एम्सचे प्रमुख, भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे सर्जन आणि देशाच्या पंतप्रधानांचे डॉक्टर म्हणून डॉ. पी वेणुगोपाल हे देशाच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण वळणांचे साक्षीदार होते. त्या सगळय़ाच्या आठवणी त्यांनी त्यांच्या ‘हार्टफेल्ट’ या पुस्तकात लिहिल्या आहेत. ‘हार्परकॉलिन्स इंडिया’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. इंदिरा गांधींचे प्राण वाचवण्याचा चार तास अथक प्रयत्न.. आणीबाणीच्या काळात उपचारासाठी आणवले गेलेल्या अटलबिहारी वाजपेयींशी झालेली भेट.. ‘तेलुगु बिड्डा’ (मुलगा) पी. व्ही. नरसिंह राव यांच्याशी निर्माण झालेले बंध.. अशा वेगवेगळय़ा गोष्टींबद्दल या पुस्तकात वाचायला मिळते. महत्त्वाच्या घडामोडी वरच्या पातळीवरून अनुभवणाऱ्या उच्चपदस्थ व्यक्तीचे प्रथमदर्शनी कथन या अर्थाने हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.

इंदिरा गांधींची हत्या झाली त्या दिवसाबद्दल म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ या दिवसाबद्दल वेणुगोपाल लिहितात, माझ्यासाठी तो दिवस नेहमीसारखाच सामान्य दिवस होता. पण सकाळी दहाच्या सुमारास एका ज्युनिअरने धावत येऊन मला सांगितले, ‘पंतप्रधान इंदिरा गांधींना जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले आहे.’ ते ऐकल्यावर धावत सुटलेल्या वेणुगोपाल यांना आसपास सुरू असलेला गोंधळ दिसत होता. माखनलाल फोतेदार आणि आर. के. धवन हे इंदिरा गांधींचे सहकारी रडत होते. ‘‘बेडवर पडलेल्या कृश इंदिराजी रक्ताच्या थारोळय़ात पडल्या होत्या. त्यांचा नाजूक चेहरा फिकट पडला होता. ते दृश्य पाहून मी हादरलो होतो.. त्यांच्या शरीरात रक्त चढवण्याचा प्रयत्न सुरू होता. पण तेवढय़ाच वेगाने त्यांना रक्तस्रावदेखील होत होता. त्यामुळे तो प्रयत्न मला व्यर्थ वाटत होता. मी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याचा आदेश दिला.. एका क्षणी, मी मागे वळून पाहिलं आणि माझ्या स्वत:च्याच रक्ताळलेल्या पायाचे ठसे दिसले.. त्यांची साडी काढताच जमिनीवर गोळय़ा पडू लागल्या. आम्हाला नंतर कळले की एकंदर ३३ गोळय़ा झाडल्या गेल्या होत्या आणि त्यातल्या ३० त्यांना लागल्या होत्या; काही त्यांच्या शरीरातून पलीकडे गेल्या होत्या तर काही शरीरातच होत्या.

हे का झाले असावे, ते टाळता आले नसते का? याची उत्तरे वेणुगोपाल यांनी अर्थातच नंतर शोधली, ती अशी : ‘‘असे दिसत होते की त्यांच्यावर झाडल्या गेलेल्या पहिल्याच गोळीमुळे त्या जमिनीवर पडल्या असाव्यात. आणि त्यांच्यासोबत असलेले लोक त्यांना तसेच सोडून आजूबाजूला पळाले असावेत. त्यामुळे मारेकरी आणखी पुढे आला आणि त्याने त्याच्या मशीनगनमधून इंदिरा गांधींच्या शरीरावर अनेक फैरी झाडल्या. इंदिरा गांधी यांना लगेच कव्हर केले गेले असते किंवा बाजूला ओढले गेले असते, तर त्यांना फक्त सुरुवातीच्याच गोळय़ा लागल्या असत्या आणि त्या वाचल्या असत्या, असे मला वाटते.’’ त्या क्षणी मात्र कृती करणे महत्त्वाचे होते. वेणुगोपाल लिहितात की, इंदिरा गांधी यांना बायपास मशीनवर ठेवून त्यांचा रक्तस्राव थांबवायचा आणि महाधमनी जोडायची असे त्यांनी ठरवले. जेणेकरून गोळय़ांनी छिन्नविच्छिन्न ओटीपोटातून रक्त वाहू नये. वेणुगोपाल पुढचे चार तास अथक काम करत होते. त्यांच्या अंगावरचे कपडे सतत रक्ताने भिजत होते. त्यामुळे त्या चार तासांत त्यांना तीन वेळा कपडे बदलावे लागले. वेणुगोपाल लिहितात, दुपारी दोनच्या सुमारास, आम्ही इंदिरा गांधींना बायपास मशीनवरून काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही.

