दिल्लीवाला
काँग्रेसमध्ये खरं तर तीनच तारांकित प्रचारक आहेत. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे. तिघांच्याही प्रचार सभांना प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे. काँग्रेसचं अजून तिकीटवाटपही झालेलं नाही, पण प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. राजस्थानमध्ये खरगेंनी जाहीर सभा घेऊन प्रचाराला सुरुवात केली. राहुल गांधींनी मिझोरमपासून प्रचार सुरू केला. तिथल्या रोड शोला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला होता. आता या तिघांचेही पाच राज्यांमध्ये दौरे सुरू झाले आहेत. सोनिया गांधी प्रचारात उतरण्याची शक्यता नसली तरी, प्रत्येक राज्यात नेत्यांच्या एका तरी संयुक्त सभेला त्या उपस्थित राहू शकतील. कर्नाटकच्या विजयानंतर राहुल गांधी व प्रियंका गांधी लोकांना सभेसाठी खेचून आणत असल्याचं दिसत आहे. राहुल गांधींप्रमाणे प्रियंका गांधींनाही तितकाच प्रतिसाद मिळू लागला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी प्रियंका गांधी-वाड्रा यांनीच पहिली सभा घेतली. कर्नाटकचे निकाल आल्यानंतर दोन दिवसांनी प्रियंका गांधी यांनी तेलंगणामध्ये जाहीर सभा घेऊन पक्षामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत प्रियंका यांनी एकहाती प्रचार केला, पण काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळं त्यांच्याकडं प्रचाराची धुरा देण्याबाबत पक्ष साशंक होता. हिमाचल प्रदेशमध्ये फक्त प्रियंका गांधींनी प्रचार केला होता. तिथं काँग्रेसचं सरकार आलं. त्यामुळं चित्र बदललं. आता प्रियंका गांधी यांचे पाचही राज्यांमध्ये अधिकाधिक दौरे आखण्याचं पक्षानं ठरवलेलं आहे. प्रियंका गांधींना आत्ता उत्तर प्रदेशपुरतं सीमित राहायचं नाही. त्यांना पक्षामध्ये अधिक व्यापक भूमिका बजावायची आहे. त्यांच्याकडं सध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी असली तरी, त्यांच्याकडं महासचिव म्हणून उत्तर प्रदेश देण्यात आलेलं नाही. कार्यकारिणीमध्ये बदल करताना महासचिवांकडं एकेक राज्य सोपवण्यात आलं होतं. पण, त्यामध्ये प्रियंका गांधींचा समावेश करण्यात आला नाही. दोन्ही गांधींना पक्षामध्ये प्रत्यक्ष पद न घेता पक्षाची धुरा सांभाळायची असावी. प्रियंका गांधी यांच्या सभांना गर्दी होत असेल तर निदान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत तरी त्या तारांकित प्रचारक असतील. त्यानंतर त्या पक्षात कोणत्या भूमिकेत असतील हे ठरेल.
होय, मीच हायकमांड!
राजस्थान भाजपमध्ये अंतर्गत वाद टोकाला गेला असला तरी, त्याचा काँग्रेसला लाभ मिळेलच असं नाही. काँग्रेसही समाजमाध्यमाच्या खेळात तरबेज झाल्यामुळं राजस्थानमध्ये काँग्रेस जिंकण्याची शक्यता असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. भाजपप्रमाणे राजस्थान काँग्रेसमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू झालेली आहे. आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याइतका मुरब्बी नेताच काँग्रेसमध्ये नाही. गेहलोत सलग दोन दिवस सचिन पायलट यांच्यावर हल्लाबोल करत आहेत, पण पायलटांच्या तोंडून एक शब्दही निघालेला नाही. गेहलोत थेट काँग्रेसच्या मुख्यालयात बसून तासभर तलवारबाजी करत होते पण, शेजारी बसलेले प्रवक्ते पवन खेरा यांना गेहलोतांच्या विनोदावर हसण्याशिवाय काही करता आले नाही. असं म्हणतात की, राजस्थान काँग्रेसचं तिकीटवाटप गेहलोतांच्या किती पाठीराख्यांना तिकिटं द्यायची या मुद्दय़ावर अडलेलं आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सोनिया गांधींनी गेहलोतसमर्थक शांती धारीवालांबद्दल, ‘हेच ना ते हायकमांड कोण म्हणणारे?’ असं गेहलोतांना विचारलं होतं. त्यातून काँग्रेसमधील हायकमांड मीच आहे, मला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, असा गर्भित इशारा सोनियांनी दिला असला तरी, गेहलोत यांनी धारीवाल यांचं समर्थन केलं. ते भ्रष्टाचारी नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. राजस्थानमध्ये असे गेहलोतसमर्थक ‘धारीवाल’ अनेक आहेत. त्यांनीच तर गेहलोत सरकार वाचवलं होतं आणि प्रियंका गांधींचा डाव उधळून लावला होता! या आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचा गेहलोत यांचा आग्रह आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन हाच मुद्दा गेहलोतांनी ठसवला. अशा ‘धारीवालां’ना उमेदवारी मिळाली नाही तर, ते गेहलोतांचे अपक्ष उमेदवार होतील. मग, काँग्रेसची डोकेदुखी वाढेल. आता त्यातून मार्ग कसा काढायचा, असं म्हणत काँग्रेसचे नेते डोक्याला हात लावून बसले आहेत. गेहलोत मनातल्या मनात ‘राजस्थानमध्ये मीच हायकमांड’, असं म्हणत असावेत.
