scorecardresearch

Premium

बुकमार्क : कथावाचकमल्लांची निवड..

‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’चा १९१९ पासून सुरू असलेला कथायज्ञ यंदा खऱ्या अर्थानं जागतिक झाला, त्यापैकी एक भारतीय आणि एका स्पॅनिश कथेची ही चुटपुटती ओळख.

lekh2 bookmark
संग्रहित छायाचित्र

पंकज भोसले

‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’चा १९१९ पासून सुरू असलेला कथायज्ञ यंदा खऱ्या अर्थानं जागतिक झाला, त्यापैकी एक भारतीय आणि एका स्पॅनिश कथेची ही चुटपुटती ओळख. या कथा संपूर्णही वाचता येतीलच; पण चुटपुट लागण्याचं खरं कारण निराळं आहे..

Indian scientists have solved the mystery of X-rays emitted by black holes
भारतीय शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; कृष्णविवराजवळून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरण रहस्याचा केला उलगडा
In China Taiwan the Independent Taiwan party is back in power
तैवान पुन्हा धुमसणार, कारण..
Wipro founder Azim Premji
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजींचं मुलांना कोट्यवधींचं गिफ्ट; नावावर केले ५०० कोटींचे शेअर्स!
Loksatta anvyarth New Hampshire America Most Honorable voter Nikki Haley Donald Trump in the Republican primaries
अन्वयार्थ: ट्रम्प एके ट्रम्प,ट्रम्प दुणे ट्रम्प..

‘आम्ही उभयतांनी उपलब्ध झालेल्या सुमारे तीन हजार कथांचे वाचन पहिल्या फेरीत केले. निवडून बाजूला काढलेल्या २७० कथा आम्ही दुसऱ्या फेरीत वाचल्या. त्यांतून निवडलेल्या ४२ कथांचे वाचन आम्ही तिसऱ्या फेरीत केले. शेवटी

२४ कथांचे वाचन आम्ही तिसऱ्या फेरीत केले. शेवटी २४ कथांची अंतिम निवड आम्ही केली आणि बाकीच्या १८ कथांचा परिशिष्टात उल्लेख करण्याचे ठरविले.’

 – राम कोलारकर

 (सर्वोत्कृष्ट मराठी कथा-१९७०, खंड पहिला, प्रस्तावनेतील भाग. प्रकाशन साल १९७२)

मराठीत कथा हा प्रकार समृद्ध वगैरे असण्याच्या काळात कोलारकर दाम्पत्याची कथा वाचनमल्लगिरी किती होती, हे दाखविणारा वरचा उतारा ‘ओ. हेन्री पारितोषिक’प्राप्त कथांच्या नव्या खंडाची ओळख करून देताना मुद्दाम आठवण करून द्यावासा वाटला. कथा या साहित्यप्रकाराच्या उन्नयनासाठी आणि या लेखनप्रकारात मास्तरकी मिळवणाऱ्या विल्यम सिडने पोर्टर ऊर्फ ओ. हेन्री (१८६२-१९१०) यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी अमेरिकेत १९१९ साली ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’ची स्थापना झाली. त्यानंतर तब्बल पन्नास वर्षांनी मराठीत असा प्रकल्प राबविला जावा ही कळकळ कोलारकर दाम्पत्याला वाटली. त्यातून निधी उभारला जाऊन दोनेक दशके या दाम्पत्याने वर्षभरात साप्ताहिके, पाक्षिके, मासिके आणि नियतकालिकांत प्रकाशित होणाऱ्या कथांमधून निवड करण्याचे अजस्र काम करून ठेवले. हे खंड आपण विसरलो, कथा छापल्या जाणाऱ्या साप्ताहिक, मासिकांकडे पाठ फिरवून बसलो. कोलारकरांच्या कार्याची दखल घ्यायलाही कचरलो. गौणतेचा शिक्का मारल्यानंतर कथाउन्नयनाची शक्यता आपल्या इथे धूसर होत असताना शतकी वाटचाल करत ‘ओ. हेन्री प्राइझ स्टोरीज’चे खंड मात्र अमेरिकेसह जगभरातील वाचकांच्या भेटीला येत आहेत.

