‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे’ या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी संस्थापक रावबहादूर रावजी रामचंद्र काळे स्मृतिदिन साजरा करण्यात येत असतो. १४ मार्च १९५३ रोजी या दिनाचे प्रमुख पाहुणे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. त्यांनी ‘भारतीय राष्ट्रीयत्व’ या विषयावर भाषण दिले. ते साररूपाने ‘नवभारत’च्या जून, १९५३च्या अंकात प्रकाशित झाले आहे. त्यात तर्कतीर्थांनी राष्ट्र, राष्ट्रीयत्व, राष्ट्रवाद इत्यादी संकल्पनांचा जागतिक आढावा घेत भारतीय राष्ट्रीयत्वाचे स्वरूप विशद केले आहे.
तर्कतीर्थांच्या विचारानुसार भारत हा १९४७ मध्ये पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र देश झाला खरा; पण ते एक राष्ट्र होऊ शकले नाही. कोणताही देश राष्ट्र म्हणून उदयास यायचा असेल, तर त्यासाठी राजकारण प्रगल्भ असणे आवश्यक असते. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, इटली इत्यादी देश ही राष्ट्रे झाली. आपल्या देशात ‘राष्ट्र’ संकल्पनेचा उदयच मुळी १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामापासून झाला. इतिहासपूर्व काळात भारताच्या राष्ट्रीयत्वाचा पाया घातला गेला खरा; पण स्वातंत्र्यपूर्व काळात त्याची घडण राष्ट्र म्हणून झाली नाही आणि होऊ शकली नाही. युरोपमध्ये जर्मनीसारख्या देशात जसा प्रखर राष्ट्रवाद जन्माला आला, तसा तो आपल्याकडे निर्माण होऊ शकला नाही.
‘राष्ट्र’, ‘राष्ट्रीयत्व’ आणि ‘राष्ट्रवाद’ या संकल्पना मुळात आधुनिक आहेत. त्यांचा उगम होण्याची कारणे जशी सांस्कृतिक आहेत, तशीच ती युद्धजन्य आहेत. कुलाभिमान, प्रदेशाभिमान, देशाभिमान, जमातनिष्ठा यांसारख्या तत्त्वसमन्वयाचे रूप म्हणजे ‘राष्ट्र’ संकल्पना होय. जगात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. तिथे पार्लमेंट संस्थेचा प्रथम उदय झाला. यातून हे घडले. नंतर फ्रान्समध्ये राज्यक्रांती घडून आली. १७व्या शतकात स्कॉटलंड आणि इंग्लंड एक झाले. अनेक राष्ट्रांमध्ये युद्धातून राष्ट्रीय भावना विकसित झाली. भारतात राष्ट्रीय भावनेचा आधार सांस्कृतिक असल्याने इथली राष्ट्रीयत्वाची गती, स्थिती मंद आहे. इथे राजकीय स्वरूप आणि वैभिन्य याचे खरे कारण आहे. युरोपमध्ये छोटी छोटी अनेक राष्ट्रे आहेत. ती भूगोलनिर्मित आहेत. राजकीय भावनेने त्यात उलथापालथी घडल्या, तरी अंतिमत: भूगोल तेथील राष्ट्रीयत्व निश्चित करते. रुसोच्या या मतापेक्षा फिक्टेचे मत यापेक्षा भिन्न आहे. भाषा हा घटक त्याच्यानुसार महत्त्वाचा आहे. हर्डरने राष्ट्रास ‘एक महान कुटुंब’ मानले आहे. इ. रेनाँच्या मतानुसार, ‘एका विशिष्ट केंद्रामध्ये केंद्रित होणाऱ्या अनेक सामाजिक घटकांच्या मालिकेतून ‘राष्ट्र’ अस्तित्वात आले आहे.’. रेनाँने ‘राष्ट्र हे आध्यात्मिक तत्त्व किंवा एक आत्मा’ मानले आहे. (ए नेशन इज ए सोल, ए स्पिरिच्युअल प्रिन्सिपल)
तर्कतीर्थांनी हे भाषण विसाव्या शतकाच्या मध्यास दिले होते, तेव्हा त्यांनी युरोपसंदर्भात ‘त्याचे संघराज्य (युरोपियन युनियन) झाल्यावर राष्ट्रे ही राष्ट्रे राहणार नाहीत, स्वातंत्र्य नष्ट होईल’, असे भाकीत केले होते. आज २०२५ मध्ये आपण पाहतो आहोत की, युरोपीय संघ झाला तरी इंग्लंडसारखे राष्ट्र त्यातून बाहेर पडले ते ‘आर्थिक स्वातंत्र्या’च्या कथित आकर्षणामुळे. यातून तर्कतीर्थांची राजकीय मीमांसा आणि क्षमता अधोरेखित होते.
तर्कतीर्थांच्या दृष्टिकोनातून ‘राष्ट्र भावना ही स्वातंत्र्यपोषक नैतिक भावना आहे. जनता जेव्हा जाणूनबुजून भावनाबद्ध होऊन समान राजकीय संघटनेकरिता एकजीव होते, तेव्हा राष्ट्रीयत्व आधुनिक अर्थाने वाढीस लागते. राष्ट्रीयत्व म्हणजे लोकांच्या राजकीय संघटनेची लोकांच्या हृदयात वसत असलेली अंतिम निष्ठा (सुप्रीम लॉयल्टी) होय. राष्ट्रवाद ही मनाची अवस्था आहे. बहुजनांच्या मनाची पकड घेणारी ही अवस्था आहे. आक्रमक राष्ट्रवाद हे मानव्यावरील संकट होय. राज्य की राष्ट्र, यात राष्ट्राचा क्रम वरचा मानत राहण्यावर येथील राष्ट्रीयत्व अवलंबून आहे. लोकराज्य हाच आधुनिक राष्ट्रीयत्वाचा मध्यबिंदू आहे.
सुमारे सात दशकांपूर्वीचे तर्कतीर्थांचे विचार आणि दरम्यानच्या काळात भारतीय राष्ट्रीयत्व संकल्पनेची झालेली पडझड लक्षात घेता २०४७ पर्यंतच्या भारतीय राष्ट्रीयत्वाच्या घडणीच्या दृष्टीने आपणाला राज्ययंत्रणेसंबंधी संकुचित – पक्षीय- भावनेचे उदात्तीकरण ‘राष्ट्र प्रथम’सारख्या अभिमानात करण्याची गरज आहे. इथल्या राष्ट्रीय एकात्मतेवरच इथले राष्ट्रीयत्व जोपासू वा टिकू शकेल.