एकाकी लढत
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा सध्या विरोधकांशी एकाकी लढत देत आहेत. लोकसभेत मोदी-शहांचं नाव घेऊन आक्रमक बोलणाऱ्या विरोधी पक्ष सदस्यांमध्ये त्या प्रमुख आहेत. त्यांनी मोदींच्या वर्मावर घाव घातला आहे. राहुल गांधी वगळले तर अदानी या विषयात कोणीही विरोधक हात घालत नाहीत. पण, मोईत्रा बोलतात. अशा त्रास देणाऱ्या नेत्यांविरोधात शुक्लकाष्ठ लावून दिलं जातं. मोईत्रांमागचं शुक्लकाष्ठ म्हणजे निशिकांत दुबे. त्यांच्यावर मोईत्रा यांची कोंडी करण्याची जबाबदारी भाजपने सोपवलेली आहे. त्यामुळं मोईत्रांविरोधात जाहीरपणे बोलू शकतील अशा व्यक्ती दुबेंनी जवळ केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून सध्या मोईत्रा यांना जेरीस आणलं जातंय. या सर्व लोकांनी मोईत्रांची जेवढी बदनामी करायची तेवढी केली आहे. यापेक्षा आता जास्त काही होऊ शकत नाही. त्यांच्याशी दोन हात करण्याएवढय़ा मोईत्रा मानसिकदृष्टय़ा कणखर असल्याने विरोधकच नामोहरम होण्याची शक्यता अधिक. पण, मोईत्रा यांना ही लढाई पक्षाच्या मदतीविना करावी लागत आहे. तृणमूल काँग्रेसने मोईत्रांच्या लढाईपासून लांब राहण्याचं ठरवलेलं आहे. पक्षाचा एकही नेता मोईत्रांच्या बाजूने बोललेला नाही. पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तर मोईत्रा यांच्याकडं पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. त्या दोघींच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. कृष्णनगर या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या जाहीर सभेत ममता बॅनर्जीनी मोईत्रा यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर त्यांची रवानगी गोव्याच्या प्रभारी म्हणून करण्यात आली होती. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मोईत्रा सक्रिय असल्या तरी त्या पक्षनेतृत्वापासून दूर असतात. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोईत्रांना तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी मिळेलच असं नाही. आत्ता लोकसभेत विरोधकांचा आवाज जिवंत ठेवणाऱ्या महिला खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष-दस्तीदार, द्रमुकच्या कणीमोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाच्या डिम्पल यादव, आणि काँग्रेसच्या ज्योतिमणी अशा चार-पाच सदस्यांचा समावेश होतो. त्यामध्ये महुआ मोईत्रा सर्वात आक्रमक आहेत. पण, त्यांच्या आक्रमकतेला पक्षही वेसण घालू पाहात असावा!
‘इंडिया’च्या महिला नेत्यांमध्ये एकजूट
विरोधकांच्या ‘इंडिया’चा रथ रुतून बसलेला आहे. त्यांच्या समन्वय समितीमध्येही शरद पवार वगळले तर बाकी सगळे दुसऱ्या रांगेतले नेते आहेत. त्यामुळं ही समिती नेमकी काय निर्णय घेणार आणि त्यांचं ऐकणार तरी कोण, असा प्रश्न आहे. या समितीनं भोपाळमध्ये संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवारांच्या दिल्लीतील घरी समितीची बैठक झाली. मग, काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांनी संयुक्त सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला. हे ऐकल्यावर कमलनाथ यांनी वेणुगोपाल यांचा निर्णय परस्पर फिरवला, केंद्रीय नेत्यांना कळवलं की, भोपाळला बजरंगबली विरोधातील सभा नको! काँग्रेसला कमलनाथ यांचं ऐकावं लागलं. काँग्रेस आणि सपच्या केंद्रीय नेत्यांनी जागावाटपाच्या शक्यतेवर चर्चा केली होती. पण, कमलनाथ म्हणाले, फक्त काँग्रेस सगळ्या जागा लढवेल. तेही म्हणणं ऐकावं लागलं. त्यामुळे ‘इंडिया’तील नेत्यांमध्ये समन्वय आहे की नाही असा प्रश्न पडू लागला आहे. त्याउलट महिला नेत्या! त्या स्वत:हून एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवडय़ामध्ये ‘द्रमुक’ने चेन्नईमध्ये महिला हक्क परिषद भरवली होती. सोनिया गांधींपासून डिम्पल यादव यांच्यापर्यंत ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या महत्त्वाच्या महिला नेत्या परिषदेला उपस्थित राहिल्या होत्या. ‘द्रमुक’च्या पाहुणचाराने सर्व महिला नेत्या खूश झाल्या होत्या! या नेत्या ‘द्रमुक’चं प्रचंड कौतुक करत होत्या. ‘इंडिया’च्या पुरुष नेत्यांच्या तुलनेत महिला नेत्यांमध्येच अधिक ऐक्य दिसतंय.