राजेश बोबडे

माणुसकीचा महामंत्र ग्रामदानात आहे, असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘दान या शब्दात आपले काही नाही, समाजाचे आहे, असा निरहंकार भाव निर्माण होणे, असा अर्थ आहे. आतापर्यंत धर्म, साधू, संत या सर्वानी हेच सांगितले आहे. माझे माझे म्हणूनही देणे कोणाला चुकत नाही. समाजात प्रत्येक वस्तूची गरज प्रत्येक व्यक्तीला असते आणि एकमेकांकडून देवाण- घेवाण करूनच ही गरज भागविली जात असते. समाजातील हा देण्या-घेण्याचा व्यवहार कोणालाही चुकविता येत नाही. फक्त या व्यवहारात भावनेचा फरक असतो.’’

‘‘ग्रामदानातील भावना अभिप्रेत आहे. उपभोगाची वस्तूसुद्धा कृतज्ञ भावनेने स्वीकारणे व कर्तव्यबुद्धीने समर्पण करणे; ही क्रिया ग्रामदानामुळे घडते. मी म्हणण्याचे दु:ख न भोगता आपण म्हणण्याचे सुख कसे भोगावे, हे अनुभवी लोकांनाच कळते. ग्रामदानात हे सुख प्रत्येक ग्रामवासीयाला अनुभवता येते. हे सारे गाव माझे, मी त्यातील एक सहकारी, अशी भावना प्रत्येक नागरिकात ग्रामदानामुळे निर्माण होऊ शकते. ही माणसाची गौरवास्पद स्थिती आहे. या स्थितीला उतरावयाचे असेल तर मूर्ख माणसे माझे धन, माझे घर, माझी शेती, माझी बायको, असे माझे-माझे करीत बसू शकतात. पण, सामाजिक कायदा या मूर्खपणाविरुद्ध आहे. तो म्हणतो, ‘अरे तुझ्या शेतीत, घरात, उद्योगात, सुखदु:खात तुझ्या गावाचाही वाटा आहे. मग तो कर रूपाने दे किंवा दान रूपाने दे’ आपला धर्मही हेच सांगतो. तो म्हणतो – ‘तुझ्या शरीरावरही तर तुझा हक्क नाही. तेव्हा आजपासूनच हा अभ्यास कर की, धन कुबेराचे असून देह काळाचा आहे. तुझे या जगात काही नाही. ही धर्माची आणि सामाजिक जीवनाची शिकवण  ग्रामदानात गृहीत धरली आहे. ही काही केवळ विनोबांची शिकवण नाही. ही आपल्या संस्कृतीची, धर्माची, माणुसकीची शिकवण आहे; पण आपण प्रत्येक ठिकाणी मी-मी करून मालक म्हणून घेण्यासाठी हपापलो आहोत. याचा परिणाम गावाच्या विनाशात होईल. या विनाशातून आपल्याला वाचावयचे असेल तर त्यावर ग्रामदान हाच एक मार्ग आहे, माझे धन, माझे धन करणाऱ्यांना महाराज ग्रामगीतेत इशारा देताना म्हणतात,

धन हे गरीबांचे रक्त।

    समजोनि वागोत श्रीमंत।।

श्रम ही गावाची दौलत।

    म्हणोनि व्हावा मान तिचा।।