यास चांगली ऐतिहासिक कादंबरी लिहायला दुप्पट श्रम पडतात. ज्या काळावर कादंबरी बेतली आहे त्याचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. कादंबरी लिहिताना वातावरण किंवा माहोल उभा करावा लागतो.

ऐतिहासिक कादंबरीत हे आणखी महत्त्वाचं, कारण वाचकाच्या सरावाचं वातावरण नसल्याने त्याला कथानकात बांधून ठेवायला आणखी श्रम पडतात. अशा वेळी साधेसाधे तपशील अडखळवतात. उदा. ‘पेशवाईत मच्छरदाण्या होत्या का’ या प्रश्नाने हैराण होऊन लेखक मनगटं चावत बसू शकतो. या मर्यादा सांभाळून इतिहासाच्या त्या विस्तीर्ण पटावर आपल्या पात्रांना पाहिजे तसं खेळू-बागडू देणे हा कौशल्याचा भाग.

हे सगळं कमी होतं म्हणून की काय सांप्रत ऐतिहासिक कादंबरीकडून आणखी एक अपेक्षा केली जाते. कादंबरी ऐतिहासिक असली तरी अखेरीस ‘कादंबरी’ आहे, आणि त्यामुळे मानवी अस्तित्वाचा, स्थितीचा खोलवर शोध घेण्याची अपेक्षा ललित वाङ्मयाकडून केली जाते आणि त्याला ऐतिहासिक कादंबरी अपवाद नाही. उलट ऐतिहासिक उलाढालींच्या पार्श्वभूमीवर मानवी स्खलनशीलता, कणखरपणा यासारखे मानवी गुणदोष आणखी उठून दिसावेत.

इतिहास आणि माणसं वेगळी करता येत नाहीत. ऐतिहासिक घटनांत माणसं असतात ही गोष्ट खरीच, पण त्या घटनांत प्रत्यक्ष सहभाग नसणारा, आजूबाजूला मोठ्या घटना घडत असताना स्वत:च्या सुखदु:खात रंगून गेलेला सामान्य माणूसही असतो. गांधीहत्येच्या दुसऱ्या दिवशी श्री. ज. जोशींचं लग्न होतं. जोशींच्या वडिलांना राष्ट्रपुरुषाच्या मृत्यूपेक्षा घरचं कार्य नीट पार पडेल का ही चिंता होती असं जोशी नोंदवतात.

सद्याकालीन ऐतिहासिक कादंबरीने गांधीहत्येची नाही, तर जोशी कुटुंबाची कथा सांगावी अशी अपेक्षा केली जाते. मिलर या परीक्षेत वारंवार उत्तीर्ण झाले आहेत. कडक निकषांवर ऐतिहासिक कादंबरी जोखणाऱ्या मानाच्या ‘वॉल्टर स्कॉट पुरस्कारा’साठी २०१२ आणि २०१९ मध्ये नामांकन मिळालं, आणि ‘द लँड इन द विंटर’साठी २०२५ साली अखेर तो पुरस्कार मिळाला.

मुख्य कथानकात शिरण्याआधी पार्श्वभूमीबद्दल काही सांगायला हवं. कादंबरीची कथा इंग्लंडमधल्या ‘वेस्ट कंट्री’ भागात – सॉमरसेटमध्ये घडते. सॉमरसेट परगणा (county) मुख्यत्वे ग्रामीण आहे; फारसं शहरीकरण नाही. हा भाग इंग्लंडच्या दक्षिणेला आहे, त्यामुळे तापमान ऐन हिवाळ्यातही शून्याखाली फार जात नाही. याला अपवाद होता १९६२-६३ सालचा हिवाळा.

‘द बिग फ्रिज’ या नावाने कादंबरीच्या शीर्षकातला हा ‘विंटर’ ओळखला जातो. दोनशेहून अधिक वर्षांत पारा इतका कोसळला नव्हता. सलग तीन महिने तापमान गोठणबिंदूच्या वर आलंच नाही! हिमवादळं आली, बर्फाचे ढिगारे साचून रस्ते अडले, नद्या सोडाच पण किनाऱ्यानजीक समुद्र गोठला, घरातले पाइप्स काकडून फुटले आणि वीजपुरवठा बोंबलल्याने एकंदरीत जनजीवन विस्कळीत झालं.

