‘‘मागा’सांची मगरमिठी’ हा अग्रलेख (१२ सप्टेंबर) वाचला. अमेरिकेत सहज शस्त्र उपलब्ध होतात हे चार्ली कर्क यांच्या हत्येचे कारण नाही तर कर्क यांची मानवताविरोधी भूमिका आहे. अमेरिकेतील काळे असो वा गोरे हे दोघेही परकीय आहेत. गोरे मूळ रेड इंडियन लोकांचा वांशिक संहार करून काळ्या लोकांचे शोषण करीत आले आहेत. आपला देश सोडून अमेरिकेत स्थायिक झालेले युरोपियन लोक मुळात सामाजिक गुन्हेगार होते. युद्ध, हत्या, वर्णभेद हा त्यांचा स्थायिभाव आहे. वॉर इकॉनामीचा अवलंब करून विकसित, विकसनशील व अविकसित देशांचे शोषण केल्याने गब्बर झालेल्या गोऱ्यांचा वांशिक अहंकार शिगेला पोहोचला आहे. भारताच्या सभोवतालच्या देशातील परिस्थिती चिंताजनक असताना आपल्या देशातील मॉबलिंचिंग करणारे, गरिबांच्या घरावर व अतिक्रमणावर बुलडोझर चालवणारे, बटेंगे तो कटेंगे म्हणणारे, दुसऱ्याच्या धार्मिक स्थळावर कब्जा करणारे, अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय, स्त्रिया यांच्यावर अन्याय अत्याचार करणारे कर्क संसदेत, मंदिरात, शासनात, प्रशासनात पदोपदी दिसतात. त्यांना पायबंद कोण घालणार हा खरा प्रश्न आहे.

● नंदन नांगरे

आपण कुठे चाललो आहोत?

‘‘मागा’सांची मगरमिठी!’ हा संपादकीय लेख वाचला. ऑस्कर वाइल्ड म्हणतो, ‘अमेरिका हे एकमेव राष्ट्र आहे जे थेट असभ्यतेपासून ऱ्हासाकडे गेले, मधल्या संस्कृतीच्या टप्प्याशिवाय.’ या वाक्याचा अर्थ असा की काही राष्ट्रे थेट असभ्यतेपासून भौतिक ऱ्हासाकडे जातात, पण मधल्या संस्कृतीच्या टप्प्यात फारसा वेळ घालवत नाहीत. ही एक टीका असली, तरी ती आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. हे वाक्य अमेरिकेवर टीका करत असले, तरी तो प्रत्येक राष्ट्रासाठी एक इशारा आहे हे मात्र नक्की. भारताचा प्रवास यापेक्षा वेगळा आहे. आपण वेद, उपनिषद, रामायण-महाभारत, संत साहित्य, नाट्यशास्त्र, योग आणि आयुर्वेद यांसारख्या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचा वारसा जपला आहे. भारताने ‘असभ्यतेपासून संस्कृतीकडे आणि मग आधुनिकतेकडे’ असा प्रवास केला आहे.

पण आजच्या धावपळीच्या युगात आपणही विचार केला पाहिजे, आपण कुठे चाललो आहोत? आपली प्रगती केवळ मोबाइल, इंटरनेट आणि गगनचुंबी इमारतींमध्ये मोजली जात आहे का? आपण मूल्ये, विचार, आणि संस्कार गमावत चाललो आहोत का? संस्कृतीचा टप्पा गाळलेली प्रगती ही अधोगती ठरू शकते. आपण आपल्या मुलांना केवळ तंत्रज्ञान शिकवत आहोत, की त्यांना विचार, मूल्ये, आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा देत आहोत हे पडताळण्याची हीच योग्य वेळ आहे.

● ममेश माथनकर, अमरावती

…उपयोग प्रत्येक लाभार्थ्याला

‘कामगार विम्याचा उपयोग कुणाला?’ या लेखातील (१२ सप्टेंबर) सर्व मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. सामान्य माणसाच्या आरोग्यविषयक सर्व गरजांचा विचार करून तयार केलेली ही योजना आहे. या योजनेचे मजबुतीकरण, सुसूत्रीकरण, मनुष्यबळ व्यवस्थापन यावर प्रशासकीय स्तरावर काम होण्याची गरज आहे. योजना राबवणाऱ्या सर्व घटकांचा समन्वय वाढण्याची गरज आहे. मी स्वत: या आरोग्यसेवेत ३२ वर्षे वैद्याकीय अधिकारी (काही काळ अधीक्षक म्हणून) म्हणून काम केले आहे. व्यवस्थेतील मर्यादा, लाभार्थींच्या मर्यादा आणि आरोग्यसेवा देणाऱ्यांच्या मर्यादा या सगळ्याचा विचार केला तरी, कामगारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही शासकीय पातळीवरची एक अत्यंत उपयुक्त आरोग्यसेवा आहे. तिचा उपयोग प्रत्येक लाभार्थी कामगाराला मिळेलच यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत हेच उत्तर आहे.

● डॉ. श्रीकांत कामतकर, सोलापूर

पोलीस कायदेपालन करतील?

‘कर्तव्य बजावताना पोलिसांनी पक्षपात टाळावा’ ही बातमी (सप्टेंबर १२) वाचली. अकोला जिल्ह्यातील दंगलीच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीबरोबर धर्माच्या नावे पक्षपात केल्याचे निदर्शनास आले. भारतीय संविधानातील अनुच्छेद १४,१५ नुसार कायद्यापुढे समानता आणि जात, लिंग, धर्म, जन्मथळ यावरून कोणीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर पक्षपात करू शकत नाही. तसे कोणी करत असेल तर ते मूलभूत अधिकारांचे हनन ठरते. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तेच असा पक्षपात करणार तर काय आदर्श राहील असा प्रश्न पडतो. पोलीस अधिकारी काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी नोंदवून न घेता उलट प्रश्न करतात, यामुळे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि भारताचे संविधानाचे पालन करणे गरजेचे आहे.

● मंगला ठाकरे, नंदुरबार