‘माया-ममता कार्य का आधार है’ हे सूत्र राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांनी दिले आणि याच सूत्रानुसार त्यांनी आयुष्यभर कार्य केले. समितीच्या स्थापनेपासून गेली सहा दशके नागपुरात कार्यरत असलेल्या प्रमिलाताईंचे वयाच्या शहाण्णवव्या वर्षी निधन झाले.

महाराष्ट्रातील नंदुरबार येथे ८ जून १९२९ ला जन्मलेल्या प्रमिलाताईंचे आयुष्य संघर्षाने भरलेले आहे. राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीताई केळकर ऊर्फ मावशी यांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी स्वत:ला समितीच्या कार्यासाठी वाहून घेतले. ‘वंदे मातरम’ अभियानाअंतर्गत प्रमिलाताई मेढे यांनी भारतभर प्रवास केला आणि सेविकांच्या मनात ‘वंदे मातरम’ शब्दश: रुजवले. ज्या काळात महिलांना घराबाहेर जाऊन काम करणे कठीण होते, त्या काळात त्यांनी देशपातळीवर राष्ट्रसेविका समितीच्या कार्याचा विस्तार केला. समितीच्या स्थापनेपासून त्यांनी कार्य केले. नागपूर शहरात राष्ट्रसेविका समितीचे मुख्य कार्यालय ‘अहिल्या मंदिर’ आहे आणि प्रमिलाताई तेथेच राहात होत्या. पदवी आणि शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नागपूर येथील सी.पी. अॅण्ड बेरार उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांनी दोन वर्षे अध्यापन केले. त्यानंतर वरिष्ठ लेखापरीक्षक या पदावर, सरकारी कर्मचारी म्हणूनही काम केले; पण समितीच्या कामासाठी निवृत्तीच्या १२ वर्षे आधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. शाखा पातळीच्या जबाबदारीपासून त्यांची राष्ट्रसेविका समितीच्या कार्याला सुरुवात झाली. सुरुवातीला शहर, विभाग आणि राज्य पातळीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. १९५० ते १९६४ या कालावधीत त्या विदर्भ प्रांताच्या काळजीवाहू होत्या. १९६५ ते १९७५ पर्यंत त्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रमुख होत्या. १९७५ ते १९७८ पर्यंत त्या आंध्र प्रदेशच्या पालक अधिकारी होत्या. १९७८ ते २००३ पर्यंत त्यांनी तब्बल अडीच दशके समितीच्या अखिल भारतीय मुख्य काळजीवाहू म्हणून काम केले. ईशान्येकडील राज्यांमध्ये कठीण परिस्थितीतही त्यांनी त्यांच्या कार्याची छाप सोडली. या राज्यांत एकट्या जाऊन दोन-दोन महिने सतत प्रवास करत असत. कित्येकदा तिथे मूलभूत सुविधादेखील नव्हत्या. समितीच्या कामासाठी संपूर्ण देश त्यांनी पालथा घातला, पण त्याच वेळी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, डर्बन या देशांमध्ये देखील समितीच्या कार्यासाठी प्रवास केला. अमेरिकेतील न्यू जर्सी शहराच्या महापौरांनी त्यांना ‘मानद नागरिकत्त्व’ देखील दिले.

फेब्रुवारी २००३ पासून त्यांना समितीच्या सह-मुख्य संचालकाची जबाबदारी देण्यात आली. या जबाबदारीदरम्यान त्यांनी राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक दिवंगत लक्ष्मीताई केळकर ऊर्फ मावशी यांच्या जन्मशताब्दी वर्षात दोन ऑगस्ट २००३ ते दोन मे २००४ पर्यंत २६६ दिवस भारतभर प्रवास केला. खासगी वाहनांमधून त्यांनी मावशीजींच्या आयुष्यावरील प्रदर्शन भारतभर नेले. तरीही सुमारे २८ हजार किलोमीटर त्यांनी प्रवास केला आणि देशभर संघटन आणि महिला शक्ती जागृतीचा मंत्र दिला. एसएनडीटी महिला विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही पदवी दिली होती. गेल्या तीन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. ३१ जुलैला सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार ‘एम्स’मध्ये देहदान करण्यात आले.