पूर्वी फक्त अमेरिकेत राहणाऱ्या लेखकांच्या कथांची निवड करणाऱ्या या खंडाच्या निवड आणि संपादक मंडळाने गेल्या दोन दशकांत आपल्या कथावार्षिकाच्या नियमांत थोडे-थोडे बदल केले. अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी लेखकांच्या इंग्रजी कथांना या खंडात दीड दशकापूर्वी पहिल्यांदा स्थान मिळाले. त्यानंतर थोडय़ा थोडय़ा काळानंतर हे खंड अधिकाधिक जागतिक करण्याचे प्रयत्न झाले. करोनाच्या पहिल्या वर्षांत म्हणजे २०२० साली हा खंड निघू शकला नाही. गेल्या वर्षी त्याची कसर भरून काढण्यात आली. पण यंदा सर्वात मोठा बदल या कथानिवड मंडळाने केला. यंदा या खंडात २० पैकी १० कथा इंग्रजीत अनुवादित झालेल्या जगभरातील लेखकांच्या घेण्याचे पक्के झाले. त्यातही भारतासाठी विशेष म्हणजे बंगालीतील ज्येष्ठ लेखक अमर मित्र यांची ‘द ओल्ड मॅन ऑफ कुसुमपूर’ ही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिश गुप्ता यांनी इंग्रजीत अनुवादित केलेली कथा ओ हेन्री प्राइझ स्टोरीजच्या ताज्या खंडात समाविष्ट करण्यात आली आहे. गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधि’ कादंबरीने इंटरनॅशनल बुकर पुरस्कार पटकावण्याइतकीच भारतीय कथालेखनासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. पण ती आपल्याकडे तुरळक माध्यमांनीही फारशी गाजविलेली दिसत नाही.

व्हलेरिआ ल्युसेली या चाळिशीही पार न गेलेल्या मेक्सिकन लेखिकेच्या निवड आणि संपादनाखाली आणखी दहा दिवसांनी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या ताज्या ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’मधील कथा कोणत्या आहेत, याची झलक काही दिवसांपूर्वीच पसरली असून या महिन्यात व्हलेरिआ ल्युसेली यांनी खंडासाठी लिहिलेल्या संपादकीयातला भागही लिटररी मासिकांमध्ये छापण्यात आला आहे. यंदा बंगाली, ग्रीक, हीब्रू, रशियन, स्पॅनिश, पोलिश, नॉर्वेजिअन भाषेतील १० कथा असलेला ओ. हेन्री प्राइझ स्टोरीजचा हा पहिलाच खंड असणार असून डॅनिअल मेसन, लॉरी मूर, डेव्हिड रायन या समकालीन अमेरिकी कथाकारांच्या पंगतीत चिमामांदा गोझी अदिचे (नायजेरिया), पेमी अगुडा (नायजेरिया), जोसेफ ओनिल (आर्यलड) हे विदेशी दिग्गजही बसलेले दिसतात. अनुवादित कथांच्या विभागात अमेरिकी मासिकांत सतत झळकणारा स्पॅनिश लेखक अलेआन्द्रो झाम्ब्रा, २०१८ मध्ये साहित्याचे नोबेल पटकावणारी ओल्गा टोकर्झूक, रशियन लेखक व्लादिमीर सरोकिन आणि स्पॅनिश लेखिका सामंथा श्वेबलिन या नाणावलेल्या लेखकांचा समावेश यंदाच्या खंडात आहे. इतर निवडींमध्ये व्हलेरिआ ल्युसेलीची कथापसंती समाविष्ट झाली आहे. ज्यात बंगालीतून इंग्रजीत गेलेली आणि ‘द कॉमन’ या ऑनलाइन नियतकालिकात प्रसिद्ध झालेली अमर मित्र यांची ‘द ओल्ड मॅन ऑफ कुसुमपूर’ ही कथा आहे. जी थोडय़ा शोधाअंतीही संपूर्ण वाचायला मिळू शकते.

