राजेश बोबडे
सांप्रदायिक बुवांची बेपर्वा वृत्ती पहाताना त्यात तीन वर्ग पडलेले दिसतात, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. ‘‘एकतर बुवा म्हणून फक्त आशीर्वाद देणारे किंवा ज्यांची दिनचर्या वेडय़ाहून कोणत्याही अधिक किमतीची नाही असे; ‘ते समाधिस्थितीतच आहेत. त्यांना जगाचे भान काय?’ असे म्हणून मोठमोठय़ा विदेही पुरुषांची उदाहरणे देऊन व्यवस्थित जाहिरात करून पुढे आणलेले असे हे बुवा! दुसरा वर्ग म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व कृत्रिमपणे मोठे करून वाटेल तसा चमत्काराचा आव आणून आपले पोट भरणारे, म्हणजेच धर्मप्रचारक समजले जाणारे. अर्थात् ज्याने कधीही समाजाच्या धारणेचा अभ्यास केलेला नाही, आपले हित म्हणजेच जगाचे कल्याण असे समजणारा हा वर्ग! आणि तिसरा वर्ग म्हणजे फक्त बुवालोकांवर केवळ मजा मारणारा. ज्यांना जगाचीच काय पण आपल्या इभ्रतीचीही पर्वा नसते. सत्पुरुषांचा बोध म्हणजे उत्तम भोजन करणे, बुवांच्या जवळ आलेल्या वस्तूंचा उपभोग घेणे ‘श्वशुरांच्या धनावर जावई उदार’ या म्हणण्याप्रमाणे वागणे असे जे समजतात; आपल्या ऐषोरामापुढे ज्यांच्याजवळ त्यागबुद्धी जन्मालाच आलेली नसते किंबहुना दुसऱ्याचा त्यागही ज्यांना करमणूकच वाटते, अशा लोकांचा हा तिसरा वर्ग आहे.’’
महाराज म्हणतात, ‘‘या तीनही वर्गाकडे पाहिल्यानंतर असे वाटू लागते की, यांच्याने स्वत:चे पोटही भरणे होत नाही, मग हे दुसऱ्यावर आपले वजन टाकून आंधळय़ा समाजाला आदर्शवत कसे करतील? त्यामुळे अशा धर्मवेडय़ा लोकांचा फायदा अन्य धर्मातील लोक असा मोकळय़ा मनाने घेतात की, आमचेच पाय आमच्याच गळय़ांत टाकून आम्हालाच लटकावून आपला शहाणपणा जगात पुढे ठेवण्याची त्यांची तयारी! हा सर्व प्रकार उघडय़ा डोळय़ांनी पाहिल्यानंतर विचारवान माणसाला जी चीड येते तीस ‘आमच्या धर्मोपदेशकांच्या व बुवाबाजीच्या नावावर हाकाटी पिटणे म्हणजे पापाचरण करणे होय’ असे आम्ही कोणत्या तोंडाने म्हणावे, असे सहजच वाटते. आणि त्यांची तरी वाट किती पहावी की यापुढे आता तेच बुवालोक आपल्याला नवीन मार्ग सांगणार व आम्हा लोकांकरिता प्राण खर्ची घालणार म्हणून? प्राण देण्याकरिता त्यांना फुरसत तरी कुठे आहे? त्यांनी आपले वेष सांभाळावेत, की आपल्या धार्मिक संस्थानांची परंपरा चालवावी, की आपल्या व्यसनपूर्तीकरिता द्रव्य आणावे, की आपले शरीरस्वास्थ्य पहावे? किती तरी कामे असतात त्यांना! असे लोक किती असतील हा प्रश्न जर कोणाला पडला असेल तर तोही लहानसहान नव्हे. त्यांची संख्या कमीजास्त कोटींवर तरी आहे. हे सर्व देवभक्तीवर व बुवापणावर जगणारे व ‘परमार्थ हाच आमचा धंदा आहे,’ असे समजणारे आहेत,’’ असे महाराज म्हणतात.