आपल्या अपत्याला आवर्जून किंवा नैसर्गिक कल पाहून इतर खेळांकडे वळण्यास प्रोत्साहन देणारे क्रीडापटू आपल्या देशात अपवादच- मिल्खा सिंग (अॅथलेटिक्स) आणि जीव मिल्खा सिंग (गोल्फ), नंदू नाटेकर (बॅडमिंटन) आणि गौरव नाटेकर (टेनिस), आणि अर्थात डॉ. वेस पेस (हॉकी) आणि लिअँडर पेस हे यापैकी काही. आधुनिक केबल टीव्हीच्या युगात वेस पेस यांची व्यापक ओळख लिअँडर पेस या निष्णात टेनिसपटूचे वडील, अशीच असल्याचा त्यांना अर्थातच अभिमान वाटत असेल; पण क्वचित प्रसंगी विषादही. कारण ‘लिअँडर पेसचे वडील’ म्हणून परिचित होण्यापूर्वी ते खूप काही होते. पण हे ‘खूप काही’ क्रीडाकर्मी आणि क्रीडा माध्यमांपुरतेच मर्यादित राहिले.

१९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाचे सदस्य आणि उत्तम हॉकीपटू ही त्यांची दुसरी परिचित ओळख. पुढे लिअँडरनेही त्यांच्याप्रमाणे ऑलिम्पिक पदक जिंकले. तेही कांस्य असले, तरी टेनिससारख्या खेळात वैयक्तिक पातळीवर जिंकलेल्या ‘त्या’ पदकाची झळाळी, हॉकीसारख्या सांघिक खेळामध्ये जिंकलेल्या ‘या’ कांस्यपदकापेक्षा अधिक होती हे खुद्द वेस पेसही मोकळ्या मनाने मान्य करायचे. भारतीय क्रीडा पटलावर ऑलिम्पिक पद जिंकलेली ही पहिली आणि अद्याप तरी एकमेव पितापुत्र जोडी. परंतु डॉक्टर वेस पेस यांची हॉकीखेरीज अन्य क्षेत्रांतली मुशाफिरीही थक्क करणारी आहे.

त्यांचा जन्म गोव्यातला, तरी कर्मभूमी कोलकाता. हॉकीपटू होत असतानाच त्यांनी वैद्याकशास्त्रातही पदवी मिळवली. ते उत्तम हॉकीपटू होतेच, पण क्रीडावैद्याक शाखेचा उदय होण्याआधीच्या त्या काळात असंख्य क्रीडापटूंचे वैद्याक सल्लागार आणि अघोषित डॉक्टरही होते. टेनिस, फुटबॉल आणि रग्बीतही त्यांनी नैपुण्य दाखवले. मोहन बागानकडून काही वर्षे ते क्लब फुटबॉल खेळले. हॉकीमध्ये ते सेंटर हाफ म्हणून खेळायचे. उंच, तंदुरुस्त शरीरयष्टी आणि भेदक नजर याच्या जोरावर ते समोरच्या संघातील आघाडीच्या हॉकीपटूंवर नजर आणि नियंत्रण ठेवत. त्यांच्या रोखण्याच्या तंत्राची दखल भल्याभल्यांनी घेतली. १९७१मधील विश्वचषक कांस्यपदक व १९७२मधील ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघातून ते खेळले. तेव्हाच अजितपाल सिंग या अत्यंत निष्णात हॉकीपटूच्या उदयानंतर, सेंटर हाफ जागेवर पहिली पसंती नेहमीच अजितपालना मिळे. पण त्याचे वैषम्य पेस यांनी जराही बाळगले नाही.

कदाचित हॉकीपेक्षा अधिक मोलाचे योगदान त्यांनी भारतातील क्रीडावैद्याक क्षेत्राला दिले. भारतीय क्रिकेटमध्ये वयचोरी ही अत्यंत व्यापक, चिकट समस्या. ही चोरी हुडकण्यासाठी शास्त्रीय कसोट्या पेस यांनी विकसित केल्या. डोपिंग ही भारतीय क्रीडा क्षेत्राला सतावणारी आणखी एक समस्या. वेस पेस यांनी याही क्षेत्रात समस्या निराकरणासाठी भरीव योगदान दिले. दुखापत व्यवस्थापन या क्रीडा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या शाखेची मुहूर्तमेढ भारतात त्यांनी रोवली. लिअँडर पेस टेनिसमधील प्रगतीमुळे सधन आणि सुस्थापित झाला तेव्हा त्याच्याकडील निधी अनेकदा दुर्लक्षित भारतीय खेळांकडे आणि खेळाडूंकडे वळवण्याची दानत वेस पेस यांनी दाखवली. पितापुत्रांमध्ये या बाबतीत अत्यंत आदर्श संवाद आणि समन्वय होता. तंदुरुस्तीच्या क्षेत्रात अनेक मानदंड निर्माण करणारा हा खेळाडू, डॉक्टर अखेर कंपवातापुढे असहाय ठरला आणि वयाच्या ८०व्या वर्षी वेस पेस यांची प्राणज्योत मालवली.