रंगच खरे. बाकी देवादिकांच्या, धर्माबिर्मांच्या… प्रकाशाला दिव्य वगैरे म्हणण्यामागच्या कल्पना हे निव्वळ अवडंबर. त्या अवडंबरातूनच अर्थात, जुन्या कलेला आणि जुन्या चित्रकारांना वाट काढावी लागली. पण त्यांनी ती काढली, म्हणून तर…

व्हेनिस हे पूर्वापार व्यापारी शहर होतं. तिथे अगदी बाराव्या शतकापासून अतिश्रीमंत लोक नगरपिते म्हणून निवडले जात. नव्या नगरपित्यांची निवड- किंवा नेमणूक- जुने नगरपितेच बहुमतानं करत. थोडक्यात ही खरी लोकशाही नसून ‘अल्पसत्ताकशाही’ किंवा ऑलिगॉपॉली व्यवस्था होती. या नगरपित्यांना तिथं ‘डोजे’ म्हणत. या डोजेसचं सभास्थान- डोजेस पॅलेस- ही व्हेनिसची एक अतिप्रसिद्ध इमारत आहे. व्हेनिसच्या जाहिरातवजा छायाचित्रांमध्ये एकतर ‘रियाल्टो पूल’ तरी दिसतो किंवा हा ‘डोजेस पॅलेस’तरी! तर, या डोजेस पॅलेसमध्ये ‘टिन्टोरेटो’ हे नाव धारण करणाऱ्या, सोळाव्या शतकातल्या चित्रकाराचं प्रसिद्ध भित्तिचित्र आहे : ‘पॅराडाइज’ (इटालियन भाषेत ‘एल पॅराडीजो’)! व्हेनिसच्या या डोजेमहालातलं पॅराडाइज टिन्टोरेटोच्या जगप्रसिद्ध चित्रांपैकी एक; पण या मोठ्ठ्या चित्राआधी टिन्टोरेटोनंच ‘पॅराडाइज’ हेच चित्र लहान आकारांमध्येही रंगवलं होतं- त्यापैकी अगदी लहान चित्र पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात आहे आणि त्याहून जरा मोठं मद्रिदच्या संग्रहालयात. ही तिन्ही चित्रं एकाच चित्रकाराची आणि तिन्ही साधारण एकसारखीच.

सर्वांत वरच्या भागात दिव्य वगैरे भासणारा प्रकाश, त्यात येशू अणि मेरी दिसताहेत. त्यांच्या आसपास देवदूतांची दाटी, मग येशूचे शिष्य अर्थात अॅपोस्टल्स, राजे डेव्हिड, मोझेस , झालंच तर इटलीतले संत… अशी बरीच मंडळी या चित्रात आहेत. हे सर्वच्या सर्व जण जमिनीवर नाहीतच… ते सगळे अंतराळात कुठेतरी आहेत जणू. ‘देव नभीचे’ वगैरे असतात तसे. हा प्रकार मायकेलँजेलोच्या सिस्टीन चॅपेलमधल्या चित्रांतही दिसतोच, पण मायकेलँजेलोचं अवकाश छानसं फिक्या निळ्या छटेचं असतं, त्या आकाशीनिळ्याचं सौंदर्य वाढवायला मधून पांढरट ढगही असतात…. टिन्टोरेटोचं तसं नाही! ‘आउटर स्पेस’ किंवा सुदूर अंतराळ काळं, काळोखं असल्याचं आज आपल्याला माहीत आहे; पण टिन्टोरेटोला जणू ते आधीच माहीत होतं. त्याच्या बहुतेक साऱ्या चित्रांची पार्श्वभूमी नेहमी काळसरच असते. तशीच या ‘पॅराडाइज’चीसुद्धा आहे. या काळोख्या चित्रात वरच्या भागातला तो दिव्यबिव्य प्रकाश, या चित्राच्या डाव्याउजव्या भागांत लयदारपणे झिरपत राहातो झऱ्यासारखा. देवदूतांपासून मर्त्य राजांपर्यंतच्या गर्दीत काहींवर हा प्रकाश पडतो, काहींवर नाही… या प्रकाशखेळानं काहींचे घोळदार कपडे उजळतात, काहींचे झाकोळतात. ‘डोजेस पॅलेस’मध्ये स्थळदर्शनार्थ आलेल्या पर्यटकांना नेहमी माहिती दिली जाते की, व्हेनिसच्या नगरपित्यांपर्यंत जणू हा दैवी प्रकाश झिरपून पोहोचतो आहे, अशी कल्पना आहे हो या चित्रात टिन्टोरेटोची.