कुसुमपूरच्या फकीरचंदची गोष्ट

कुसुमपूरहून कन्यादिही परिसरापर्यंत सर्व मानवी दु:खावर अक्सीर इलाज शोधून देणाऱ्या अज्ञात महामानवाला भेटायला जाणाऱ्या फकीरचंद या यात्रिकाच्या प्रवासाची ही कहाणी खूपच जुन्या वळणाची असली, तरी भारताची प्रतिनिधित्व करणारी म्हणून महत्त्वाची आहे. वाटेत त्याला भेटणारी दु:खसंपृक्त व्यक्ती आणि व्यक्तिसमूहांना हा फकीरचंद सुखाचे आश्वासन देत राहतो. ‘सर्चिग फॉर गोदो’ हे या कथेचे रूपडे कथेच्या ११ पानांत वाचकाला पकडून ठेवणारे आहे.

करोनाकाळातली स्पॅनिश कथा

अलेआन्द्रो झाम्ब्रा यांची ‘स्क्रीन टाइम’ ही कथा करोनाकाळात महिनोन् महिने घरात टीव्हीसमोर कैद झालेल्या लेखक दाम्पत्याची गोष्ट आहे. आपल्या लहानग्या मुलाला टीव्ही किती आणि कधी पाहू द्यायचा, या चर्चेसह करोनाप्रणीत निर्थकतेला मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाची ही गोष्ट किती जागतिक आहे, हे तिला वाचताना लक्षात येऊ शकेल (झाम्ब्राचीच दोन आठवडय़ांपूर्वी न्यू यॉर्करमध्ये आलेली ‘स्कायस्क्रॅपर्स’ ही कथाही उत्कृष्ट निवेदनाचे उदाहरण म्हणून पाहता येईल.).

न्यू यॉर्कर, न्यू यॉर्क टाइम्स मॅगेझिन, गर्निका, वन स्टोरी, एन प्लस वन, द पॅरिस रिव्ह्यू, झोईट्रोप- ऑल स्टोरी, गल्फ कोस्ट, येल रिव्ह्यू, ग्रँटा आणि फ्रीमन्स, मॅकस्वीनी क्वार्टरली कन्सर्न.. अशा ढीगभराने अमेरिकी-ब्रिटिश ऑनलाइन-ऑफलाइन मासिकांतून आलेल्या साहित्यातून कथावाचकमल्ल संपादकाची पसंती ‘ओ. हेन्री प्राइझ..’च्या पानांमध्ये यंदा पाहायला मिळणार आहे.

कथापरंपरा नाकारलेल्या आणि तरी अभिजात वगैरे होण्याची मलूल आस बाळगणाऱ्या आपल्या प्रदेशातील निवडक कथाप्रेमींना तरी या निवडक कथांच्या जागतिक खंडातून अनेक सुखद क्षण हाती लागू शकतील. कोलारकर दाम्पत्याचे वाचनमल्लत्व विस्मृत झालेल्या साहित्य संस्कृतीला त्यांच्या कथासंपादन कार्याकडे पाहण्याची जाणीव यामुळे झाली, तरी ते आत्म-अभिजाततेकडे जाणारे पहिले पाऊल असेल.

‘स्क्रीन टाइम’ वाचण्यासाठी  https:// lithub. com/ screen- time

ओल्ड मॅन ऑफ कुसुमपूर वाचण्यासाठी   https://www.thecommononline.org/ the-old-man-of-kusumpur

     pankaj.bhosale@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bookmark selection storytellers o henry prize stories spanish story reading stories ysh

First published on: 03-09-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×