scorecardresearch

Premium

व्यक्तिवेध : मनोज मिश्रा

मूळचे यमुनाकाठच्या मथुरेचे असलेल्या मिश्रांनी यमुना हेच कार्यक्षेत्र मानून सुरू केलेले ‘यमुना जिये अभियान’ सुरू ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

river activist Manoj Mishra Passed Away
मनोज मिश्रा

‘यमुनेच्या पाण्यावर दिल्लीत दर पावसाळय़ानंतर साबणाच्या पाण्यासारखा फेस दिसू लागतो. त्याच्या छायाचित्रांसह बातम्या होतात.. त्याही अशा पद्धतीने की, जणू काही पहिल्यांदाच असे आक्रीत घडले आहे! वास्तविक हा फेस ‘सर्फअ‍ॅक्टन्ट्स’मुळे येतो आणि फॉस्फेट्समुळे साक्यासारखा (दाट होऊन) टिकून राहातो, हे अगदी उघड आहे. पाण्याच्या प्रत्येक लिटरमागे ०.२७ ते १.२८ मिलिग्रॅम सर्फअ‍ॅक्टन्ट द्रव्ये आणि ६.५ ते १३.४२ मिलिग्रॅम फॉस्फेट आहेत म्हणूनच ही समस्या आहे, हे ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डस’च्या मोजणीतून उघड झालेले आहे आणि ‘सर्फअ‍ॅक्टन्ट्स’ ही डिर्टजटवजा फेसकारी द्रव्ये दिल्लीच्या सीमावर्ती भागातील कपडे रंगवण्याचा उद्योग सर्रास वापरतो आणि ती द्रव्ये यमुनेच्या पाण्यात सोडली जातात, हेसुद्धा सर्वाना माहीत आहे..’

– इतकी साधार, खणखणीत मांडणी करून झाल्यावर ‘हे प्रदूषक उद्योग हटवा’ अशी मागणी मनोज मिश्रा यांनी कधीच केली नाही, हे त्यांचे वेगळेपण! मिश्रा तर ‘यमुना बचाओ’वाले पर्यावरणवादी कार्यकर्तेच.. पण त्यांनी मागणी केली ती फॉस्फेट कमी करण्यासाठी ‘झिओलाइट’ किंवा ‘ट्राय-सोडियम सायट्रेट’च्या वापराची, तसेच उद्योगांमध्ये प्रदूषक द्रव्यांऐवजी पर्यावरणनिष्ठ रिठय़ाचा वापर करण्याची! पण याच मनोज मिश्रांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे शक्तिप्रदर्शन ठरणारा यमुनेकाठचा महाउत्सव आटोक्यात ठेवणे भाग पाडले होते. श्री श्री रविशंकर यांना सर्वोच्च न्यायालयाने पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला, तो मिश्रांच्याच पाठपुराव्यामुळे. कार्यकर्ता स्वप्नाळू नसतो, तो अभ्यासूपणे व्यापक हिताचा विचार करणारा असतो आणि प्रसंगी दणका देताना कायद्याच्या चौकटीतच राहणारा असतो, याचा जणू मूर्तिमंत वस्तुपाठ ठरलेले हे मनोज मिश्रा ४ जूनच्या रविवारी निवर्तले. यंदाच्या पर्यावरणदिनी अनेक पर्यावरणवादी संस्था-संघटनांचे कार्यक्रम झाले ते मिश्रांना आदरांजली वाहूनच. मिश्रा अनेकांना आपले वाटले, कारण कामाची साधीच दिशा किती महत्त्वाची असू शकते, हे मिश्रांनी दाखवून दिले. माहिती अधिकाराचा वापर करणे, त्याहीआधी विविध स्रोतांतून स्वत: माहिती जमवणे, हे करत असताना प्रश्न नेमका काय आहे हे स्वत: फिरून आणि लोकांशी बोलून लक्षात घेणे, कोणत्या अधिकाऱ्यांना प्रश्नाची जाणीव द्यावी लागेल, कार्यवाहीवर कसे लक्ष ठेवावे लागेल, तेही न झाल्यास कुणाकडे दाद मागावी लागेल, याची रूपरेषा तयार असणे.. ही मिश्रांच्या कार्यपद्धतीची वैशिष्टय़े. हा चोखपणा १९७९ ते २००१ पर्यंत ‘भारतीय वन सेवे’चे अधिकारी म्हणून काम केल्यामुळे आला असेल, पण वन-अधिकारी म्हणून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या वनावलंबी राज्यांत काम करणे कठीण असल्याची जाणीव झाल्यामुळेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नियम पाळले जाण्यासाठी यंत्रणेबाहेरूनही रेटा हवा, हे पटल्यामुळेच त्यांचे काम सुरू झाले. मूळचे यमुनाकाठच्या मथुरेचे असलेल्या मिश्रांनी यमुना हेच कार्यक्षेत्र मानून सुरू केलेले ‘यमुना जिये अभियान’ सुरू ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 04:56 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×