जूलियन कॅलेंडरमध्ये बदल अमलात आणले पोप ग्रेगरी – तेरावे यांनी. कोण होते हे पोप ग्रेगरी आणि त्यांनी हे बदल नेमके कसे अमलात आणले हे आज पाहू. पोप ग्रेगरी हे बलोना विद्यापीठाचे स्नातक! त्यांनी विधिविषयक शिक्षण घेतलं होतं. काही काळ त्यांनी अध्यापनही केलं होतं! म्हणजे धर्मशास्त्रांप्रमाणेच आधुनिक विद्यांचाही त्यांचा अभ्यास होता. पोप ग्रेगरी यांनी कॅलेंडरमधले बदल अमलात आणण्यासाठी जी पद्धत अवलंबली ती आदर्श म्हटली पाहिजे. महत्त्वाचे निर्णय घेताना काय काय आणि कसं कसं करावं याचा जणू वस्तुपाठच त्यांनी घालून दिला.
सर्वप्रथम, पोप ग्रेगरींनी या विषयाचा अभ्यास करण्याकरिता विविध देशांमधून निवडलेल्या तत्कालीन विद्वानांची एक समिती स्थापन केली. या विद्वानांनी त्यांच्या त्यांच्या देशातल्या, प्रांतातल्या इतर तज्ज्ञांशी चर्चा करावी ही अपेक्षा होती. कॅलेंडर सुधारणांची सगळी सूत्रं ख्रिास्टोफर क्लेव्हियस या जर्मन विद्वानाकडे सोपवली. क्लेव्हियस हे आघाडीचे खगोलशास्त्रतज्ज्ञ तर होतेच पण उत्तम गणितीही होते.
या सुधारणा काय असाव्यात याविषयी समितीत अंतर्भाव / नसलेल्या / तज्ज्ञांकडूनदेखील सूचना मागवल्या. अनेकांनी अशा सूचना केल्या. प्रत्येकाचं मत वेगळं, प्रत्येकाचा उपाय वेगळा. मग या सगळ्या गोष्टी एकत्र करून पोप ग्रेगरींनी ते बाड विविध विद्यापीठं, राजे, शासक यांच्याकडे त्यांच्या प्रतिक्रियांसाठी पाठवून दिलं.
समितीतल्या तज्ज्ञांचा स्वत:चा अभ्यास, त्यांनी इतर तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेतून झालेलं निष्पन्न, आणि विविध राजे, विद्यापीठं यांकडून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया! म्हणजे, केवढा माहितीचा साठा तयार झाला होता पाहा.
थोड्याशा दुरुस्तीसह जो प्रस्ताव अखेर अमलात आला तो अलॉयशियस लिलियस यांनी सुचवलेला होता. ४०० वर्षांत १०० नव्हे तर ९७ लीप वर्ष असावीत हा त्यांनी सुचवलेला तोडगा समितीने स्वीकारला. सध्याच्या कॅलेंडरमधून दहा दिवस गायब करावेत हा उपायही स्वीकारला. मात्र हे दहा दिवस एकदम गायब करू नयेत. त्याऐवजी पुढची दहा लीप वर्षे साधी वर्षे करावीत ही डॉक्टरसाहेबांची सूचना काही अमलात आली नाही. दहा दिवस एकरकमी गायब झाले.
ख्रिास्टोफर क्लेव्हियस यांनी ही सगळी तांत्रिक बाजू सांभाळली असली तरी या सुधारणा प्रत्यक्षात आणायची जबाबदारी ग्रेगरी यांचीच होती. आणि ती त्यांनी चोख पार पाडली. ‘काळाचे गणित’ नुसतं सोडवलं असं नाही, अगदी पायरी पायरीने सोडवलं. आणि या सगळ्याचं उत्तम दस्तावेजीकरणदेखील केलं!
धार्मिकबाबतीत गरजेनुसार विविध आदेश काढायचा अधिकार धर्मप्रमुख म्हणून पोप यांना असतो. यातल्या सर्वात महत्त्वाच्या आदेशांना ‘बुल’ म्हणतात. या कॅलेंडर सुधारणांकरिता पोप ग्रेगरी – तेरावे यांनी २४ फेब्रुवारी १५८२ रोजी असाच एक बुल जारी केला. काय होतं या बुलमध्ये?
सर्वप्रथम हा बुल जारी करण्याचा अधिकार पोप यांना कसा प्राप्त झाला, हा बुल जारी करण्यामागची कारणं या गोष्टी होत्या. त्यापुढे बदलाचे नियम स्पष्ट करून सांगणारे सहा अध्याय होते. बरं, या नियमांबाबत अधिक माहिती हवी तर कोणतं पुस्तक पाहावं हे सांगितलं होतं.
प्रत्यक्ष कालगणनेतला बदल व्यवस्थित वर्णन करून सांगितला होता. लीप वर्षांच्या गणनेत काय बदल होणार हे सोदाहरण दाखवलं होतं. या वर्षी कोणते दिवस गायब होणार हेदेखील सांगितलं होतं. त्या दिवसांत साजरे होणाऱ्या सणवारांचं काय करायचं याचा स्पष्ट उल्लेख होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘जुनं कॅलेंडर मोडीत निघालं’ असा स्पष्ट निर्वाळाही दिला होता.
‘पोप’ म्हणजे खरं तर तिथला सम्राट. धर्मप्रमुखही आणि राज्यप्रमुखही. असं असूनही आपल्या मर्यादांची जाणीव पोप ग्रेगरींना स्पष्ट होती. कारण धर्मविषयक प्रत्येक बाबीबाबत तपशीलवार सूचना देणारा हा बुल व्यावहारिक अडचणी मात्र न्यायाधीशांनी सोडवाव्यात असंही सांगतो. उदाहरणार्थ, ‘जी देणी त्या दहा दिवसांत द्यायची आहेत त्यांचं काय करायचं’, ‘ऑक्टोबर महिन्याचं भाडं पूर्ण भरायचं की दहा कमी दिवसांचा हिशेब करून’ असे सगळे प्रश्न न्यायाधीशांनी हाताळावेत असं सुचवलं होतं.
आणखी एक गमतीचा भाग होता. कोणालाही पोप महोदयांच्या परवानगीशिवाय नवं कॅलेंडर छापायला मनाई केली होती! हो, नाही तर कोणीही काहीही छापायचा आणि सगळा गोंधळ माजायचा!
हा बुल प्रत्यक्षात १ मार्च रोजी छापून सर्व प्रांताकडे, देशांकडे रवाना केला. म्हणजे बघा, बदल अमलात येण्यापूर्वी जवळजवळ नऊ महिने! त्या काळची परिस्थिती विचारात घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पुरेसा आधी हा बुल सर्वांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली होती.
खरोखर, हा मोठा बदल अमलात आणताना किती बारीकसारीक गोष्टींचा विचार केला होता हे पाहिलं की थक्क होतो आपण. राजेशाहीतदेखील एवढी पारदर्शक प्रक्रिया राबवणाऱ्या पोप ग्रेगरींचं नाव अजरामर झालं आहे ते योग्यच आहे!