राजेश बोबडे
हिंदू धर्मात जी गुरु-शिष्य परंपरा आहे त्याबद्दल शंका निरसन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘जगातील सर्व देशांत, धर्मात व संप्रदायांत गुरूची परंपरा आहे यात शंकाच नाही. पण पद्धतीत व प्रक्रियेत मात्र फरक आहे. मार्गदर्शकाशिवाय कोणालाही कोणती विद्या अवगत होणे; कोणातही गुण-अवगुण निर्माण होणे शक्य नाही. पण त्यात पारमार्थिक विद्या ही मात्र विशेष मानली गेली आहे. म्हणून तिचा आदर मोठय़ा श्रद्धेने केला जातो. प्रत्यक्षात त्या विद्येच्या गुरूची पूजा, आज्ञापालन, सेवावृत्ती इंद्रिय-संयम व अध्यात्मचिंतन याच मार्गाने होत असते. या गोष्टीला समाजाने जे बुवाबाजीचे रूप दिले आहे, ते फक्त मला आवडत नाही. वास्तविक पाद्यपूजा म्हणजे चरण पूजा. यालाच एक अर्थ आज्ञापालन किंवा प्राण जाई पर वचन न जाई असे संतांचे सांगणे आहे.’’
‘‘आता वचन म्हणजे उपदेश व हा उपदेश म्हणजे आपल्या अत्यंत निकटचा देश- आत्म्याचे आपण सुहृद आहोत याची जाणीव. ही जाणीव एकतर कथेच्या रूपाने करून घ्या किंवा मंत्राच्या रूपाने करून घ्या. प्रश्न आहे परिणामांचा, त्याला दोघेही जबाबदार असतात. उपदेशक व उपदेश घेणारे दोघेही जर निव्वळ कथानकी असतील तर देशाचा, जीवनाचा, आयुष्याचा काळ फुकट आहे. जर परिणाम असेल तर पात्र तयार होईल असे समजावे. अशाप्रकारे वस्तू जर तयार झाली तर तिचा फायदा अनायासे जग घेईलच. ज्याला दिसेल तो घेईल. हवा, पाणी व भूमीचा फायदा जसा लोकांना मिळतो तसा सज्जनांचाही फायदा सुसंस्कार निर्माण करण्यासाठी होत असतो. पण हे सारे उपयोग करून घेणाऱ्यांवर अवलंबून आहे. तेव्हा मंत्र म्हणजे सल्ला, उपदेश व खरे रहस्य म्हणजे आपले मन तसे तयार करून सेवेला लायक करणे, याला जप म्हणतात. नाहीतर दिवसभर माळा फिरवली व पापाची वेळ येईल तेव्हा खुंटीला टांगली यात यश कसे येणार?’’
‘‘म्हणून माझे आपणास सांगणे आहे की कुणाचाही उपदेश घ्या. कोणालाही गुरू माना. कोणताही पंथ स्वीकारा, पण आचरण शुद्ध ठेवा. मन शुद्ध ठेवा. देशाभिमान, धर्माभिमान, कुळाभिमान या गोष्टी आचरणातून व्यक्त करा. मी तर सामुदायिक ध्यानाचा पाठच गुरुमंत्र समजतो व तो सर्वासहित जपत असतो. खऱ्या गुरूची ओळख सांगताना महाराज ग्रामगीतेत लिहितात –
गुरू म्हणोनि न गुरगुरावे।
आत्मवत सर्वासि जाणावे।
उठण्या-बसण्यापासूनि शिकवावे।
आईसारिखे अज्ञ जना।।