राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण होणे साहजिकच आहे. पण त्याच वेळी लोकसभेच्या एकेक जागेसाठी भाजप किती अगतिक आहे हेही अधोरेखित होते. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे वर्चस्व असल्याने जिल्ह्यात भाजपला सारी ताकद लावूनही मर्यादित यश मिळत गेले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अशोक चव्हाण यांचा पराभव केला खरा, पण त्यासाठी शिवसेनेचा उमेदवार आयात करावा लागला होता. मध्य प्रदेशात छिंदवाडा मतदारसंघात कमलनाथ यांचे प्रस्थ आहे. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला पण छिंदवाडा विभागातील सातही आमदार काँग्रेसचे निवडून आले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील छिंदवाडा वगळता उर्वरित सर्व २८ मतदारसंघांत भाजपला यश मिळाले होते. छिंदवाडा जिंकायचे तर कमलनाथ यांनाच बरोबर घेण्याशिवाय भाजपकडे पर्याय नसावा. हाच प्रयोग उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष किंवा बसपच्या नेत्यांना गळाला लावून यापूर्वी केला होता. लोकसभेच्या ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता भाजपने प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करून कोण जिंकू शकतो याचा अंदाज बांधला असावा. त्यातूनच विरोधी पक्षातील अस्वस्थ नेत्यांना सत्तेचे गाजर दाखविण्यात आले असावे. शेवटी अशोक चव्हाण, नारायण राणे किंवा आसामचे हेमंत बिस्व सरमा आदी वादाची पार्श्वभूमी किंवा चौकशीची टांगती तलवार असलेल्या नेत्यांना सत्ताधारी पक्षाची गरज लागतेच. ‘भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते’ हे काँग्रेसमधून भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील उगाच बोलले नव्हते! आता कमलनाथ यांच्यासह त्यांच्या पुत्रालाही भाजपने स्थान द्यावे, असे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा >>> कलाकारण: माध्यमांची परीक्षा पाहणाऱ्या कलाकृती
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, कमलनाथ आज ना उद्या याच मार्गाने जातील, अशीच चिन्हे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फार काही यश मिळेल अशी शक्यता वाटत नसल्याने नेतेमंडळी बहुधा पक्ष सोडू लागली असावीत. अशोकराव किंवा कमलनाथ हे दोन्ही माजी मुख्यमंत्री.. त्यांना पक्षाने काय कमी दिले. कोलकात्यामधील कमलनाथ यांना १९८०च्या निवडणुकीत छिंदवाडा हा ‘सुरक्षित’- १९७७ मध्ये जनता लाटेतही काँग्रेसकडे राहिलेला- मतदारसंघ काँग्रेसने दिला होता. छिंदवाडय़ातील खासदारकीमुळे कमलनाथ यांचे नशीब फळफळले. संजय गांधी यांच्या मैत्रीमुळेच इंदिरा गांधी यांचे तिसरे पुत्र अशी कमलनाथ यांची ओळख झाली होती. तरीही उतारवयात काँग्रेस सोडण्याचा निर्णय का? पक्षात चार-पाच दशके महत्त्वाची भूमिका बजाविणारे नेते काँग्रेस पक्ष का सोडून जात आहेत याचे आत्मपरीक्षण काँग्रेस नेतृत्वाला करावे लागणार आहे. मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाध्यक्ष असले तरी पक्षातील निर्णय प्रक्रियेत राहुल गांधी व त्यांच्या भोवतालच्या चौकडीचा शब्द अंतिम असतो. ही बाब अनेक नेत्यांना खुपते. गेली दहा वर्षे पक्ष सत्तेबाहेर असला तरी दिल्लीतील नेत्यांची ‘ओसाड गावची पाटीलकी’ भूषविण्याची हौस अद्याप गेलेली नाही. दरबारी राजकारण कमी झालेले नाही. राज्यसभेची खासदारकी मिळाली नाही म्हणून कमलनाथ नाराज झाले, असा दावा केला जातो. प्रस्थापित नेत्यांना डोक्यावर चढवून ठेवल्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागत आहेत. भाजपने शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे किंवा रमणसिंह यांना मुख्यमंत्रीपदाची संधी डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली, पण प्रस्थापित नेत्यांकडून हू नाही की चू नाही- अशी शिस्त काँग्रेसमधून केव्हाचीच गायब आहे. संख्याबळ आणि सत्तेसाठी भाजपला भ्रष्टाचारी सुखराम, राजभवनात अश्लील चाळे करणारे एन. डी. तिवारी, ‘आदर्श’वीर अशोक चव्हाण, सुमारे ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ाच्या आरोपातील अजित पवार, दाऊदचा सहकारी इक्बाल मिर्चीशी आर्थिक संबंधांचा आरोप असणारे प्रफुल्ल पटेल, विविध घोटाळय़ांचे आरोप असलेले हेमंत बिस्व सरमा, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीतील शीखविरोधी दंगलीचा आरोप झालेले कमलनाथ, बेनामी मालमत्तेचा आरोप असलेले नारायण राणे अशी लांबलचक यादी असलेले नेते प्रिय असतात. भाजपकडून सत्तेसाठी भ्रष्ट नेत्यांना लाल गालिचा पसरला जाणे आणि वर्षांनुवर्षे काम केलेल्या काँग्रेस पक्षाबाबत नेतेमंडळींना विश्वास न उरणे ही राजकीय अध:पतनाची बाह्यलक्षणे होत.