scorecardresearch

चिंतनधारा : धर्माबद्दलचा विचित्र दृष्टिकोन

लहानपणापासून धर्म म्हणजे चंदन लावणे, धर्म म्हणजे मूर्तीवर पाणी घालणे आणि धर्म म्हणजे धर्मज्ञ, बुवा, बाबा सांगतील तसे मन लावून करणे, एवढीच शिकवण आपल्या घरीदारी दिली जाते.

chitandhara

राजेश बोबडे

लहानपणापासून धर्म म्हणजे चंदन लावणे, धर्म म्हणजे मूर्तीवर पाणी घालणे आणि धर्म म्हणजे धर्मज्ञ, बुवा, बाबा सांगतील तसे मन लावून करणे, एवढीच शिकवण आपल्या घरीदारी दिली जाते. व्यवहारातही बाल्यदशेपासून त्यांचा कुठे संबंधच येत नाही व आपल्या शाळांतून तसे शिक्षणच जर दिले जात नाही तर कुणीही बुवाचा वेश घेऊन काही सांगावयास प्रारंभ केला की तो धर्मच, असे आपण ठरवावे, यात काय वावगे आहे? असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करतात.

धर्माबद्दल लोकांचा विचित्र दृष्टिकोन स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘गीता धर्म शिकविते हे खरे, पण काही शिकवणारे गीतेवर जोर देऊन निर्भयता व सर्वभूतहितेरत: शिकवण्यापेक्षा आणि अन्यायाच्या प्रतिकारार्थ आपल्यात हिंमत असलीच पाहिजे, हे पटवण्यापेक्षा ती गीता चांदीच्या पत्र्यावर सोन्याच्या अक्षरांनी लिहून सुंदर देव्हाऱ्यात बसवावी आणि दररोज फक्त तिची पूजा करावी, म्हणजे पुत्र व धनप्राप्ती होते, रोग जातात, दु:स्वप्ने पडत नाहीत, हाच त्या गीतेचा उपयोग म्हणून शिकवितात. त्यामुळे अनभिज्ञ लोकांच्या मनावर धर्माची हीच व्याख्या (?) ठसून इतकी दृढमूल होऊन बसते की मग त्यापुढे धर्म म्हणजे काय हे सांगणे बुवांना आणि त्यांच्या सांप्रदायिकांनाही कठीण जाते. अज्ञ किंवा स्वार्थी उपदेशकांनी लोकांना रुचतील अशाच रूढी निर्माण केल्या की त्याच रूढी धर्माचे सिंहासन बळकावून बसतात आणि मोठय़ा धर्मज्ञांनासुद्धा मग त्यांचे उच्चाटन करणे अशक्यप्राय होते.

असाच गोंधळ आज समाजात सुरू असल्यामुळे राष्ट्रधर्म, देशधर्म व विश्वधर्म म्हणजे काय याची जिवंत कल्पना आवश्यक असतानाही आज ती प्रत्यक्षात येणे दुरापास्त झाले आहे.’ ‘उदाहरणादाखल एक लहानसेच चित्र आपण घेऊ. स्वत:च्या शेतीत कष्टाने धान्य निर्माण करून आपल्या घरी जपून ठेवावे आणि कुणी दारात येईल तेव्हा पैसा घेऊन धान्य द्यावे. फार तर पुण्य मिळते म्हणून बुवा, ब्राह्मणास आग्रहाने खाऊ घालावे. हेच आमच्या धार्मिकांचे (?) संस्कार होत. याखेरीज गावात जर धान्याचा तुटवडा निर्माण झाला, लोक भुकेने व्याकूळ होऊन मरू लागले तर त्यांना आपण विनामूल्य मदत करावी हे त्यांच्या कानावरही कधी आलेले नसते. फारच धार्मिक असला तर व याचक पाया पडून फारच स्तुती करू लागला तर त्याला मूठभर (वाळूचे कण अर्धे मिसळलेले) धान्य मोठय़ा आढय़तेने द्यावे, एवढेच त्याला माहीत असते. समाजातील अशा प्रवृत्तीवर प्रहार करताना महाराज आपल्या भजनात लिहितात,

माथेपे चंदन, तिलक लगावे,

    माला गले में भारी।

गरिबन की तो कदर न जाने,

    क्या बोलेगा बिहारी।।

गेहूँ में कंकड, पेढे में आटा,

    दूधमें पानि मिलावे।

मीठी बातें, कहकर बेचे,

    कसम धरम की खावे ।।

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 00:02 IST