इटलीतल्या साध्या खेड्यात वाढलेला, वडिलांच्या इच्छेनुसार वैद्यकीय शिक्षण घेणारा, शैक्षणिक यश सुमारच असल्याने काही काळ लष्करात वैद्यकीय सहायक म्हणून काम करणारा आणि पंचविशीनंतर मात्र फॅशन-पंढरी मिलानमध्ये जाऊन तिथल्या फॅशन-दुकानात दर्शनी भागाच्या मांडणीचे काम करता-करता फॅशन डिझायनिंगच्या खाचाखोचा समजून घेणारा एक तरुण पुढे ‘फॅशन कोऑर्डिनेटर’ म्हणून बऱ्यापैकी पैसा मिळवू लागतो; चीजवस्तू विकून निव्वळ नफा म्हणून उरलेल्या दहा हजार डॉलरच्या भांडवलानिशी चाळिशीत शिरल्यावर अमेरिकेत स्वत:चे फॅशन लेबल सुरू करतो, तत्कालीन फॅशनचे संकेत अजिबात न जुमानताही चांगली प्रावरणे बनवता येतात, हे जगाला दाखवून देताना ‘मी म्हणेन ती फॅशन’ असा सार्थ रुबाब कमावतो आणि ५० वर्षांत बारा अब्ज अमेरिकी डॉलरच्या फॅशन, सौंदर्यप्रसाधने, हॉटेले आणि आलिशान यॉट-नौका आदी व्यवसायांच्या समूहाचा मालक ठरतो… ही जॉर्जिओ अर्मानी यांची उत्कर्षकथा. या अर्मानींचे अलीकडेच (४ सप्टेंबर रोजी) निधन झाले, त्यानंतर ही कथा पुन्हा अनेकांनी सांगितलीच, त्यात सनावळ्यांचे तपशीलही भरले. कुणी त्यांच्या आयुष्यभरातल्या एका वादाचीही चर्चा केली. पण ‘अर्मानी’ या नावाभोवतीच्या वलयाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न फारच थोड्यांनी केला.

विलासी जीवनशैली- लक्झरी- ही अखेर एक अंतहीन मानवी भावना असते, त्या भावनेच्या लाटांवर स्वार होऊन अर्मानी यांनी जगभरातल्या साऱ्या खंडांत आपला व्यवसाय नेला. त्यांच्याआधी गाजलेले- स्वत:च्या नावाचे फॅशन लेबलच नव्हे तर ‘ब्रॅण्ड’ही ठरलेले फॅशन डिझायनर नव्हतेच असे नव्हे. त्यापैकी ‘गुची’ हा ब्रॅण्ड तर १९२१ पासूनचा. अशा इतिहासानेच तर इटलीला- त्यातही मिलान शहराला- फॅशनच्या राजधानीचा मान मिळतो. त्याचे अमेरिकनांना (विशेषत: युरोपीय-अमेरिकन) असणारे आकर्षण आजही अबाधित आहे. स्वत:चा आब जपत, समलिंगीपणाचा फारसा बडिवार न माजवता सर्जिओ गॅलिओटी या सहचराच्या साथीने अमेरिकेत अर्मानींनी व्यवसायाचा जम बसवला. ‘अमेरिकन जिगोलो’ या चित्रपटातल्या रिचर्ड गेअरसाठी त्यांनी डिझाइन केलेले जॅकेट लक्षणीय ठरले आणि पाच वर्षांत ‘ऑस्कर पुरस्कार- संध्ये’सारख्या सोहळ्यांमध्ये अर्मानींनी डिझाइन केलेली वस्त्रे लेवून मिरवणे ही प्रतिष्ठेची बाब ठरू लागली. आपण हे का करत आहोत याबद्दल फार खल न करता एखाददोन शब्दांत लोकांना कल्पना द्यायची, मग त्या कल्पनेची ‘क्रेझ’ निर्माण करायची आणि त्या भावनेची नवी लाट उसळू देऊन तिच्यावर स्वार व्हायचे, अशा रीतीने अर्मानी यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. विशेषत: १९९० नंतरच्या काळात जागतिक आर्थिक विषमतेचे आलेख उंचावत असताना, अर्मानी यांच्या व्यवसायाचा आलेख तर गगनचुंबी होऊ लागला. या व्यवसायाचे जॉर्जिओ हे एकमेव समभागधारक! भारतातही ‘एम्पोरिओ अर्मानी’ नावाची दुकाने मुंबई आणि बेंगळूरुमध्ये प्रत्येकी दोन, तर कोलकाता आणि दिल्लीत एकेक असल्याची अधिकृत नोंद (अर्मानी संकेतस्थळावर) आहे.

मिलानमधला एक ‘पालाझ्झो’ विकत घेऊन, त्यात अर्मानी राहात आणि तिथल्याच थिएटरवजा दालनात स्वत:चा फॅशन शो करत. त्यांच्या व्यवसायाला २५ वर्षे झाली म्हणून, सन २००० मध्ये ‘गुगेनहाइम म्युझियम’ने त्यांचे सिंहावलोकनी प्रदर्शन भरवले होते. असा मान फार थोड्यांना मिळतो, त्यामुळेच फॅशनच्या श्रीमंती वलयांबाहेरही त्यांची आठवण राहील.