भारतात गणिताच्या उच्च अध्ययन आणि संशोधनासाठी भारतीयांनी स्थापन केलेले पहिले केंद्र पंजाब विद्यापीठात आहे. हे केंद्र रामप्रकाश बंबा यांनी एच. आर. गुप्ता यांच्या साथीने सुरू केले, तेव्हा चंडीगढ शहरसुद्धा साकारले नव्हते. यथावकाश हे विद्यापीठ होशियारपूर येथून चंडीगढला गेले आणि बंबा यांनीही जागतिक कारकीर्दीचा मोह सोडून, याच शहरात- याच विद्यापीठात स्वत:ला गाडून घेतले. वास्तविक, अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीत दोन वर्षे अभ्यागत प्राध्यापक, त्याआधी केंब्रिजमधून गणितात पीएच.डी. अशी कारकीर्द असलेल्या प्रा. बंबा यांना देश सोडणे कठीण नव्हते; पण त्यांनी ते केले नाही. पंजाब विद्यापीठानेही त्यांना तहहयात, सुप्रतिष्ठ प्राध्यापकपद दिले. याचा देशाला झालेला लाभ म्हणजे, ते ९१ वर्षांचे होईपर्यंत, २०१६ पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणितज्ञ पीएच.डी. करत होते. ‘नंबर थिअरी’मध्ये योगदान देणाऱ्या या ज्येष्ठ गणितज्ञाचे निधन मात्र ‘१००’ हा वयाचा आकडा गाठण्यासाठी काही महिने उरले असताना झाले. ‘पद्माभूषण’ आणि ‘रामानुजन पारितोषिक’ मिळवलेला गणितज्ञ त्यांच्या निधनाने हरपला.
शुद्ध गणित अथवा प्युअर मॅथेमॅटिक्समधली ‘नंबर थिअरी’ ही मूळ संख्यांच्या घटन/विघटनाचा आणि संख्याभूमितीचा अभ्यास करणारी शाखा. या शाखेच्या विशेष अभ्यासासाठी ‘नंबर थिअरी’ याच नावाची आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकाही त्यांनी सुरू केली होती. गॉसियन गणित, डायोफॅन्टिन समीकरणे, संख्यांचे स्वरूप आणि त्यांच्या भौमितिक शक्यता यांचा अभ्यास इतरांनीही करावा, यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे अध्यक्षपद १९६९ मध्ये त्यांच्याकडे होते, पण त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. अशा पदांवरून त्यांनी ‘शुद्ध’ अथवा बिगर-उपयोजित संशोधनालाही महत्त्व हवे, यासाठी प्रयत्न केले. विद्यापीठ अनुदान आयोगात गणित आणि विज्ञान शाखांच्या समितीवर काम करतानाही हा आग्रह त्यांनी रास्तपणे धरला होता.
‘वडील रेल्वेत गार्ड होते. आम्ही भावंडे सात. शिष्यवृत्ती मिळाली नसती, तर मला कॉलेजात जाताच आले नसते’ अशा परिस्थितीतून ते वर आले. अविभाजित पंजाबातील क्वेट्टा, सियालकोट आदी ठिकाणी त्यांचे बालपण गेले. ‘हा हुशार आहे, थेट चौथीच्या परीक्षेला बसवा’ असा सल्ला मास्तरांनी दिला, तो वडिलांनी ऐकला आणि चौथीतही रामप्रकाश यांना उत्तम गुण मिळाले, पण ‘उर्दू शुद्धलेखनात कमी गुण मिळाल्याने शालेय शिष्यवृत्ती हुकली’. पुढे मॅट्रिकला उर्दूऐवजी हिंदी – इंग्रजी आले, तेव्हाही ‘जरा अक्षर नीट काढलेस, तर पहिला येशील’ म्हणून शिक्षकांनी चोप दिल्याची आठव ते सांगत. ते पहिल्या दहांत आले, म्हणून लाहोरच्या कॉलेजात १८ रुपयांच्या शिष्यवृत्तीसह शिकता आले. तेथील गणितज्ञ प्रा. सर्वदमन चौला यांचे ते पट्टशिष्य ठरले. या प्राध्यापकांनीच केंब्रिजला जाण्याचा सल्ला दिला आणि केंब्रिजमध्येच त्यांना लुई मॉर्डेन, रॉबर्ट डॅव्हेनपोर्ट असे गणितातले गुरू भेटले. गणितात एम.ए. केल्यानंतर ‘आयसीएस’ परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा त्यांचा बेत होता. तसे झाले असते तर, भारत एका गणितज्ञाला मुकला असता.