शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असताना कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे कल्याण आपणच करू शकतो अशी जाहिरात करण्याची सर्वच राजकीय पक्षात अहमहमिका स्वतंत्र्यापासूनच आहे. सत्ताधारी भांडवलदारांचे बटीक झाल्याचा आरोपही आळीपाळीने विरोधी व सत्ताधारी पक्ष करीत असतो. याची जाणीव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना फार पूर्वीच झाल्याचे त्यांनी कष्टकऱ्यांना उद्देशून केलेल्या चिंतनातून जाणवते. महाराज म्हणतात, स्वतंत्र भारतात शेतकऱ्यांचे व मजूर, कामगारांचे सुराज्य नांदावे. प्रसंगी हरिजनाच्या मुलीलाही दिल्लीच्या तक्तावर बसवून आम्ही राज्य चालवू शकलो पाहिजे, भावी काळात शेतकरी व मजूर कामगारांतही राज्य चालविण्याची बुद्धी प्रगट होईल. मागासलेल्या समाजाला उन्नत करून त्यांच्या उद्योगधंद्याला व ग्रामीण जीवनाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले पाहिजे हे ध्येय गाठण्यासाठी शुद्ध मार्ग आहे तो म्हणजे खेडय़ाला ग्रामीण जीवनाची छोटेखानी राजधानी करावयाची. महाराज पुढे म्हणतात मला असे नेहमी वाटते की, आता सर्व पुढाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा प्रवाह मागासलेल्या वर्गाकडे, समाज शिक्षणाकडेच वळला पाहिजे. त्यानेच मजुरांचे व शेतकऱ्यांचे खरे कल्याण होणार आहे.
अवगत असलेले काम सोडून, राज्यतंत्र चालविण्याच्या मागे लागून अधिकाराच्या जागाच पटकावतो असे जर प्रत्येकाने म्हटले तर कसे चालेल! राज्यतंत्र चालविण्यासाठी जी बुद्धी, युक्ती, त्याग, सत्यता व नीती हवी आहे, ती आमच्या सर्व लोकांत आली पाहिजे; पण आजचा समाज एवढय़ा खालच्या पातळीवर आहे की, त्याला कोणता पुढारी समाजाच्या हिताचा आहे हेसुद्धा कळत नाही. त्यामुळे भांडवलदार लाचलुचपत देतात आणि काळाबाजार करणारा निवडणुकीत यशस्वी करतात. हाच माणूस पुढे अधिकाराच्या जागेवरून आमची पिळवणूक करतो व आम्ही आमच्याच लोकांकडून आमचा नाश करून घेतो. ही ब्रिटिशांची राजनीती अद्याप आमच्या देशातून गेली नाही. मागासलेल्यांना सुबुद्ध करणे हाच यावर उपाय! हा किळसवाणा प्रकार पूर्ण बंद करायचा असेल तर आमचा शेतकरी, कष्टकरी समाज राष्ट्रीय बुद्धीने चमकला पाहिजे! हा समाज आपली शेती वा आपला धंदा करण्यात जेवढा पटाईत, तेवढा तो आपल्या देशाची राजनीती जाणण्यात, आपला पुढारी ओळखण्यात व आपणही प्रसंगी राजकारणाचा यथोचित वाटा उचलण्यात पटाईत आहोत या भावनेने नैतिक पातळीवर सज्ज झाला पाहिजे! यासाठी त्यांच्या बुद्धीच्या विकासाशिवाय दुसरा मार्गच असू शकत नाही. शेतकऱ्यांनो व कष्टकऱ्यांनो, तुम्ही ज्ञानाची, कामधंद्याची तसेच समाजसेवेच्या बुद्धीची वाढ करून घ्या तुमच्या तेजस्वी व स्वावलंबी वृत्तीने या भारत देशाला आदर्श राष्ट्र बनवा, हीच माझी तुम्हाला हाक आहे. महाराज ग्रामगीतेत लिहितात.
अरे! उठा उठा श्रीमंतांनो!।
अधिकाऱ्यांनो! पंडितांनो!।
सुशिक्षितांनो! साधुजनांनो !।
हाक आली क्रांतीची॥
गांवागांवासि जागवा।
भेदभाव हा समूळ मिटवा।
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा। तुकडय़ा म्हणे॥
राजेश बोबडे