पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले असते. ‘द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी- अ मिलिटरी थ्रिलर’ या पुस्तकाचं जंगी स्वागत अलीकडेच झालं. दिल्लीकर बुद्धिवाद्यांसह राजकारणी आणि विविध क्षेत्रांत छाप उमटवणाऱ्यांचाही राबता जिथं असतो, त्या ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’मध्ये १३ एप्रिल रोजी, ‘फ्रॉम सोल्जर टु स्टोरीटेलर’ असा एक गप्पांचा कार्यक्रमही झाला. त्याआधीच या पुस्तकाच्या प्रती दिल्लीत अनेकांना उपलब्ध झाल्या होत्या. महिनाभर आधीच, म्हणजे ११ मार्च रोजी खवटपणाचा अर्क असलेले मुलाखतकार करण थापर यांनी ‘द वायर’साठी ‘कादंबरीकार’ जनरल मनोज नरवणे यांच्याशी बातचीत केली होती- नरवणे यांचं हे पुस्तक आपल्याला वाचनीय वाटल्यामुळेच, त्यांनी यापुढेही ‘मिलिटरी थ्रिलर’ प्रकारचं लेखन करावं अशी दिलखुलास दादसुद्धा (चक्क) थापर यांनी त्यानंतर एका वृत्तपत्रात या पुस्तकाचा परिचयलेख लिहून दिली.
माजी लष्करप्रमुखांच्या या पुस्तकातली गोष्ट- आणि पात्रंही- कल्पित आहेत. ते घडतंच मुळी २०२६ सालात. ‘एनडीए’च्या पहिल्या महिला बॅचची (२०२२) स्नातक आणि आता पद मिळालेली लेफ्टनंट रेणुका खत्री आणि त्याच तळावरचा लेफ्टनंट रोहित वर्मा हे दोघे एकमेकांविषयीची किल्मिषं, परस्परांबद्दलचे संशय विसरून जोडीनं एका खुनाचा छडा लावू पाहतात, अशी ही कथा. त्या तपासात त्यांना काही धक्कादायक माहिती मिळत जाते. ही काय माहिती असते? लष्करापर्यंत कोणाची ‘पोहोच’ आहे, याबद्दल काही गंभीर बाबी त्यांना कळतात का? – या प्रश्नांच्या उत्तरं खुद्द पुस्तक वाचूनच मिळवलेली बरी. जनरल नरवणे यांची भाणेवरची पकड आणि त्यांचे लेखनगुण यांचं कौतुक जसं या पुस्तकासाठी होतंय, तसं खरं तर त्यांनी लिहिलेल्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रासाठी होऊ शकलं असतं- कारण हे आत्मचरित्रच त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक होतं. ‘द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी’ हे दुसरं – पण प्रकाशित झालेलं मात्र पहिलंच पुस्तक. वास्तविक जन. नरवणे यांचं आत्मचरित्रच जानेवारी २०२४ मध्ये ते प्रकाशित होणार होतं… ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेनं त्या आत्मचरित्राचा काही अंश प्रसारितही केला होता… पण त्यानंतर ते पुस्तक भारतीय लष्कराकडे ‘विचारार्थ’ गेलं… आणि पुढे काहीही झालं नाही. आजही, ‘अॅमेझॉन’सारख्या पुस्तकविक्री संकेतस्थळांवर या पहिल्या पुस्तकाची छबी दिसते, पण विकत घेऊ गेलं तर ‘उपलब्ध नाही’ अशी सूचना येते. पण पहिल्याआधीच प्रकाशित झालेल्या या दुसऱ्या पुस्तकाला मात्र वाचकांची दाद मिळत आहे!