ब्रिटनमध्ये हयात घालवल्यानंतरही मायदेशाशी म्हणजे भारताशी नाळ घट्ट जोडलेल्या मोजक्या प्रभावी व्यक्तींपैकी एक म्हणजे लॉर्ड मेघनाद देसाई. पांढरेशुभ्र कुरळे केस, गोल चणी, पांडित्यपूर्ण विवेचन करतानाही मोजक्यांबरोबरच घोळक्यातही मिसळून जाण्याची त्यांची हातोटी हे गुण मेघनाद देसाईंना लोभस ठरवायचे. ते अर्ध्याहून अधिक आयुष्य ब्रिटनमध्ये राहिले, तेथील नागरिकही झाले. पण भारत हे त्यांचे पहिले प्रेम होते. बडोद्यात जन्म, शालेय शिक्षण नि मुंबईत पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे या दोन शहरांविषयी आणि तेथील संस्कृतीविषयी पहिले प्रेम. पुढे त्यांच्या आस्थेचा आणि अभ्यासाचा पैस किती तरी व्यापक बनला. रूढार्थाने त्यांनी सखोल अध्ययन आणि अध्यापन अर्थशास्त्र या विषयात केले. पण संस्कृती, परराष्ट्र संबंध, राजकारण, समाजकारण अशा अनेक विषयांमध्ये मुशाफिरी केली आणि दबदबाही निर्माण केला. ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित संस्थेचे अनेक वर्षे प्राध्यापक आणि सुप्रतिष्ठ प्राध्यापक, मजूर पक्षाचे पदाधिकारी आणि हितचिंतक अशा अनेक भूमिकांमध्ये मेघनाद देसाई लीलया वावरले. मुंबई, पेनसिल्वेनिया, लंडन येथील शैक्षणिक आणि वैचारिक वर्तुळात त्यांची घडण झाली. मार्क्सवादाचा त्यांच्यावर प्रभाव होता, पण त्यातून त्यांची विचारसरणी बोजड आणि कर्कश बनली नाही. त्याऐवजी ब्रिटनमधील वैचारिक वर्तुळाचा उदारमतवाद त्यांच्यामध्ये मुरला. त्या भांडवलशाही संस्कृतीचे सौंदर्य मेघनादांसारख्यांच्या वेगळ्या आणि विरोधी विचारांनी उजळलेच.
इकोनोमेट्रिक्ससारख्या अर्थशास्त्राच्या गुंतागुंतीच्या शाखेमध्ये एकीकडे रस घेताना, पंडित नेहरूंच्या काळाचे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये उमटणारे प्रतिबिंबही त्यांना हवेहवेसे वाटले. यातूनच चिरंतन अभिनेता दिलीपकुमारचे चरित्र त्यांना रेखाटावेसे वाटले. पाककलेमध्ये त्यांनी दाखवलेले हुन्नर हा स्वतंत्र संशोधनाचा आणि कौतुकाचा विषय ठरला. भारतातील अनेक इंग्रजी नियतकालिकांमध्ये त्यांनी विपुल लिखाण आणि स्तंभलेखन केले. निरीश्वरवाद हा त्यांच्या समग्र विचारसरणीच्या केंद्रस्थानी होता. त्या भूमिकेतून त्यांनी भगवद्गीतेची चिकित्साही केली होती.
भांडवलशाही व्यवस्थेमध्ये गरिबी, बेरोजगारीचे निराकरण होते, कारण संपत्ती निर्मितीला उत्तेजन दिले जाते हा सर्वसाधारण समज त्यांना मान्य नव्हता. आज जागतिकीकरण यशस्वी होताना दिसत असले, तरी भविष्यात त्याच्या अतिरेकामुळेच समाजवादाचे पुनरुत्थान होईल, ही भविष्यवाणी त्यांनी नवीन सहस्राकाच्या सुरुवातीस म्हणजे २००२मध्ये ‘मार्क्सस रिव्हेंज – द रिसर्जन्स ऑफ कॅपिटलिझम अँड द डेथ ऑफ स्टॅटिस्ट सोशलिझम’ या पुस्तकात वर्तवली होती. त्यांच्या दूरदृष्टीची प्रचीती आजच्या युगात अनुभवायास येत आहे.
मेघनाद देसाई यांचा लेखनझपाटा जबरदस्त होता. जवळपास २० पुस्तके आणि २००हून अधिक टिपणे त्यांनी विविध शैक्षणिक नियतकालिकांसाठी लिहिली. जोडीला स्तंभलेखन होतेच. भारत सरकारने त्यांना २००८मध्ये पद्माभूषण बहुमानाने सन्मानित केले. या प्रकांड पंडिताचे नुकतेच वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.