या कथेत चार प्रमुख पात्रं आहेत. डॉ. एरिक पॅरी कुग्रामातला एक डॉक्टर आहे. त्याच्या सपक आयुष्यात काहीच रोमहर्षक नाही. त्याच कंटाळ्यातून जन्मलेले त्याचे आणि अॅलिसन नावाच्या पेशंटचे विवाहबाह्य संबंध आहेत. एरिकची पत्नी आयरीन गर्भवती आहे, पण तिलाही या खेडवळ आयुष्याचा वीट आला आहे. पॅरी दाम्पत्याच्या शेजारी सिमन्स दाम्पत्य राहतं.

बिल सिमन्स मूळचा श्रीमंत घराण्यातला, महागड्या ‘पब्लिक स्कूल’मध्ये शिकलेला आणि डेअरी चालवण्यासाठी या सॉमरसेटमधल्या खेडेगावात स्थायिक झाला आहे. रिटा सिमन्स त्याची पत्नी – शहरी, फॅशनेबल, प्रागतिक विचारांची आणि गर्भवती. या विरोधाभासांमुळे यांच्या विवाहातही ताण आहे. छळछावणीत पाहिलेल्या दृश्यांनी मानसिक संतुलन डळमळीत झालेला मार्टिन ली हा निवृत्त सैनिक हे आणखी एक प्रमुख पात्र.

बर्फाळ हिवाळ्याच्या पटावर या पात्रांच्या मनोव्यापारांचा शोध मिलर घेतात. मार्टिन ज्या मनोरुग्णालयात आहे तिथल्या एका रुग्णाच्या आत्महत्येच्या बिंदूवर कथा सुरू होते. मार्टिन हा रिटा सिमन्सचा बाप आहे, पण त्यांच्यात फारसा संवाद नाही. एरिकच्या वैयक्तिक आयुष्यावर त्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे परिणाम होऊ पाहतो आहे, पण त्याचा परिणाम डॉक्टरी कौशल्यावर झालेला नाही.

आपल्या मचूळ जगण्यापासून पलायन म्हणून रिटा सायन्स फिक्शन वाचते. शहरी पार्श्वभूमीतून आलेल्या रिटाला साठोत्तरी दशकातली नवी क्षितिजं खुणावताहेत, पण तिचं वास्तव ‘डेअरीवाल्याची पत्नी’ तेवढ्यापुरतं कुंपणबद्ध होणार आहे. त्यात ती गरोदर आहे. यातून सुटायचा मार्ग म्हणजे अचानक धनलाभ – आणि बिल सिमन्सला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या वडिलांकडून तसं डबोलं मिळायची शक्यताही आहे. वारसाहक्काने पैसे मिळतात तशी ओझीही मिळतात.

हिवाळा जसजसा वाढत जातो तसतसे तणाव वाढत जातात. अॅलिसनच्या नवऱ्याला विवाहबाह्य संबंधाची खबर लागल्याने तो एरिकच्या गाडीची नासधूस करतो. एरिकही या आयुष्यातून सुटकेचा मार्ग शोधतो आहे, त्यामुळे दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेसाठी आपलं नाव द्यायचा विचार करतो. एक हिमवादळ रिटाच्या गर्भपाताला कारणीभूत ठरतं. एरिक आणि आयरीन शेजाऱ्यांच्या मदतीला धावून जातात. अर्धवट शुद्धीत असलेल्या रिटाला उडत्या तबकड्यांचे भास होतात. आपल्याला जखडून ठेवणाऱ्या आयुष्याच्या बंधातून सुटायची ही सुप्त धडपड आहे.

पात्रापात्रांतले संबंध मिलर गडद करून दाखवतात. डॉक्टर एरिकचं आणि डेअरीवाल्या बिल सिमन्सचं एकमेकांबद्दल फारसं चांगलं मत नाही. एरिकच्या मते बिल ‘श्रीमंत बापाचा ऐदी पोरगा’ आहे, आणि चूष म्हणून वर्गपर्यटन करून डेअरीवाल्याचा अभिनय करतो आहे. पूर्वायुष्यात लंडनमध्ये नाइटक्लब नर्तकी असलेल्या रिटाच्या कठीण काळात मध्यमवर्गीय आयरीन तिला साथ देते, त्यांच्यात मैत्रीचे बंध निर्माण होतात. साठोत्तरी इंग्लंडमधल्या वर्गसंघर्षाच्या खुणा मिलर पात्रांमध्ये पेरतात. वसंताच्या आगमनाबरोबर कादंबरीचा शेवट होतो. पात्रांचे भविष्यकाळ मात्र अनिश्चित राहतात. प्रत्येक पात्र सद्या:स्थितीतून सुटायची स्वप्नं बघतं. हिमवर्षाव सुरूच राहतो, पण वसंताची चाहूल पात्रांना दिलासा देत राहते.

