बी. जयमोहन हे तमिळनाडूमधील लोकप्रिय आणि वादग्रस्त लेखक. मल्याळममधूनही त्यांचे लेखन होते. गेल्या वर्षी एका गाजलेल्या मल्याळी चित्रपटावर आपल्या ब्लॉगमधून टीका केल्याने त्यांनी रान उठवून दिले. तरीही २६ हजार पानांच्या एका कादंबरीसह वीस कादंबऱ्या, कथासंग्रह आणि समीक्षात्मक आणि अकथनात्मक लिखाणाची मुबलक पुस्तके त्यांच्या नावावर. ‘स्टोरीज ऑफ द ट्रू’ हा त्यांचा कथासंग्रह नुकताच इंग्रजीत अनुवादित झालेला असून, त्यातील ‘एलिफंट डॉक्टर’ ही कथा इथे वाचायला मिळेल. प्रियंवदा रामकुमार यांनी या कथा अनुवादानिमित्ताने लेखकाची इतर जगाला ओळख करून देणारा निबंधही दिलाय, त्याचेही वाचन आवश्यक. जंगलात पर्यटकांमुळे हत्तीला होणाऱ्या जखमा आणि त्या निस्तरण्यासाठी डॉक्टरांना करावा लागणारा खटाटोप या कथेत आलाय.
https://tinyurl.com/5n74274w, https://tinyurl.com/4befk2 cc
कोपेनहेगनमधील पुस्तकालये…
ताजी बातमी वेगळीच आहे. डेन्मार्कमध्ये पुस्तकांवर कर लावल्यानंतर झालेल्या वाचनघटीमुळे पुस्तकविक्री व्यवहार सुरळीत व्हावा यासाठी तेथील सरकारने जाचक कर रद्द केल्याची. आता या देशातील कोपेनहेगन विद्यापीठ हे तर थेट नोबेल साहित्य पुरस्कारासाठी निवड करणाऱ्यांपैकी अग्रभागी. त्यामुळे सारेच ग्रंथसंवेदक. ग्रंथखरेदीत झालेली तूट आणि तरुणाईची वाचनाऐवजी इतर मनरंजन पर्यायांना कवटाळण्याची वृत्ती पाहून आता पुस्तके पुन्हा नियमित किमतीत मिळतील. पण दूर गेलेला वाचक परत मिळवता येईल? (आपल्याकडे महाराष्ट्रात पुस्तककिंमत निम्मी केली तरी ‘रील्शासना’त रंगलेले आबालवृद्ध खरेदीउत्साह दाखवतील काय, तसेच हे.) पण या निमित्ताने एक झलक कोपेनहेगनमधील पुस्तकालयांवरच्या व्हीडिओब्लॉगची. https://tinyurl.com/bdherh6r
पाककलेची गोष्ट…समीन नॉसरात
या जन्माने अमेरिकी. वंशाने इराणी. ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये त्या खाद्यान्तीवर सदर चालवतात. ‘सॉल्ट, फॅट, अॅसिड, हीट’ या त्यांच्या आठ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकाने पाककलेवरच्या ग्रंथविक्रीत विक्रम केला. कोणत्याही पाककृतीमध्ये या चारपैकी एकही घटक नाही, असे होतच नाही – हे सत्य त्यांनी पुस्तकात खमंगपणे मांडले. ‘चवीं’चा तळ शोधण्यातली गंमत त्यांच्या मजकुरात आहे. पुढे या पुस्तकावर ‘नेटफ्लिक्स’वरची मालिका आली आणि ही लेखिका आणि पुस्तक अधिकाधिक वाचक जगापर्यंत पोहोचले. पाककला ही गोष्ट सांगण्यासारखीच असते, असे मानणाऱ्या या लेखिकेची आता आगामी पुस्तकानिमित्ताने आलेली मुलाखत. त्यांच्याविषयी (आणि नेटफ्लिक्स मालिकेविषयीही) कुतूहल निर्माण करणारी. https://tinyurl.com/5djaehzu