‘हिंदुस्तान युनिलिव्हर’चे माजी अध्यक्ष सुसिम मोहन दत्ता यांचे मुंबईत ५ जुलै रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. दत्ता यांची हिंदुस्तान लिव्हरमधील कारकीर्द १९५०च्या दशकात सुरू झाली आणि १९९६ मध्ये संपली. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी कंपनीत वेगवेगळ्या पदांवर जबाबदाऱ्या भूषविल्या. १९९० ते १९९६ दरम्यान ते कंपनीच्या अध्यक्षपदी होते. त्यांनी ‘फिलिप्स’, ‘कॅस्ट्रोल’ यासारख्या २१ कंपन्यांच्या संचालक मंडळात संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम केल्याची नोंद आहे. कॅस्ट्रोलचे ते २३ वर्षे अध्यक्ष होते. एचयूएलमध्ये असताना, ते अनेक संस्थांचे गैरकार्यकारी अध्यक्ष होते, ज्यामध्ये आयएल अॅण्ड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स, टाटा ट्रस्टी कंपनी यांचा समावेश आहे. त्यांच्या कारकीर्दीचे अनेक उल्लेखनीय टप्पे आहेत.

दत्ता यांनी उत्पादने आणि पुरवठा साखळीत परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या कार्यकाळात हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती वाढली. त्यांच्याच कारकीर्दीत पॉण्डस इंडिया आणि ब्रूक बाँड लिप्टन या दोन मोठ्या कंपन्यांचे युनिलिव्हरमध्ये विलीनीकरण झाले. या विलीनीकरणामुळे भारतीय ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत हिंदुस्थान युनिलिव्हर एक सशक्त कंपनी म्हणून उदयास आली. भारतीय भांडवली बाजारातील या दोन सूचिबद्ध कंपन्यांच्या विलीनीकरण करार त्यांच्या देखरेखीखाली पार पडला.

दत्ता हिंदुस्तान युनिलिव्हरचे अध्यक्ष असताना भारतातील आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली. ‘परवाना राज’मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांवर अनेक बंधने होती. या उदारीकरणाचा हिंदुस्तान युनिलिव्हरवर लक्षणीय परिणाम झाला, १९९१ च्या आर्थिक सुधारणांमध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील बंधने शिथिल करण्यात आली आणि अर्थव्यवस्था परकीय गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली. याचा फायदा घेत हिंदुस्तान युनिलिव्हरने व्यवसाय विस्तारण्यासाठी विविध उत्पादनांचा नव्याने समावेश केला आणि अनेक व्यवसायांची फेररचना केली. याची सुरुवात ऑइल मिल्स (टॉमको) खरेदी करून केली. या खरेदीमुळे मोती आणि हमाम या आंघोळीच्या साबणांच्या नाममुद्रा हिंदुस्तान युनिलिव्हरच्या मालकीच्या झाल्या आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या आधीपासून असलेल्या लक्स, रिन, पीअर्स या नाममुद्रांच्या मांदियाळीत दाखल झाल्या. व्यवसाय फेररचनेचा एक भाग असलेल्या तत्कालीन हिंदुस्थान लिव्हर आणि टाटा समूह यांनी लॅक्मे लिव्हर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापन केली. दत्ता यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत १९९६ मध्ये स्थापन झालेल्या या संयुक्त उपक्रमातील टाटांचा सर्व हिस्सा पुढे १९९८ मध्ये लिव्हरने खरेदी केला. सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक निगा उत्पादने व्यवसायातील काही उत्पादने ‘आयुष’ या नाममुद्रेखाली आज विकली जातात. सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक निगा उत्पादने व्यवसायाचा लिव्हरच्या एकूण व्यवसायात आज मोठा वाटा आहे. याची बिजे दत्ता यांच्या कारकीर्दीत पेरली गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस. एम. दत्ता (ते लिव्हरमध्ये ‘एसएमडी’ म्हणून ओळखले जात) यांचा स्वभाव अत्यंत नम्र होता. ते त्यांनी आयुष्यात केलेली निवड, त्यांच्या झालेल्या चुका आणि ते जे करत होते ते त्यांना का आवडते याबद्दल नेहमीच खुलेपणे बोलत. दत्ता यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत व्यवसाय धोरणे, अनुपालन, भारतीय कंपन्यांचा जागतिक विस्तार यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कंपनीच्या संचालक मंडळाची रचना आणि भूमिका, अल्पसंख्य भागधारकांच्या अधिकारांचे संरक्षण, जोखीम व्यवस्थापन आणि अंतर्गत नियंत्रण प्रणाली, कंपनीच्या कामकाजाची माहिती उघड करणे, हितसंबंधांचा संघर्ष टाळणे याबाबत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली मते भारतीय उद्याोग क्षेत्राला कायम मार्गदर्शन करतील.