राजेश बोबडे
माणुसकीचा महामंत्र ग्रामदानातून दिला जातो, असे स्पष्ट करून दानाचे महत्त्व व दानाचा हेतू सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘मी केवळ माझ्यासाठी नाही. माझ्या जीवनाला लागणाऱ्या कितीतरी गोष्टी दृश्य व अदृश्य रूपात मला ज्यांच्याकडून मिळत राहतात त्यांच्यासाठी आहे. जीवनातील हे देणे-घेणे कर्तव्यरूपाने असेल तर ते दानच होय.
दान देताना त्यातून काही अपेक्षा असेल तर असे सहेतुक दान हे दान होऊच शकणार नाही. काही जण आवळा देऊन कोहळा काढण्याची योजना आखून स्वत:चा व कुटुंबाचा उदोउदो व्हावा यासाठी सहेतूक दान देतात, दानामागे कृतज्ञता असली पाहिजे. कृतज्ञता बुद्धीने केलेले दान एक महान वस्तू ठरते. आगीत
जळलेली वस्तूसुद्धा महत्त्वाची कामगिरी करते; कारण त्या जळण्यातून जीवनासाठी बरेच काही मिळत असते जसे अन्न, मातीची भांडे इत्यादी. आम्ही पाहिले आहे की, आमच्या हातून सुटलेली, पडलेली, फेकली गेलेली वस्तूही इतरांच्या उपयोगी पडते. किंवा आम्हीच तिचा अन्य रूपात उपयोग करीत असतो. यात दानाची भावना नसेल तरी केवळ उपयोग होतो; पण दानाची भावना असेल तर उपयोगाबरोबर माणसाचा आध्यात्मिक विकासही होत जातो.’’
‘‘दान म्हणजे देणे. दान निष्काम असो या सकाम तिथे घेण्याची क्रियाही घडते. ब्राह्मणांना दान, साधू-संतांना दान, भिक्षा मागणाऱ्यांना दान असे म्हणण्याची प्रथा असली तरी या दान घेणाऱ्याकडूनही समाजाला काही तरी मिळत रहावे, असे गृहीत धरलेले असते. अशा प्रकारे दानाची परतफेड जर केली जात नसेल तर ते दान एकपक्षी व परिणामी उपद्रवीच होणार! दुसऱ्याप्रकारे दानाचा मोबदला दात्यासही मिळत असतोच. गावाच्या शाळेसाठी, रस्त्यासाठी एखादा दाता दान देतो. हे दान निरपेक्ष असले तरीसुद्धा त्याची मुले-बाळे त्या शाळेत शिक्षण घेतात. रस्त्याचा त्याच्या गाडी-घोडय़ाला फायदा मिळतो. दान कधीच वाया जात नाही; असा याचा अर्थ आहे. विनोबांनी ग्राम-दानाची प्रेरणा जनतेला देण्याचे कार्य हाती घेतले आहे. यात देणारा व घेणारा म्हणजे संपूर्ण गाव सुखी व्हावे; असा संकल्प आहे. यात शेतकऱ्यांचे शेतीदान, कामकऱ्याचे श्रमदान, उद्योगी माणसाचे उद्योगदान, शिक्षकाचे बुद्धीदान, कलावंताचे कलादान म्हणजे सर्वाचे सर्वदान, असे गृहीत धरले आहे. याचा अर्थ गावातील प्रत्येक माणसाने आपले हात, आपली बुद्धी समाजासाठी राबवायची, प्रत्येकाने गावातील माणसांची काळजी घ्यायची, असा आहे. सहेतुक दान देण्याऱ्याबद्दल महाराज ग्रामगीतेत म्हणतात
आधी लुटले जनलोकांसि।
जमा केल्या धनाच्या राशी।
मग बांधिले देऊळासि।
शीग काही उतरेना।।
चोरी करुनि धनी झाला।
दान देण्यात शूर ठरला।।
बिचारा गरीब तसाचि मेला।
कळला नाही कष्ट करुनि।।