हेही वाचा : संविधानभान: संविधानाच्या तटबंदीचे संरक्षक

खरंखोटं कोण जाणे. पण ते चित्र समोर, प्रत्यक्ष पाहाताना येशू आणि मेरीच्या स्वर्गारोहणाचे साक्षीदार होण्यासाठी काळ्या अंतराळी जमलेला हा मेळा प्रकाशाच्या खेळामुळेच एखाद्या धीरगंभीर संगीतरचनेसारखा भासू लागतो- या संगीतरचनेत अदाकारी नसेलच असं नाही, तीसुद्धा एकेकट्या मानवाकृतीकडे पाहिल्यावर, एकेका स्वरबंधासारखी जाणवू शकेलच; पण अख्ख्या रचनेचा एकत्रित परिणाम मात्र गांभीर्यवर्धक होतो आहे. हे गांभीर्य काय धार्मिकपणामुळे येतं का?

‘अजिबात नाही’- हे या प्रश्नाचं उत्तर व्हेनिसमध्येच, उरुग्वे या देशाच्या दालनात सापडलं! उरुग्वे बरं का, उरुग्वे… आपल्याकडल्या काही अतिहुशार लोकांना ज्याचं नावबीव माहीत असतं आणि हुशारीचा कडेलोट झालेल्यांनाच ‘उरुग्वेची राजधानी माँटेव्हिडिओ’ हेसुद्धा माहीत असतं, असा दक्षिण अमेरिकेच्या आग्नेयेकडचा देश- म्हणजे भारताच्या नकाशातली पुद्दुचेरी जर प्रचंड धष्टपुष्ट असती तर आपल्या नकाशात जशी दिसली असती, तसा दक्षिण अमेरिकेच्या नकाशात उरुग्वे दिसतो. तरीही एकंदरीत तो लहानच देश. त्या देशाचा अधिकृत सहभाग व्हेनिसच्या बिएनालेत वर्षानुवर्षं असतो. ‘‘ही व्हेनिस बिएनाले वगैरे सगळी वसाहतवाद्यांची पाश्चात्त्य खुळं आहेत…’’ असली काही पिरपिर न करता, ‘त्यांच्या भाषेत, त्यांच्याच भूमीवर’ कलाकृतींमधून वसाहतवादाची आणि पाश्चात्त्य इतिहासाची पिसं काढण्याची संधी घेता येते, हे ठाऊक असणारे लोक उरुग्वेत आहेत आणि हे त्यांच्या सरकारला माहीत आहे, म्हणून असतो सहभाग. तर यंदा या उरुग्वेच्या दालनात एदुआर्दो कार्डोझो या ५७ वर्षांच्या चित्रकाराच्या कलाकृती होत्या. डोईवरले केस जात चाललेला हा एदुआर्दो कवीमनाचाच… ‘माझ्या स्टुडिओतल्या भिंतीसारखीच हुबेहूब भिंत इथं उभारलीय, ती एक कलाकृती… त्या तिथं तो कोणतंही चित्र नसलेला, चौकटीवर ताणलाही न गेलेला कपडा दिसतो त्याला मी ‘न्यूड’ असं नाव दिलंय… आणि ही तिसरी कलाकृती टिन्टोरेटोच्या ‘पॅराडाइज’वर आधारित…’ असं तो सांगत होता. यापैकी पहिल्या दोन कलाकृती फारच एकसुरी वाटत होत्या आणि ‘स्वत:च्या स्टुडिओतली भिंत हुबेहूब’ वगैरे खासगी हट्ट कशाला असा प्रश्नही पडत होता. पण तिसरी कलाकृती पाहिल्यावर, ‘स्वत:च्या स्टुडिओतली भिंत’ का बुवा – याचंही उत्तर मिळालं.

