स्वत:चा जन्मदिवस साजरा करण्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रखर विरोध होता. ‘‘समाजात इतके संत महंत, राष्ट्रपुरुष आहेत की त्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याला वर्षांतील ३६५ दिवसही कमी पडतील. प्रचलित उत्सवच कसे कमी करता येतील या विवंचनेत मी असताना माझाच जयंत्युत्सव साजरा करणे म्हणजे जिवंतपणीच माझे मरण चिंतणे होय’’, असे महाराज म्हणत. भारत हा खेडय़ांचा, प्रचंड गरिबी असलेला देश असून ग्रामवासीयांचे, ग्रामाच्या उत्थानाचे क्रियाशील उपक्रम राबवून, जन्मदिवस साजरा करायचाच असेल तर त्याला ‘ग्रामजयंती’ नाव देऊन त्यातून खेडय़ांचे सामथ्र्य वाढविण्याचे आवाहन महाराजांनी केले होते.
हे उपक्रम एका दिवसापुरतेच असू नयेत, म्हणून ३० एप्रिल हा महाराजांचा जन्मदिवस असताना ‘अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळा’च्या वतीने संपूर्ण एप्रिल महिनाभर विधायक उपक्रमांनी देशभर ‘ग्रामजंयती मास’ म्हणून साजरा केला जातो. स्वत: महाराजांनी भंडारा जिल्ह्यातील आमगाव क्रियाशील उपक्रमांनी आदर्श केले, त्यांचा आदर्श ग्रामाचा उपक्रम पाहाण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आले होते. पुढे याच योजनेला भारत सरकारने ‘आदर्शग्राम’ नाव देऊन हा उपक्रम देशपातळीवर राबविला. ग्रामसुधारणेबाबत महाराजांचे विचार आजही प्रासंगिक आहेत.
‘‘ग्रामाच्या सर्वागीण उन्नतीसाठी जे विचार ग्रामीण लोकांनी व काही अनुभवी सज्जनांनी करावयाचे आहेत व ते विचार दृढ करून आचाराला सुरुवात करावयाची आहे, त्याला मी ग्रामजयंती म्हणतो. ग्रामजयंती सर्वाच्या उदयाची पायवाट आहे. आम्ही ‘जयंती’ पाळत आहोत, वर्षांतून एक महिना आपल्या घरून सुटी घेऊन आपल्याला आवडणारे, उन्नतीकारक; धर्म व राष्ट्रकार्याचे विचार ग्रामाला देवाण-घेवाण करीत फिरण्यासाठी ही ग्रामजयंती, भारताच्या समजदार नागरिकांनी साजरी करावयाची आहे. ज्या थोर नेते, संत, सत्ताधीशांना हे आवश्यक वाटत असेल त्यांनी त्यात सर्वतोपरी सहकार्य करावयाचे आहे. या कार्यात जे गळाले, त्यांना त्यांना समाजाने जागृत करावयाचे आहे की, तुम्ही सक्रिय असे आजवर काय केले? – ते तरी सांगा.. पण हा उत्सव अखिल भारताच्या ग्राम-जयंतीचा आहे; यातच सर्वाची मने वेधली गेली पाहिजेत. असा प्रचार करणारे प्रचारक काही महिने तरी घरी दारी, शेजारी व सरकारदरबारी अत्यंत प्रेमाने ग्रामाच्या ‘जयंती’ म्हणजे प्रगत विचारासाठी फिरले पाहिजेत व आपापले ग्राम सर्वागपूर्ण करण्याचे त्यांनी मनात आणले पाहिजे. हे प्रचारकांनी घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी करणे- हेच ग्रामजयंतीचे कार्य आहे.’’
श्रीमंताकडील ऐश्वर्य व दुसरीकडे भारतातील गरिबीच्या विषमतेचे वर्णन आपल्या भजनात करताना महाराज म्हणतात,
ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा,
देशात समता नांदवा।
एकाच्या महालात फुलताती बागा।
दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा ।।