सामान्यांपर्यंत पोहोचायचे असेल, तर त्यांची बोली बोलावी लागेल. मध्यमवर्गाच्या उंचावलेल्या महत्त्वाकांक्षांना साद घालेल, तोच ब्रॅण्ड बाजार जिंकेल हे दिवाण अरुण नंदा यांनी अचूक ओळखले होते. १९७०-८० च्या दरम्यान बहुराष्ट्रीय कंपन्यांची दादागिरी असलेल्या जाहिरात क्षेत्रात त्यांच्या ‘रीडिफ्यूजन’ या कंपनीने स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केले ते याच आकलनाच्या जोरावर. आणि राजीव गांधींनी आपल्या राजकीय जाहिरातींची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली, तीही जनमताचा कल जाणून घेण्याच्या त्यांच्या याच क्षमतेमुळे.
अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या पहिल्या बॅचचे (१९६६) नंदा सुवर्णपदक विजेते होते, तर ‘हिंदुस्तान लीव्हर’च्या व्यवस्थापनातील पहिले प्रशिक्षणार्थी. १९७३ साली त्यांनी ‘रीडिफ्यूजन’ या स्वत:च्या ‘क्रिएटिव्ह एजन्सी’ची स्थापना केली आणि तगड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला शह देत पुढची दोन दशके अक्षरश: गाजवली. तोवर या क्षेत्रात भारतीय कंपन्यांना प्रवेश निषिद्धच असल्यासारखी स्थिती होती, पण रीडिफ्यूजनने केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी कंपन्यांसाठीही उत्तम जाहिराती तयार केल्या आणि जाहिरात क्षेत्रातील अनेक पुरस्कारांवर आपली नाममुद्रा उमटवली. नंदांचा साधेपणाविषयीचा आग्रह हे त्यांच्या यशामागचे महत्त्वाचे कारण ठरले. ग्राहकांच्या मनावर कोरल्या जातील, त्यांच्या दैनंदिन संवादांचा भाग होतील, त्यांचा ब्रँडविषयीचा दृष्टिकोनच बदलून टाकतील अशा जाहिरातींची निर्मिती करणे हे आपल्या कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्थापनेवेळीच जाहीर केले होते. पुढील प्रदीर्घ प्रवासात त्यांनी कधीही या उद्दिष्टापासून फारकत घेतली नाही.
‘पामोलिव्ह दा जवाब नही’, ‘गिव्ह मी रेड’ (एव्हरीडे), ‘इस को लगा डाला तो लाइफ झिंगालाला’ (टाटा स्काय) ही वाक्ये त्या त्या काळात सर्वसामान्यांच्या ओठांवर रुळली. ‘रिन वॉशिंग पावडर’च्या पाकिटांवरचे कडाडणाऱ्या विजेचे चिन्ह असो वा ‘गोल्ड स्पॉट’ला दिलेली ‘द झिंग थिंग’ ही उपमा असो, दिवाण यांनी प्रत्येक ब्रँडवर स्वत:ची छाप उमटवली. ‘द गार्डन वरेली वुमन’ या साड्यांना नवे ग्लॅमर मिळवून देणाऱ्या जाहिरातीत ए. आर. रेहमानच्या संगीत-दिग्दर्शनाखाली ‘देस’ रागाचे फ्यूजन वापरले. रहमान यांनी पुढे त्यांच्यासाठी तयार केलेली ‘एअरटेल’ची धून प्रचंड लोकप्रिय झाली. ‘व्हेनएव्हर यू सी कलर, थिंक ऑफ अस’ या ‘जेन्सन अँड निकोल्सन पेन्ट्स’च्या जाहिरातीचीही प्रशंसा झाली. त्यांच्या ग्राहकांना ते नेहमीच जाहिरात क्षेत्रातील जादूगार वाटत आले.
अन्यही विविध क्षेत्रांत नंदा यांचा मुक्तसंचार होता. राजीव गांधींच्या नजीकच्या वर्तुळात त्यांचा समावेश होता. अरुण नेहरू आणि अरुण सिंग या तत्कालीन खासदारांशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध होते. रतन टाटा त्यांचे जवळचे मित्र. त्यांच्या मित्रपरिवारात अमिताभ बच्चन, विजय मल्ल्या, शिव नाडर, दीपक खैतान अशांचा समावेश होता. नंदा उत्तम व्यावसायिक होते. आपल्या वाटेत येणारे अडथळे कसे पार करावेत आणि संकटांतील संधी कशी साधावी याचे उत्तम ज्ञान त्यांना होते. याच गुणांमुळे ते प्रतिस्पर्ध्यांना पुरून उरले.
गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. कंपनीचा कारभार सांभाळणे कठीण झाले. आपल्यामागे कंपनीने आपल्या मूलभूत तत्त्वांपासून फारकत घेऊ नये, यासाठी ते आग्रही होते. त्यांनी त्यांचे जुने सहकारी संदीप गोयल यांच्या खांद्यावर ‘रीडिफ्यूजन’ची धुरा सोपवली. नंदा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने जाहिरात विश्वातील एका भारतीयाच्या यशाचा झळाळता आध्याय संपला असला, तरी ‘रीडिफ्यूजन’ आणि अनेक संस्मरणीय जाहिरातींच्या रूपाने त्यांची महती कायम राहील.