‘एन्सायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स’ (१९७९) प्रकाशित होण्यापूर्वी जगाच्या ज्ञानविश्वात आणखी एक गोष्ट १९७४ ते २०१५ अशा सुमारे चार दशकांच्या काळात घडत होती. ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका’ (१७६८-१७७१)ने आपल्या प्रकाशनाच्या प्रारंभापासून ते १९७४ पर्यंत आपल्या ज्ञानकोशाच्या अनेक आवृत्ती प्रकाशित करण्याचे सातत्य राखल्याने ज्ञानसमाजात एन्सायक्लोपीडिया म्हणजे ब्रिटानिका हे गृहीत जगभर रुजले होते. या ज्ञानकोशाने १९७४ साली मुद्रित कोशाचे प्रकाशन थांबविण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वर्षी ‘प्रोपीडिया’, ‘मायक्रोपीडिया (१० खंड), आणि ‘मॅक्रोपीडिया’ (१७ खंड) प्रकाशित केले. नंतर २००३ ते २०१५ या कालखंडात वरील खंड संशोधित रूपात ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका अल्टिमेट रेफरन्स स्यूट’ (एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका संदर्भ संच) डीव्हीडी (डिजिटल व्हर्स्टाइल डिस्क) च्या रूपात प्रकाशित केला आहे. याबद्दल १९७४ च्या दरम्यान तर्कतीर्थांना याची माहिती त्यांच्या जीवनकाळापर्यंतच्या घडामोडींसह होती. परंतु, त्यांनी त्याबद्दल लेखन केले नाही. असे असले तरी या घटनांनी जगाच्या ज्ञानविश्वात अंकीय साक्षरता (डिजिटल लिटरसी) घडवून आणली. तिचे आज आपण ‘डिजिटल रिव्होल्यूशन’ म्हणून नित्य वर्णन करीत असतो.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९६२ मध्ये ‘मराठी विश्वकोशा’चा संकल्प सोडला आणि १९९४ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंतच्या काळात त्याचे १७ खंड प्रकाशित झाले होते. आज तर्कतीर्थांच्या मूळ योजनेनुसार २० खंड प्रकाशित झाले असून, हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. मराठी विश्वकोशाचा जो रचनाकल्प (ब्लू प्रिंट) आकाराला आला होता, त्यातील नोंदीच्या लेखनशैलीत रेखांकित बाण, पोकळ बाण, कंसातील बाण दर्शवत जी बाणांकित लेखनशैली अंगीकारली होती, ती किती दूरदर्शी होती, याचे उदाहरण सांगायचे तर २०१५ ला ‘मराठी विश्वकोश’ तबकडी (कॉम्पॅक्ट डिस्क), धारिका (पेनड्राइव्ह), ई-बुकच्या रूपात त्याचे डिजिटल रूपांतर करण्यात आले, तेव्हा त्या बाणांकित संदर्भांचे रूपांतर मानकतेनुसार (बाय डिफॉल्ट) दुव्यांमध्ये (लिंक्स) झाले. ही होती, कोशकार म्हणून तर्कतीर्थांनी अंगीकारलेली परिणत प्रज्ञा!

‘एन्सायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स’प्रमाणे ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका’चा ‘प्रोपीडिया’ मी वाचला आहे. याचे उपशीर्षक आहे, ‘ज्ञानाची रूपरेषा’ (आऊटलाइन ऑफ नॉलेज). ती यातील दहाव्या प्रकरणातील विविध ज्ञान-विज्ञान शाखांची सूची वाचत असताना सार्थ असल्याचे लक्षात येते. याचे संपादक, संचालक असलेले मॉर्टिमर जे. एडलर यांनी या ‘प्रोपीडिया’त ‘नॉलेज बिकम्स सेल्फ कॉन्शस’ या शीर्षकाचा एक सुंदर लेख लिहिला आहे. ज्ञान आपल्यात जाणिवा कशा विकसित करते, यावर तो प्रकाशझोत टाकतो. ‘‘विश्व आणि विश्वकोश अथवा ज्ञानकोश हे एकमेकांचे पर्यायी शब्द होत. ग्रीक, लॅटिन भाषेत एन्सायक्लोपीडिया म्हणजे संपृक्त ज्ञान. यापुढे विश्व थिटे सिद्ध होते. ज्ञानकोश उपलब्ध ज्ञान तार्किक व वैज्ञानिक शिस्तीत आपल्यापुढे सादर करीत असल्याने कठीणातील कठीण गोष्ट आपणास सुबोधपणे समजते म्हणून विश्वकोश वाचायचा. विश्वकोशाबाहेर ज्ञान नसतेच मुळी, जे आहे, असते ते फक्त विश्वकोशात! ज्ञानव्यवहाराचे सारे खटाटोप फक्त ज्ञानकोशातूनच घडून येतात. संपूर्णता, समग्रता, सर्वंकषता म्हणजे ज्ञानकोश. जे अमूर्त ज्ञान विश्वात भरलेले असते, त्याला मूर्त रूप देण्याचे कार्य विश्वकोश करतो.’’

ज्ञान हे कार्य मानले, तर मानव त्याचा कर्ता ठरतो. अॅरिस्टॉटल एकदा म्हणाला होता, ‘‘बौद्धिक क्रियेची सर्वोपरी कृती कोणती असं मला विचारलं तर मी सांगेन, विचाराबद्दल विचार करणे. (थिंकिंग अबाऊट थिकिंग इटसेल्फ).’’ ज्ञानसाधना म्हणून तर आत्मजागृतीचा उपक्रम होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मराठीचे असे ज्ञानकोशकार होते की, ज्यांनी ज्ञान-विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये स्वत: कोश निर्माण केले, अनेकांना त्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा, प्रोत्साहन व साहाय्य केले. तर्कतीर्थांमुळे अनेकविध कोशांचे ५५ खंड मराठीत साकारले. मराठी भाषा, साहित्य, संगीत, शिल्प, आयुर्वेद, भारतीय भाषा, धर्म, मीमांसा, अशा क्षेत्रात आज अस्तित्वात असलेले हे कोश म्हणजे तर्कतीर्थ प्रज्ञा व प्रतिभेचे दीपस्तंभ होत, ज्यांच्या प्रकाशात मराठी भाषा आधुनिक काळात अभिजात बनणे शक्य झाले आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com