धोरणे तयार होतात, तेव्हा त्यामागे अनेक तज्ज्ञांचा कित्येक वर्षांचा अभ्यास असतो, दूरदृष्टी असते, अनेकांचे आणि देशाचेही भवितव्य त्यावर बेतले जाते. अशाच अर्थविषयक धोरणांना आकार देणाऱ्यांपैकी एक असलेल्या अर्थतज्ज्ञ राधिका पांडेय यांचे नुकतेच निधन झाले. अर्थ आणि विधि या दोन्ही विषयांत गती असलेल्या मोजक्याच अर्थतज्ज्ञांपैकी त्या होत्या. मॅक्रोफायनान्ससारखा किचकट विषय सोपा करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या निधनामुळे अर्थक्षेत्राचे झालेले नुकसान मोठे ठरते ते त्यामुळे.
राधिका यांना शालेय जीवनापासूनच अर्थशास्त्राविषयी जिज्ञासा होती. पुढे त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून या विषयात पदवी संपादन केली. जोधपूरच्या ‘जय नरेन व्यास विद्यापीठा’तून एम. ए. आणि पी. एचडी. केले. अर्थशास्त्राच्या किचकट संकल्पना समजून घेण्यासाठी शिक्षणाचा भरभक्कम पाया रचल्यानंतर त्यांनी जोधपूरमधील ‘नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट’मधून कारकीर्दीची सुरुवात केली. तिथे अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रविषयक कायद्यांचे विविध पैलू उलगडून दाखविले. आकडेमोडीपलीकडच्या अर्थशास्त्राची ओळख करून दिली. संकल्पना सोप्या पद्धतीने स्पष्ट आकलन होईपर्यंत शिकविणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि संवाद हा हातखंडा.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी’मध्ये त्या २००८ साली सहप्राध्यापक म्हणून रुजू झाल्या आणि तिथेच अखेरपर्यंत कार्यरत राहिल्या. मॅक्रो इकॉनॉमिस्ट म्हणून अध्यापनकार्य करताना त्यांनी आपल्या २० वर्षांच्या कारकीर्दीत अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले. आपल्या विषयाचा सखोल अभ्यास आणि जगभरातील महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींवर बारकाईने व सतत लक्ष ठेवण्याची तत्परता यामुळेच त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणांत मोलाचे योगदान दिले. केंद्र सरकारच्या अनेक अर्थविषय कार्यदलांत, कार्यगटांत आणि समित्यांत त्यांनी काम केले. रिझर्व्ह बँकेने चलनवाढीवर केलेल्या उपाययोजनांत राधिका यांनी त्या संदर्भात केलेल्या अभ्यासाचा मोठा वाटा होता. न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली २०११मध्ये स्थापन करण्यात आलेल्या वित्तीय क्षेत्र वैधानिक सुधारणा आयोगात त्या कार्यरत होत्या. निवृत्त प्रशासकीय अधिकारी यू. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील परदेशी गुंतवणूक कृतिगटातही त्यांनी काम केले. अर्थ मंत्रालयाने २०१४मध्ये स्थापन केलेल्या सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन संस्थेच्या कृतिदलाच्या त्या मुख्य संयोजक होत्या.
मॅक्रोइकॉनॉमिक्स ही मोठे, म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक प्रश्न अभ्यासणारी शाखा. त्या शाखेच्या अभ्यासक म्हणून त्यांनी किमती का वाढतात आणि त्या कशा नियंत्रणात ठेवता येतील, उद्याोग कसे विस्तारत जातात आणि कालांतराने त्यांना उतरती कळा का लागते, अशा स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. आपला अभ्यास केवळ प्रबंधांत अडकून न पडता त्याचा खऱ्या-खुऱ्या माणसांना लाभ व्हावा, यासाठी त्या आग्रही होत्या. आपल्याकडील अर्थविषयक ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र आणि अन्य प्रसारमाध्यमांत नियमितपणे सदरे आणि अन्य लेख लिहिले. त्याद्वारे त्यांनी सामान्य वाचकांच्या अर्थविषयक जाणिवांना दिशा दिली. समाजमाध्यमांवरही त्या अर्थप्रबोधनासाठी प्रयत्नरत असत. अभ्यासू अर्थतज्ज्ञ असलेल्या राधिका पांडेय यांचे वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी निधन झाले. धोरणनिर्मितीतील त्यांचे योगदान अर्थविश्वाला यापुढेही दिशा देत राहील.