– नारायण वाडदेकर, मराठी विज्ञान परिषद
इंग्लंडच्या ग्लाऊसेस्टरशायर परगण्यातल्या बर्कली, शहरात १७ मे १७४९ला एडवर्ड जेन्नरचा जन्म झाला. लशीची संकल्पना मांडणे, गोस्तन लशीने मनुष्यातील देवीरोगाची तीव्रता घटवता येईल हा विचार मांडणे, प्रत्यक्षात देवीची लस निर्मिणे, एवढी अफाट कामगिरी एडवर्ड जेन्नरनी करून दाखवली. त्यामुळे ‘रोगप्रतिकारक्षमता शास्त्राचा जनक’ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. देवीरोग पूर्वी अतिप्राणघातक मानत, कारण देवीरोगाची साथ आली की सरासरी प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्य दगावत. जगलेले लोक, देवीचे व्रण जन्मभर अंगावर वागवत. अनेकांना डोळ्यांत किंवा कानात फोड आल्यास आंधळेपण किंवा बहिरेपण येण्याचा धोका असे. बालवयात एडवर्डला सौम्य देवीरोग झालेल्या रुग्णाच्या फोडाच्या खपलीची भुकटी हुंगायला दिली होती. असे केल्याने प्राणघातक स्वरूपाचा देवीरोग होत नाही असा लोकांचा अनुभव होता.
लंडनमध्ये एडवर्डने वैद्याक-शस्त्रक्रिया शिकून २१व्या वर्षी प्रथम वैद्याकीय पदवी मिळवली. मूळ गावी जाऊन २० वर्षे रुग्णसेवा करून पदव्युत्तर पदवी, एम.डी. मिळवली. डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचे कार्य ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते. त्यांच्याकडे पशुधन भरपूर होते. १७८८ साली इंग्लंडमध्ये देवीची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यावेळी डॉक्टर जेन्नर यांच्या गावातील बरेच लोक आश्चर्यकारकरीत्या बचावले होते. जेन्नर यांच्या लक्षात आले की जे बचावले होते त्यांना देवीसदृश रोग आधी होऊन गेला होता आणि त्यांना या साथीत देवीची कुठलीच लक्षणे दिसत नव्हती. गावातील लोकांना देवीचा रोग झाला नाही, हेसुद्धा त्यांच्या निरीक्षणातून सुटले नव्हते.
१७९६ साली जेन्नर यांनी जेम्स फिफ्स नावाच्या एका आठ वर्षांच्या मुलावर आपले प्रयोग सुरू केले. जेम्सच्या हाताला दोन बारीक जखमा केल्या आणि त्यात गाईच्या पुरळातील स्राव टोचला. त्यानंतर मुलाला थोडा ताप आला आणि तो बरा झाला. एका आठवड्यानंतर त्याच्या दुसऱ्या जखमेत त्यांनी माणसाच्या देवी पुरळातील स्राव टोचला तरी त्याला देवीचा प्रादुर्भाव झाला नाही. गाईच्या या देवीसदृश रोगाला लॅटिन भाषेत ‘व्हॅक्सिनिया’ असे म्हणत. म्हणून त्यांच्या या उपचार पद्धतीचे नाव त्यांनी ‘व्हॅक्सिनेशन’ असे ठेवले. १७९८ मध्ये सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये त्यांनी या पद्धतीचे जाहीर प्रात्यक्षिक करून दाखवले. शेवटी १९८०मध्ये संपूर्ण जग देवीरोगमुक्त झाले. संसर्गजन्य रोगाशी लस वापरून लढता येते हे डॉक्टर जेन्नरनी सिद्ध केले. २६ जानेवारी १८२३ या दिवशी अर्धांगवायूचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org