मिलर ऐतिहासिक घटनाक्रमापेक्षा पात्रांच्या अंतरंगात उतरण्याला महत्त्व देतात. अविरत पडणारं बर्फ पात्रांच्या भावनिक साचलेपणाचं आणि मानसिक उसवणीचं प्रतिबिंब आहे. निसर्गाला कादंबरीचा अविभाज्य भाग करणं जागतिक वाङ्मयातल्या अनेक ताकदवान लेखकांनी केलं आहे. आनंद विंगकरांच्या कादंबरीतला अवकाळी पाऊस किंवा खानोलकरांचा ‘कोंडुरा’ ही काही मराठी उदाहरणं. या कादंबरीतला हिवाळा सुटका नसलेल्या एकटेपणाचं, मानसिक अस्थिरतेचं, नीतिमत्तेच्या कल्पना तपासल्या जाव्यात अशा ‘प्रेशर चेंबर’चं प्रतीक आहे. आणि येऊ घातलेल्या वसंतात परिवर्तनाची चाहूल आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या सावल्या कादंबरीभर सतत जाणवत राहतात.

ऐतिहासिक कादंबरीच्या रुळलेल्या, खूपविक्या वाटेपासून ही कादंबरी दूर आहे. हिलरी मॅन्टेलसारखी समकालीन लेखिका ठळक ऐतिहासिक व्यक्तिरेखा, घटना यावर कादंबऱ्या लिहिते आणि त्या कादंबऱ्या अतिप्रचंड लोकप्रियता मिळवतात. मिलर-मॅन्टेल तुलना होणं अगदी साहजिक आहे. ऐतिहासिक कादंबरीच्या कपाटात दोन्ही सापडल्या तरी मॅन्टेलच्या वाचकाला मिलर पचनी पडायची शक्यता कमी आहे. हिमखंडाच्या गतीने ‘हलणारं’ कथानक, पण पात्रांच्या मनोव्यापारात घेतलेली खोल बुडी काहींना आवडते, काहींना नाही.

सरतेशेवटी, दोन महत्त्वाचे प्रश्न उरतात. पहिला म्हणजे ‘जिंकणार का?’ बेटफेअर या सट्टेबाजांच्या मते ‘द लँड इन द विंटर’ला बुकर मिळायची तगडी शक्यता आहे. हा लेख लिहितेवेळी कादंबरी दुसरी ‘फेवरिट’ होती. अर्थात बुकरचं काही सांगता येत नाही. वाचकप्रिय कादंबऱ्यांना डावलून भलत्याच कोणाला तरी पुरस्कृत केल्याची अनेक उदाहरणं सापडतील.

उदा. २००८ साली अमिताव घोषच्या ‘सी ऑफ पॉपीज’ला डावलून अरविंद अडिगाच्या ‘द व्हाइट टायगर’ला बुकर द्यायचा निर्णय निव्वळ अनाकलनीय होता. असो. शिवाय काही निरीक्षकांच्या मते बुकर परीक्षकमंडळ कालसुसंगत कादंबऱ्यांना प्राधान्य देतं. इंग्रजी वाचकांसाठी अनोखं (exotic) वातावरण असलेल्या कादंबऱ्यांची जिंकण्याची शक्यता जास्त असते. (या निकषावर किरण देसाईंना जास्त संधी आहे.) सॉमरसेटमध्ये १९६२ साली घडणाऱ्या संथ, शांत, थंडगार कथानकात पुरेसा झणका आहे का हा खरा प्रश्न आहे.

दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘वाचावी का?’ तर त्याचं ठोस असं उत्तर देता येत नाही. पात्रं, त्यांचे मनोव्यापार, १९६०च्या दशकातल्या ग्रामीण इंग्लंडचा माहोल आणि कृष्णामाईप्रमाणे संथ वाहणारं कथानक आवडत असेल तर जरूर वाचा!

‘द लॅण्ड इन विन्टर’ लखेक: अड्रँय़ू मिलर प्रकाशक: सेप्टर  पृष्ठे : ३६५ किंमत: ६९९ रु.

aadubaal@gmail.com