महाभारत हे महाकाव्य आहे की इतिहास? वासुदेव आणि देवकीचा आठवा मुलगा आपला वध करणार आहे, कंसाला माहीत होते, मग त्याने आधीच या दोघांना दूर का ठेवले नाही? कृष्णाच्या बाललीला, त्याच्या बासरीची जादू, गोपिकांना पडलेली भुरळ हे सारे वास्तव असण्याची कितपत शक्यता आहे? कृष्णाने खरोखरच गोवर्धन पर्वत उचलला असेल का? सुदर्शनचक्रसदृश काही अस्त्र वास्तवात अस्तित्वात होते का? वृंदावनात वाढलेला कृष्ण लहान वयातच संपूर्ण भारतवर्षांत प्रसिद्ध कसा काय झाला असावा? ‘ट्रॅव्हल्स विथ नंदीघोष : डीमिस्टिफाियग कृष्ण’ ही सतीश मुटाटकर आणि उद्योजक यशवंत मराठे लिखित कादंबरी या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधते.

आयुष्यभर केलेल्या ट्रॅव्हल्सच्या व्यवसायातून नुकतेच मुक्त झालेले आणि कोविडकाळात घरी एकटेच अडकून पडलेल्यामुळे कंटाळलेले धनंजय कुरू (डीके) एक कॅम्पर (कॅरव्हॅन) घेऊन दक्षिण भारताच्या भटकंतीसाठी निघतात. त्यांना या प्रवासात एखाद्या विचारी, हुशार आणि अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असलेला सहप्रवासी हवा असतो. जगन्नाथ ठाकूर (जेटी) यांच्या रूपाने तो मिळतो. जेटी यांना अवजड वाहने चालविण्याचा अनुभवही आहे आणि त्यांनी नुकताच प्राचीन भारतातील प्रथा आणि परंपरा या विषयावरील पीएचडी प्रबंध लिहून पूर्ण केला आहे. मुंबईपासून तमिळनाडूपर्यंतच्या वाटेवर या दोघांनी महाभारतकाळात केलेली मनसोक्त भटकंती, हा या पुस्तकाचा गाभा आहे. कादंबरीतली ही दोन पात्रे म्हणजे लेखकद्वय, हे वाचकांना ओळखता येतेच.

एकदा एखाद्या व्यक्तीला दैवी देणगी लाभली आहे, असे म्हटले की, मग त्याच्या व्यक्तिमत्त्वाभोवती मानवी क्षमतेपलीकडच्या अनेक गुणांचे वलय कसे निर्माण होत जाते, याचे तार्किक विश्लेषण या दोन प्रवाशांच्या चर्चातून पुढे येते. असामान्य गुण असलेल्या व्यक्ती काळाच्या प्रत्येक टप्प्यावर अस्तित्वात होत्याच, आजही आहेत. मात्र आता त्यांच्या कार्याचे पुरावे लिखित आणि अन्य स्वरूपांत जतन करून ठेवणे शक्य आहे. ज्या काळात ही सुविधा नव्हती आणि सारे काही मौखिक परंपरेतून पुढे जात होते, त्या काळातील संदर्भाना अतिशयोक्त वर्णने जोडली जाणे स्वाभाविक होते, हे डीके आणि जेटी यांच्या गप्पांतून स्पष्ट होते.

जे योग्य आहे ते सामाजिक चौकटी तोडणारे असले, तरीही निर्भीडपणे मांडले पाहिजे, हे कृष्णाने अगदी लहान वयात ओळखले होते. त्याच्या आयुष्यात पुढेही तो याच मतावर ठाम राहिला आणि म्हणूनच तो खास ठरला. त्याने अर्जुनालाही त्याच वाटेवरून नेण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णात दडलेला मुत्सद्दी आणि त्याचे राजकारण यावर सविस्तर चर्चा यात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुटाटकर यांचा टीव्ही मालिका, जाहिराती आणि चित्रपटांसाठी गीतलेखनाचा अनुभव या पुस्तकाच्या लेखनशैलीत प्रतिबिंबित झाला आहे. कादंबरीच्या नावातील ‘नंदिघोष’ हे कॅम्पर व्हॅनचे नाव आहे. प्रवास आणि कृष्णविषयक चर्चा हे जरी या पुस्तकाचे सूत्र असले, तरी त्यात प्रवासाचा अनुभव विविध शहरांची ओळख असलेले पदार्थ आणि वस्तूंपुरताच मर्यादित राहतो. कृष्णाचे व्यक्तिमत्त्व वेगवेगळय़ा काळांत, विविध भागांत किती भिन्न पद्धतीने मांडले गेले, त्यात तथ्य असण्याची शक्यता किती आहे, हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी हे पुस्तक वाचावे.