ते लिहितात, पुढील काही तास हॉस्पिटलमधल्या त्या खोलीत चर्चा, वादविवाद सुरू होते. ‘‘देशाच्या पूर्वेकडील भागात दौऱ्यावर असणारे राजीव गांधी परतीच्या मार्गावर होते आणि त्यांच्या येण्याची वाट पाहण्यावर त्या खोलीत असणाऱ्यांचे एकमत झाले होते..  माझ्या कानावर जे संभाषण पडले त्यातून मला समजले ते असे की राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यास राष्ट्रपती तयार होतील का, ही चिंता उपस्थितांना वाटत होती. अरुण नेहरूंचा मुद्दा होता की, परदेश दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींची जबाबदारी सांभाळणाऱ्या उपराष्ट्रपतींकडे ही जबाबदारी सोपवता येईल का..? सर्वसाधारण मत असे होते की राष्ट्रपती मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्याला बोलावून त्याच्यावर जबाबदारी सोपवतील. संध्याकाळनंतर राष्ट्रपती झैलसिंग आले. एरवी निर्विकार दिसणारे झैलसिंग त्या संध्याकाळी खूप गोंधळलेले दिसत होते.

राजीव गांधी दुपारी कधीतरी आले. ‘‘त्यांचा चेहरा फिकुटला होता. ते थेट विमानतळावरून आले होते. अशा अवस्थेत असलेल्या आपल्या आईकडे पाहून दुसऱ्याच क्षणी ते बाहेर निघून गेले, तेव्हा ते आपल्या भावना आवरण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, असे माझ्या लक्षात आले. यानंतर, आमच्या चमूचे काम सुरू झाले. पुढील गोष्टींसाठी इंदिरा गांधींचा मृतदेह तीन दिवस तरी टिकवून ठेवायचा होता. त्यामुळे एम्बामिंगचे (मृतदेह पुढील काही काळ टिकवण्यासाठी रसायने वापरण्याचे) काम सुरू झाले.

शिखांवरला परिणाम

त्यानंतर झालेल्या दिल्लीतील शीखविरोधी दंगलींबद्दल वेणुगोपाल लिहितात, ‘‘आमच्या सभोवतालचे दु:ख हृदयाला भिडणारे होते आणि काँग्रेसच्या गटात निर्माण झालेला राग स्फोटक होता. राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंब खूप शांत आणि विचारशील होते. अरुण नेहरूंनी आधी खूप हुकूमत गाजवली, आदेश काढले.. काही विधाने केली. त्या विधानांमुळे पुढच्या काही दुर्दैवी घटना घडल्या असतील, तर त्याचे मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.’’

एम्सचीदेखील यातून सुटका झाली नाही. वेणुगोपाल लिहितात. ‘‘रुग्णालयातील शीख सुरक्षारक्षकांनी रात्रीत केस कापलेङ्घ आम्ही पंतप्रधानांवर काम करत असतानाही माझा शीख परफ्युजनिस्ट (हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूमधला एक तंत्रज्ञ) ऑपरेशन थिएटरमधून गायब झाला. अखेर त्याने ‘एम्स’च्या नोकरीचा राजीनामा दिला.

.. आणि बांगलादेश युद्ध! 

वेणुगोपाल यांना त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात बांगलादेश युद्धादरम्यान मुक्ती वाहिनीला मदत करण्यासाठी पाठवण्यात आले होते.  बांगलादेशच्या मुक्तीसाठी लढताना अनधिकृत पातळीवर भारत सरकारसह काम करणाऱ्या ‘मुक्ती वाहिनी’त बंगालीप्रेमी कार्यकर्त्यांसह बंगालीभाषक लष्करी, निमलष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यांच्या मदतीसाठी लष्करी डॉक्टरांना पाठवण्यात आले नाही, वेणुगोपाल लिहितात, ‘‘कारण ‘युद्धविरहित क्षेत्रा’त भारतीय लष्करी डॉक्टरांचा वावर चिंताजनक ठरला असता.’’

‘‘विमान त्रिपुरात उतरले तेव्हा मोठा धक्का म्हणजे विमानाचा एक पंख पाकिस्तानवर घिरटय़ा घालत होता (बांगला देश तेव्हा पूर्व पाकिस्तानचा भाग होता). आम्हाला लष्करी शैलीत माहिती देण्यात आली आणि थोडे सामान देण्यात आले. त्यात जंगलात वापरण्यासाठी जड बूट आणि जंगलात वावरताना इतरांना आपण किंवा आपली शस्त्रास्त्रे दिसू नयेत म्हणून सैनिक वापरतात त्या रंगाच्या कपडय़ांचा समावेश होता.’’