कारण इथं तिसऱ्या कलाकृतीत, टिन्टोरेटोच्या ‘पॅराडाइज’मधल्या मानवाकृतींनी जे घोळदार कपडे घातले होते, त्याचा दृश्य-प्रत्यय देणाऱ्या चिंध्या होत्या… चिन्ध्या! त्याही विहरत होत्या… जणू प्रचंड पाइप-ऑर्गनचे सूर जसे विहरतात तशा रुळत होत्या… टिन्टोरेटोचा तो येशू, ती मेरी, देवदूत, संत, राजेबिजे सगळं सगळं गायब- फक्त हे विहरणारे रंग खरे.

हेही वाचा : अन्वयार्थ: शेतकऱ्यांना आता सोयाबीन रडवणार?

होय, रंगच खरे. बाकी देवादिकांच्या, धर्माबिर्मांच्या… प्रकाशाला दिव्य वगैरे म्हणण्यामागच्या कल्पना हे निव्वळ अवडंबर. त्या अवडंबरातूनच अर्थात, जुन्या कलेला आणि जुन्या चित्रकारांना वाट काढावी लागली. पण त्यांनी ती काढली, म्हणून तर त्या जुन्या कलेच्या चिंध्यासुद्धा आज तितक्याच लयदार दिसताहेत. या लयीचा अवघा मेळ आडवा असल्यानं – तो उंचीवर जात नसल्यानं- मंद्रसप्तकातल्यासारखा भास या मेळातून होतो आहे. त्यात त्या चिंध्यांचे रंग खर्जातले. फार आरडाओरडा न करणारे. ऑर्गनचे सूर एकामागोमाग येत असूनही ज्याप्रमाणे आदल्या कधीच्या तरी सुराचा नाद श्रोत्याला अमूर्तपणे जाणवतो, तशी किमया टिन्टोरेटोच्या भित्तिचित्रात आहे आणि या चिंध्यांच्या रचनेतही ती होती… म्हणजे एका बाजूच्या रंगीत कपड्याचं उडणंविहरणं दुसरा कपडा पाहातानाही लक्षात राहात होतं. पण अमूर्ताचा अनुभव इतकी फोड करून सांगावा का, हा प्रश्न आहेच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तात्पर्य मात्र सरळ आहे. कला धार्मिकबिर्मिक आधारानं वाढली असली, तरी या अशाच प्रकारे कलेची वाढ होणं ही त्या त्या वेळच्या ‘व्यवस्थे’ची अपरिहार्यता होती. कलेची वाढ काही कोणत्या धर्मामुळे का देवामुळे होत नसते. अगदी भिंतीवरल्या चित्रांतसुद्धा कलेची जाणीव वाढते ती अमूर्त तत्त्वांचा- रंगांचा, आकारांचा, अवकाशाचा मेळ कसकसा घातला जातो यातूनच. त्यामुळे मग आकाशीनिळ्या पार्श्वभूमीवरली मायकेलँजेलोची चित्रं आणि अंतराळकाजळी ओळखणाऱ्या टिन्टोरेटोची चित्रं अखेर प्रेक्षकाला, आमच्यातली अंगभूत लय पाहा असंच सुचवत असतात. जुन्या कलेच्या आणि व्यवस्थेच्याही चिंध्या केल्या, तरी त्यातून काही सत्त्व उरणं चांगलंच!
abhijit.tamhane@expressindia.com