तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि महात्मा गांधी पत्रानुबंध असो वा ऋणानुबंध असो, या सर्वांमागे गांधींची धर्मजिज्ञासा सक्रिय होती, हे लक्षात येते. गांधी – तर्कतीर्थ औपचारिक संबंधांचे रूपांतर अनौपचारिक संबंधात करण्यात जमनालाल बजाज, हरिभाऊ फाटक, काकासाहेब कालेलकर, चक्रवर्ती राजगोपालाचारी, न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ, डॉ. राजेंद्र प्रसाद, ग. वा. तथा दादासाहेब मावळणकर प्रभृती मान्यवरांचा सिंहाचा वाटा तर होताच; पण महात्मा गांधींना तर्कतीर्थांनी प्रभावित व धर्मप्रबुद्ध केले, ते स्वत:च्या वेद, उपनिषद, पुराण, ब्राह्मणग्रंथ इत्यादींवरील व्यासंगी अधिकारामुळे आणि धर्माधारांचे आकलन समकालीन संदर्भात स्पष्ट करून मानवलक्ष्यी आधुनिक धर्ममीमांसा करण्याच्या हातोटीमुळे. शब्दप्रमाण हिंदू धर्मचिकित्सा बुद्धिप्रमाण करण्याचे विसाव्या शतकातील ऐतिहासिक कार्य जर कुणी एकांड्या शिलेदारीने केले असेल तर ते तर्कतीर्थांनी.
तर्कतीर्थ – गांधी पत्रानुबंध व ऋणानुबंध हा सनातनतेकडून नवमानवतावादाकडे जाणारा आहे. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वामधील ठळक पैलू म्हणजे त्यांची धर्मजिज्ञासा. गांधी स्वत:स धार्मिक मानत असले, तरी ते धर्माचे शब्दप्रमाण अंधानुकरण करणारे धर्मश्रद्ध खचितच नव्हते. धर्मविषयक त्यांची जिज्ञासा विचारशील, प्रश्नांकित आणि खरं तर प्रयोगशील होती असे दिसते. गांधी ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हीच धर्माची मूळ मूल्ये मानत. ‘सत्य म्हणजे देव आणि देव म्हणजे सत्य’ या त्यांच्या विधानातून ते स्पष्ट होते.
अहिंसा हे महात्मा गांधींच्या लेखी सत्यप्राप्तीचे साधन होते. सदाचार हाच धर्म मानणारे गांधी अनेक धर्मांमध्ये समन्वय साधू इच्छित होते. गांधींची ‘सर्वधर्मसमन्वय’ वृत्ती लक्षात घेऊनच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘सर्वधर्मसमीक्षा’ (१९८४) ग्रंथ रचला होता. महात्मा गांधी ‘गीता’, ‘बायबल’, ‘कुराण’, ‘त्रिपिटक’, ‘आगम सूत्रे’चे अभ्यासक होते. गांधी आश्रमांतील प्रभात नि सायंप्रार्थनेत सर्वधर्म प्रार्थना असत. धर्माच्या नावाखाली चालणारी कर्मकांडे, अंधश्रद्धा, शोषण यांचे अनुकरण व समर्थन महात्मा गांधींनी कधी केले नाही. ‘सेवा हीच माझी प्रार्थना’ म्हणणारे महात्मा गांधी मानवधर्मी होते.
‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेत महात्मा गांधी जसा धर्मोच्चार करतात, तसाच तो विविध व्यक्तींना लिहिलेल्या पत्रांमधूनही करताना दिसतात. पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहिलेल्या एका पत्रात महात्मा गांधींनी म्हटले होते की, ‘‘माझा धर्म केवळ मंदिरातल्या विधींमध्ये नाही, तो माझ्या प्रत्येक कृतीत आहे. राजकारण हे धर्माधिष्ठित असावे म्हणणाऱ्या महात्मा गांधींनी ते द्वेष, वैर यांवर उभे न करता नैतिकता, समन्वय आणि सद्भाव यांवर बेतले होते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. धर्म जीवन कसे जगायचे ते शिकवतो.’’
सरदार वल्लभभाई पटेल आणि काकासाहेब गाडगीळ एकदा सोरटी सोमनाथ मंदिर जीर्णोद्धाराचा प्रस्ताव घेऊन महात्मा गांधींकडे गेले असता, गांधींनी दोन अटींवर त्यास संमती दिली होती. एक म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार स्वराज्य फंडातून न करता लोकवर्गणीतून करावा आणि दुसरी अट होती जीर्णोद्धारित मंदिर सर्व जाती-धर्मांना मुक्त प्रवेश देणारे असेल. प्रस्तुत मंदिर उभे राहिल्यावर सर्व शंकराचार्यांनी मंदिर प्राणप्रतिष्ठेस नकार दिल्यावर तर्कतीर्थ या प्राणप्रतिष्ठेचे आधुनिक पौरोहित्य करतात नि पौरोहित्य दक्षिणा नाकारून तो निधी संस्कृत विद्यापीठ निर्माण करावे म्हणून दान करतात, अशी असते तर्कतीर्थ-गांधी विचार आणि व्यवहाराची सुसंगती.
तर्कतीर्थांनी सन १९४१मध्ये ‘हिंदुधर्माची समीक्षा’ ग्रंथ प्रकाशित केला होता, तेव्हा त्याच्या प्रस्तावनेत स्पष्ट केले होते की, ‘‘जे जुने जग गळ्यातील लोढणे बनून मनुष्याच्या प्रगतीस अडथळा करीत आहे, त्याचा विनाश करणारी शास्त्ररूपी विचारशस्त्रे निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक पुरोगामी तत्त्वचिंतक व कर्तृत्वशाली लोक करीत आहेत. या शास्त्ररूपी शस्त्रांनी जुन्या जगाशी लढता लढता, जुन्या व वर्तमान समाजातील मानसिक व भौतिक दास्याचा ज्यात मागमूसही नाही, असे सगळ्या समाजघटकांना सारखेच स्वातंत्र्य प्राप्त करून देणारे, सर्व समाजघटकांच्या कर्तृत्वाच्या पूर्ण विकासास अवसर देणारे नवे जग घडवायचे आहे.’’ वर्तमानात हे आव्हान पेलायचे तर आपण धर्माचे पुरोगामी सीमोल्लंघन केले पाहिजे, तरच नवे जग निर्माण होईल. drsklawate@gmail.com